मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
नारायण गुरुदत्त महाराज

दत्तभक्त - नारायण गुरुदत्त महाराज

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(समाधी. सन १८९१)

बडोदे येथे सुमारे १२५ वर्षांपूर्वी श्रीदत्तप्रबोधकार अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा महाराज यांच्या समाधिमंदिरात श्री. प. पू. ब्रहमचारी नारायण गुरुदत्त महाराज या नावाचे एक महान सिद्ध सत्पुरुष वास्तव्य करून राहात होते.

परम पावन ब्रहमचारी नारायण गुरुदत्त महाराज हे मूळचे कर्नाटक प्रांतातील जिल्हा कदामळी, तालुका बदापैकी, मुधोळ गावचे राहणारे होत. ते ऋग्वेदी ब्राहमण असून त्यांचे गोत्र कश्यप होते. यांचे मूळ पुरुष गोविंद नाईक हे होत. यांचेपासून सहाव्या पिढीस दारा अप्पा नावाचे विद्वान व सदाचारी भगवद्‌भक्ताच्या घरी जो मुलगा झाला तेच प्रस्तुतचे नारायण महाराज होत.

त्यांचे त्या वेळी कृष्णअप्पा असे नाव ठेवण्यात आले होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा व्रतबंध करण्यात आला होता. मातापिता निवर्तल्यानंतर त्यांच्यावर एकाकी जीवन कंठण्याचा प्रसंग आल्याने व कोणी मायेचे जवळ नसल्याने त्यांना अतिशय दु:ख झाले व त्यांनी कंटाळून घराचा त्याग केला.

मनात देहाचे सार्थक व्हावे ही तळमळ असल्याने, त्या दृष्टीने त्यांनी शोध सुरू केला. या वेळी त्यांचे वय १२-१४ वर्षांचे असावे. याप्रमाणे विचारात असताना त्यांना एक विचार आला की, वल्लारी जिल्ह्यातील आदबी तालुक्यातील मचली गावी आपल्याच वंशजांपैकी एक महान्‌ योगाभ्यासी दत्तउपासक, श्रीदत्तात्रेयांची नित्य पूजासेवा करून स्वात्मरंगी रंगलेले महान्‌ सिद्धपुरुष श्रीराघवेंद्र स्वामी होऊन गेले होते. त्यांना आपल्या उपासनेमुळे वारंवार श्रीदत्तात्रेयांचे साक्षात्कार होत; तसेच सगुणरूपातही प्रत्यक्ष दत्तदर्शन झालेले होते. ते नित्य समाधियोग साधीत. त्यांनी त्याच गावात जिवंत समाधी घेतली होती. हे आपल्याच वंशातील महान साक्षात्कारी पुरुष असल्याने, त्यांच्या समाधिमंदिरात कृष्णअप्पा येऊन राहिले. समाधीची नित्य नेमाने सेवाअर्चा करावी, गावातून भिक्षा आणावी, त्यापैकी ब्राहमणास भाग द्यावा व गोसेवा करावी, श्रीचिंतनात बाकीचा काल घालवावा.

याप्रमाणे सेवा करीत असता बारा वर्षे झाली तरी प्रभुकृपा होईना; म्हणून त्यांना वाईट वाटले व तशा विषण्ण अंत:करणाने अत्यंत कळवळ्याने, त्यांनी एके दिवशी समाधीपाशी बसून, श्रीराघवेंद्रस्वामींना आपणांवर कृपा करण्याविषयी प्रार्थना केली. त्या दिवशी त्यांनी पूर्ण उपवासच केला होता. विनम्रपणे चिंतनात निमग्न असतानाच त्यांना तेथेच समाधीजवळ निद्रा येऊन, ते तसेच तेथे पडून राहिले. त्याच रात्री स्वामींनी दृष्टांत दिला की,

‘तू आता श्रीशैल पर्वतावर माझे शिष्य ‘लक्ष्मणदास’ या नावाचे आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांचा उपदेश घ्यावा,’ त्याचप्रमाणे श्रीशैलपर्वतावर सतत प्रभुभजनात व योगाभ्यासात निरामय एकान्तस्थळी राहात असलेले आपले शिष्य ‘लक्ष्मणदास’ यांनाही त्याच दिवशी दृष्टांत दिला की, ‘तुम्हांकडे येत असलेल्या कृष्णअप्पास तुम्ही उपदेश द्यावा व वरदहस्त ठेऊन पावन करावे’ याप्रमाणे उभयतांस स्वामींचा दृष्टांत झला. कृष्णअप्पांनी आपले भावी गुरू श्रीलक्ष्मणदास महाराज यांची भेट श्रीशैलपर्वतावर जाऊन घेतली व ‘मी अनन्य शरण आहे, उपदेश व्हावा, मला दृष्टांत झाला आहे ‘अशी विनंती विनम्र भावाने हात जोडून केली.

श्रीलक्ष्मणदास यांना गुर्वाज्ञा झालेलीच होती. त्यांनी त्याप्रमाणे गुरूवार अभिजित मुहूर्त पाहून कृष्णअप्पास तारक मंत्रोपदेश केला व वरदहस्त मस्तकी ठेवून कृतार्थ केले. त्यांनी त्यास योगासंबंधी माहिती देऊन प्रत्यक्षात साधना करवून घेतली. उपदेश झाला त्या दिवसापासून कृष्णअप्पाचे नाव बदलून ‘नारायण’ असे ठेविले; तेच हे ब्रहमचारी नारायण गुरुदत्त महाराज होत.

याप्रमाणे उपदेशप्राप्तीनंतर काही काळाने गुर्वाज्ञेने ‘नारायण’ आता चार धाम यात्रेस निघाले. सर्व यात्रा पूर्ण करून ‘नारायण’ हे परत श्रीशैलपर्वतावर गुरुजवळ येऊन राहिले. तेथे गुरुशिष्यांनी श्रीदत्तात्रेयांची उपासना केली. तप सुरू केले. ध्यानधारणा व योगाची प्रक्रिया व साधनाही चालू होतीच.

याप्रमाणे तपाचरणात काही काळ लोटल्यावर श्रवण वद्य ३ गुरुवारी श्रीलक्ष्मणदास समाधिस्थ झाले. त्यांची समाधी बांधून ब्रह्मचारी नारायण महाराजांनी पुण्यतिथिमहोत्सव, अन्नसंतर्पण वगैरे तेथे पुष्कळ केले. तेथे अद्यापही श्रावण वद्य ३ रोजी लक्ष्मणमहाराज-पुण्यतिथिउत्सव साजरा होत असतो, तो त्यांचे पारंपारिक शिष्यमंडळी साजरा करतात.

पुण्यतिथिउत्सव संपल्यावर नारायण महाराज ब्रह्मचारी पुन्हा यात्रेस निघाले. श्रीब्रह्मचारी नारायण गुरुदत्त महाराज यांचेवर श्रीदत्तात्रेयांची पूर्ण कृपा होती. त्यांनी आता नर्मदा व गोदावरीची प्रदक्षणा करून नरनारायणाची यात्रा करावी असा विचार केला. त्याप्रमाणे कृष्णामाईची प्रदक्षणा करून ते बद्रिकाश्रमी गेले. तेथे त्यांनी महान्‌ तपश्चर्या केली. नंतर स्वर्गद्वारी नरनारायणाचे दर्शन घेतले. दर्शनाने अत्यंत वाटला.

तेथील यात्रा संपवून ते गोदातीरी श्रीत्र्यंबकेश्वरी येऊन प्राप्त झाले. लोकांना या तपस्वी व महान योग्यास पाहून आनंद वाटला. लोक त्यांची तेथे सेवा करू लागले. याप्रमाणे तेथे मुक्काम असताज्ना त्यांच्या शिष्यांपैकी काहींनी या महान्‌ सत्पुरुषास ‘वीरक्षेत्री’ आणले. बडोद्यास पूर्वी वीरक्षेत्र असे नाव होते.

महाराजांचे बडोद्यास आगमन झाल्याने तेथे त्यांचा उपदेश घेऊन पुष्कळ शिष्य झाले. तसेच अनेकांना त्यांनी भक्तिमार्गास लावले. महाराज अखंड ‘दत्त दत्त’ नामस्मरण करीत असत, म्हणून त्यांना सर्व ‘ब्रह्मचारी नारायण गुरुदत्त महाराज’ असे संबोधीत असत. त्यांची कीर्ती ऐकून ठिकठिकाणचे लोक नित्य दर्शनास येत असत व आपली दु:खे सांगुन त्या परिहारार्थ उपाय विचारीत. महाराज त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची दु:खे दूर करीत. येथे पुष्कळ त्यांचे अनुयायी व शिष्यही झाले होते.

ठिकठिकाणी नित्य नवे श्रीदत्तकृपेने चमत्कार करीत असता महाराज चंद्रपुरी गेले. तेथे त्यांनी काही दिवस मुक्कामही केला व पुष्कळांस भक्तिमार्गास लाविले. असे चालू असता श्रावण शुद्ध ८ गुरुवार शके १८१३ रोजी महाराजांनी आपल्या देहास श्रीदत्तात्रेयात विलीन केले.

श्रीब्रह्मचारी नारायण गुरुदत्त महाराज यांचे बडोद्यास, तसेच अन्यत्र ठिकठिकाणी पुष्कळ शिष्यसमुदाय होता. त्यांचा मुक्काम बडोद्यास श्रीकावडीबाबा महाराज यांच्या चौखंडी रोड बडोदे, येथील मंदिरात, तसेच त्यांच्या समाधिमंदिरात होते असे.

त्यांच्या मुख्य शिष्यगणात श्रीमाधवराव बेहरे, लक्ष्मीबाई व सरस्वतीबाई पुराणिक, गं. लक्ष्मीबाई, जेजूरकरबाई व श्रीगणपतराव अप्पाजी पुणेकर हे होत. श्रीपुणेकर माजी सुधराई कामदार या हुद्यावर होते; त्यांनी ‘संतचरित्रे’ या नावाचा काव्यमय ग्रंथ लिहिला असून त्यात प्रथमच आपले गुरु नारायण महाराज यांचे काव्यमय चरित्र लिहिलेले आहे.

श्रीब्रह्मचारी नारायण गुरुदत्त महाराज यांची गुरुपरंपरा खालीलप्रमाणे आहे.

आदिनाथ-हरिमाय-भगवान-ब्रहमदेव-वशिष्ट-पराशर-व्यास-शुक-गरुडपाद-गोविंदाचार्य-शंकराचार्य-ज्ञानबोध (गिरी)-सिद्धगिरी-नृसिंहतीर्थ-विद्यातीर्थ-मालीयानंदन-कृष्णसरस्वती-राघवेंद्रसरस्वती-उपेंद्रसरस्वती-नृसिंहसरस्वती-राघवेंद्रबाबा-लक्ष्मणबाबा-सद्‌गुरुनारायण गुरुदत्त महाराज

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP