मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय १३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीशिव सांगती पावन कथा । बलीचा पुत्र बाणासुर होता । दैत्य असून धार्मिकता । त्याच्या मनीं वसत होती ॥१॥
तो बाणासुर शिवभक्त । सदा साधुगुणांनी युक्त । बाल्यापासून अविरत भजत । शंभूस तो प्रतापवंत ॥२॥
अन्य देवांस न जाण । स्वधर्मपालनांत रत । शुक्र त्यास शिवमंत्र देत । पंचाक्षरयुक्त विधिपूर्वक ॥३॥
त्यास तप करण्या सांगत । तोही उग्र तप आचरित । भज शिवास भक्तियुक्त । सदा ध्याई स्वचित्तांत ॥४॥
ऐसीं सहस्त्र वर्षें जात । तेव्हां मीं संतुष्ट होत । बाणास वर देण्या जात । करुणानिधि मीं संतुष्ट ॥५॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । रौद्र स्तोत्रांनीं तो तोषवित । यथाविधि पूजन करित । बाणासुर तैं शंकराचें ॥६॥
तेव्हां शंकर भगवान । होऊन मनीं प्रसन्न । माग म्हणती वरदान । असुराधिपा मीं देईन ॥७॥
तेव्हां बाणासुर म्हणत । जरी तूं वर देण्या इच्छित । तरी दृढ भक्ति तुझी चित्तांत । माझ्या स्थिर करी दयाघना ॥८॥
न अन्य देवपरायण । मज शैवोत्तम करी महान । सहस्त्रबाहू मज लाभून । सामर्थ्य अद्‍भुत्त लाभावें ॥९॥
या समस्त चराचरांत  । कोणी नसावा माझ्यासम बलवंत । मी अजिंक्य संग्रामांत । होईन सदा ऐसें करी ॥१०॥
महादेव त्यास तो वर देत । पार्वती गणांच्या सान्निध्यांत । तदनंतर स्वगृहीं परतत । प्रशंसित भक्तोत्तमातें ॥११॥
तदनंतर बाणासुर जिंकित । विष्णुमुख्य देवांस त्वरित । देवांवरी राज्य करित । धर्मनिष्ठ स्वभावानें ॥१२॥
स्वर्गांत देवांस स्थापित । पाताळांत असुरा राज्य देत । नागांस नरांसी पृथ्वीवरी ठोएवित । धर्मनीती राज्य करी ॥१३॥
वर्णाश्रमयुक्त सर्वांस पाळित । नित्य कैलासीं तो जात । शंकरप्रभूसी पूजित । सदाशिव संतुष्ट त्याच्यावरी ॥१४॥
त्याच्या धर्मप्रभावानें । तैसेंच परम भक्तीनें । संतुष्ट होऊन प्रसन्नमनें । महादेव त्याच्या नगरीं जाती ॥१५॥
तेथ पार्षदांसह वास करित । तेव्हां शंभु मनीं विचार करित । पंचायतनरूपें शंकर पूजित । यापुढे एकासची पूजीन ॥१६॥
शंकराहून अन्य देव नसत । अन्य कोणा न मीं मानित । शंकरा पूजितां सर्व पूजित । होतें सर्व चराचर ॥१७॥
परी सर्व गणेशपूजा प्रथम करिती । मी जरी प्रथम गाईन त्याची महती । तरी मीं एकनिष्ठ शिवभक्त कैसा ॥१९॥
ऐसा विचार करून । गणपतीस त्यागून । एकनिष्ठ मनें शंभूचेंच पूजन । एकदेवाचें तो आदरें करी ॥२०॥
ऐसें एक वर्ष झालें । शोणित नगरीं शंकर राहिले । त्यासी पूजून भावबळें । नाचे मोदपर तो असुर ॥२१॥
तेव्हां शिव झाला प्रसन्न । म्हणे असुरा माग वरदान । महापाशुपत तो महान । तें ऐकून बाण तोषला ॥२२॥
बळिनंदन तो हर्षंभरित । महादेवास प्रणाम करित । म्हणे योद्धा मजसदृश सांप्रत । द्यावा देवेशा लढण्यासी ॥२३॥
माझ्या सहस्त्र भुजांचें वीर्य । सहन करील ऐसा थोर । निर्माण करी तूं वीर । अति पराक्रमी देवेशा ॥२४॥
तें ऐकून शंभू कुपित । शाप त्या असुरास देत । तुझ्या भुजांचा छेद त्वरित । होतां राज्यभ्रष्ट तूं होशील ॥२५॥
असुराधमा वासुदेवासह । संग्राम तुझा होईल दुःसह । माझ्यापासून काय वर तुज मिळत । पराजित तूं होशील ॥२६॥
तें ऐकून शोकसंतप्त । बाण त्यास प्रणास करित । स्वगृहीं परतून शुक्राप्रत । निवेदिला सारा वृत्तान्त ॥२७॥
शिव त्या असुरास सोडून । गेला कैलासीं क्रोधयुक्त मन । मनीं त्या असुराधमा आठवून । संताप त्याच्या होतसे ॥२८॥
तिकडे शुक्र करी सांत्वन । बाणासुराचें करुणायुक्त मन । योगीश तो द्विजसत्तम पावन । म्हणे दैत्येंद्रा ऐक हित ॥२९॥
गणेशासी त्यजून । तूं शंकराचें करिसी भजन । वेदविरुद्ध आचरण । करिसी यांत न संशय असे ॥३०॥
ज्येष्ठराज गणेशास । वेद वर्णिती सविशेष । सर्वांदिपूज्यत्व तयास । प्रकाशकाराक शुभ असे ॥३१॥
जैसें संध्यादिक कर्म । आवश्यक असतें नित्य अभिराम । तैसेंचि गजानन पूजन परम । सर्व प्रथम गायिलें असे ॥३२॥
एकनिष्ठपदांनी पूजन । करावें त्याचें नितनेम । गणेश्वरास त्यागून । एका शंभूस तूं भजसी ॥३३॥
तो गणनाथ कुपित । तुझा बुद्धिभेद करित । तो सिद्धिबुद्धिपति साक्षात्‍ । गणेश ब्रह्मनायक ॥३४॥
त्यास सोडून तुजला प्राप्त शांभवी सिद्धि कैसी जगांत । शिवाच्या ह्रदयांत । सदैव तोच राहतसे ॥३५॥
त्याच्या इच्छेनें शिवादिदेव । आचरिती सदैव । तैसें तूही आचरीं सुदैव । तरीच तुजला लाभेल ॥३६॥
त्यानेंच तुज शिवहीन । केलें मनीं संतापून । शंकराचा कोप होऊन । शापयुक्त झालास तूं ॥३७॥
तरी आतां त्या देवा शरण । जाई गणेशा एकमन । ब्रह्मनायकासी जो विघ्नविहीन । करील तुज निःसंशय ॥३८॥
गण समूहरूप असत । समूह ब्रह्मवाचक वर्तत । बाहयांतर एकभावें होत । समूह ऐसें लाभावें ॥३९॥
ऐसा गणराजाचा गण एक । शिव असे ख्यात ऐश्वर निःशंख । समूहाख्य जो पावक । विचार करी महामते ॥४०॥
अथवा शिवसंज्ञ तोच असत । सहजांची परागति जगांत । गणरूप ईश्वराच्या समूहांत । सहज शिव हा जाणावा ॥४१॥
ऐश्याचि रीती विष्णु आदि । देव सर्वही गण त्याचे तत्त्वादि । वेदउपनिषदें विशदी । अथर्वणांत सांगती ॥४२॥
ऐसें सांगून शुक्र परतत । आपुल्या गृहासी ज्ञानवंत । बाणासुर तो खेदयुक्त । विचार करी स्वमानसीं ॥४३॥
तदनंतर त्या गणेशाचें ज्ञान । महा अद्‍भुत मनीं उपजून । चतुर्थी दिनीं करी पूजन । दैत्येश तो गजाननाचें ॥४४॥
ध्याननिष्ठ तो जप करीत । गणेशमंत्राचा भक्तियुक्त । गणानां त्वा हा मंत्र पुनीत । प्रिय असे गजाननासी ॥४५॥
बाण क्षमायाचना करित । अथर्व उपनिषदें स्तवित । तदनंतर पसन्न होत । भक्तवत्सल गजानन ॥४६॥
बाण उपवास करित । द्विरदानन त्याच्या पुढें प्रकटत । एक वर्ष परीक्षा घेत । अन्तीं प्रसन्न जाहला ॥४७॥
मूषकावरी बैसोन । आला तेव्हां जगानन । त्यास पाहून हर्षयुक्त मन । प्रणाम करी बाणासुर ॥४८॥
भक्तिलोलुप पूजा करित । कृतांजलि स्तुति करित । बाणासुर परम धर्मांत्मा स्तवित । भक्तिनम्र मान वाकवून ॥४९॥
विघ्नेशासी परेशासी । भक्तविघ्नचिदारकासी । अभक्तां विघ्नकर्त्यासी । विघ्नविघ्नासी नमन असो ॥५०॥
विनायकासी देवेशासी । दैत्येशनायकासी निरंकुशासी । ज्येष्ठराजासी ज्येष्ठासी । ज्येष्ठपूज्यासी सतत नमन ॥५१॥
सर्वपूज्यादि पूज्यासी । परेशासी लंबोदरासी । सर्वांच्या मातापित्यासी । हेरंवासी नमन असो ॥५२॥
आदिमध्यान्तहीनासी । शूर्पकर्णासी शूरासी । मोहांधकविदारकासी । ब्रह्मेशा तुज नमन असो ॥५३॥
सुशांतासी शांतिदात्यासी । एकदंतासी देवासी । स्वानंदनिवासकासी । अभेयासी नमन असो ॥५४॥
अप्रतर्क्यासी मायिकासी । मायामायिकरूपासी । मायामायिकवर्जितासी । अनाथांच्या नाथासी नमन ॥५५॥
सिद्धिबुद्धिपतीसी । सदा योगपरायणासी । योगींद्रासी सुयोगासी । कुलदेवा तुज नमन असो ॥५६॥
तुज्या अधीन हें समस्त । बुद्धिचालकरूना तुजप्रत । सिद्धिसंमोहित हें जगत । सिद्धिदात्या तुजला नमन असो ॥५७॥
शिवादिक समर्थ होत । तुझी कृपा जेव्हां होत । ते जरी अहंकारयुक्त । अधिकार भ्रष्ट तरी होती ॥५८॥
मीं अज्ञानानें सोडिलें । शिवकामनेनें तुज अवमानिलें । तेव्हा मज शापून गेले । शंभु देव क्रोधपरायण ॥५९॥
म्हणोनि रक्षी विघ्नेशा । नाथविवर्जित मजला परेशा । अपराधांची क्षमा परेशा । करून निरंतर राख मजला ॥६०॥
ऐसी स्तुतीअ करून । गणेशास करी अभिवादन । बाणासुर दुःखार्त करी रुदन । पाय पकडून महात्म्याचे ॥६१॥
त्यास वरती उठवून । गणाधीश म्हणे वचन । स्व्मायामोहित शरण । दीनास त्या देऊनियां ॥६२॥
तूं केलेलें हें स्तोत्र । व्यतिक्रमविदारक पवित्र । सर्व सिद्धिप्रद सर्वत्र । होईल महादैत्या सदा ॥६३॥
या स्तोत्रानें प्रसन्न । भुक्तिमुक्ति तुज देईन । जरी मज विसरशील उन्मत्तमन । तरी मीं क्रोधयुक्त होईन ॥६४॥
परी शिवहीन तुज करून । नरकांत अंतीं टाकीन । परी आतां मज शरण । आलास आता काय करूं ॥६५॥
शुक्रशिष्या तूं महासुर । माझ्या पायाचा किंकर । शरणागत । पश्चात्तापपर । म्हणोनि अभय तुज देतो ॥६६॥
परी शिवाचा शाप जगांत । मिथ्या कधींही न होणार निश्चित । तथापि उपाय सौख्ययुक्त । सांगतों तुज ऐक बाणा ॥६७॥
वासुदेवाशी तूं लढशील । तुझे हजार बाहू तुटतील । राज्यही भ्रष्ट होईल । पुनरपि तें मिळेल परी ॥६८॥
ऐसें बोलून थांबत । गणेश तेव्हां दैत्य नमित । गणनायकास म्हणत । नाथा मागणें एक असे ॥६९॥
तुझें विस्मरन मजप्रत । कधीही न होवी जगांत । तुझ्यासहित शिवास भक्तियुत । भजीन मी भक्तीनें ॥७०॥
गणेशा ज्ञान शाश्चत । देई विघ्नेशा मजप्रत । अन्य कांहीं मी न वांछित । तुझ्या पादपद्मांची सेवा ॥७१॥
श्रीगणेश म्हणे तयासी । गाणेश ज्ञान लाभेल तुजसी । या जडदेहानें शैव गणपदासी । पावशील तूं बाणासुरा ॥७२॥
महाकाल नावें तूं विख्यात । होशील सर्व भूपाळांत । शिवपद नष्ट होतां स्वानंदांत । विलीन तूं होशील ॥७३॥
ऐसें सांगून अंतर्धान । गणाधीश झाले तत्क्षण । गाणासुर हर्षभरित मन । गणेशभजनीं लीन झाला ॥७४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते बाणासुरवरप्रदांन नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्त । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP