मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
गोविंदप्रभू

दत्तभक्त - गोविंदप्रभू

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

रिद्धपूरजवळ काटसरे नावाचे गाव आहे. तेथील एक काण्व ब्राह्मण अनंतनायक. त्याची बायको नेमाइसा. अनेक मुले झाली तरी जगेनात. म्हणून शेवटच्या मुलाचे नाव ‘गुंडो’ असे ठेवण्यात आले. दोन वर्षांच्या आतच गुंडोचे आईवडील मरण पावले. मामा व मावशीने त्याचे पालन केले. गुंडो अतिशय बुद्धिमान व वैराग्यशील होता. द्वारावतीच्या चांगदेव राऊळाकडून त्यांनी शक्तीचा स्वीकार केला. गुंडा गोविंदप्रभू या नावाने ओळखले जाऊ लागले. नाना चमत्कार करून गोविंदप्रभूंनी आपला लौकिक वाढविला. त्यांचे खाणेपिणे, वागणे, बोलणे एखाद्या अर्धवट माणसासारखे असे. ‘राऊळ वेडे: राऊळ पीसे’ असे लोक त्यांच्याबद्दल म्हणत. खादाडपणाची सवयही त्यांना होती. गोविंदप्रभू मोठे नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांचे वैराग्य कडकडीत होते. त्यांचीही दृष्टी आपल्या गुरुप्रमाणेच समत्वाची होती. ‘राऊळ मातांगां महाराचां घरोघरी विचरताती: आणि तैसेचि दीक्षीतां ब्राह्मणांचा घरी विचरताती’ अशी त्यांची मनोवृत्ती होती.

त्यांच्या आकृतीची, वेषाची, वर्तनाची मोठी रेखीव चित्रे महानुभावीय वाङमयात आढळतात. आगीचे, मृत्यूचे भविष्य वर्तविणे, मेलेल्यांना जिवंत करणे, पांगळ्यांना पाय देणे, मुक्यांना वाचा देणे, सापाचे विष उतरविणे असे काही चमत्कार ते करीत. यांचा वेष कसा असे? तर ‘आरिख म्हणजे मळवट: कुंकुम भरणे; माथां भांग खोपा जवादि भरणे; कर्णी सुकडी लावणे: पायीं वांकि: गळां सांखळ मुकुटीं तेल: वेणी: नाभिचुंबित खाड (दाढी) तथा स्मश्रु;’ ‘आवो मेली जाय’ अशी एक शिवी नित्य त्यांच्या तोंडी असे. श्रीचक्रधरांचे हे साक्षात गुरू असल्याने त्यांना महानुभावपंथातही विशेष महत्त्वाचे स्थान आहे. श्रीचक्रधरांनी गोविंदप्रभूंची सेवा मनोभावे केली, गोविंदप्रभूंच्या स्वभावाच्या अनेक लकबी महानुभाव ग्रंथकार देतात. उगाच वेडावून दाखविणे, हातवारे करणे, गरगरा हात फिरविणे; अशा त्यांच्या सवयी होत्या. खाडाडपणा हा त्यांचा विशेष स्वभाव होता. गूळ खावा तर तो कसा? ‘श्रीकरें भेली मुखीं घातली: आणि आरोगुं लागले: ते श्री मुखुनि ओघळु नीगेति: ते खाड (दाढी) माखे: दोंदावरी गळे: ऐसा गुळु आरोगीला:’ अशा या गोविंदप्रभूंकडून शीचक्रधरांनी शक्तीचा स्वीकार केला. गोविंदप्रभूही महानुभाव पंथात ईश्वराचा अवतारच मानले जातात.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP