दत्तभक्त - दत्तमहाराज कवीश्वर
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(सन १९१०-१९९९)
दत्तमहाराज कवीश्वर हे योगीराज गुळवणी महाराज यांचे उत्तराधिकारी होते. यांचा जन्म दत्तभूमी नरसिंहवाडीस झाला. वक्रतुंडमहाराज, धुंडिराजमहाराज यांच्या कुळात दत्तमहाराजांचा जन्म झाला. कविश्वरांची परंपरा शास्त्री, पंडितांची होती. वासुदेवानंदसरस्वती यांची कृपा कवीश्वरांच्या कुटुंबावर होती. श्रीधरस्वामी यांचाही प्रभाव या कुटुंबावर होता. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी भागवताचा पहिला सप्ताह दत्तमहाराज यांच्याकडून करून घेतला. नृसिंहवाडी येथील दीक्षित स्वामींकडून वेदविद्येचे व संस्कृतचे पाठ दत्तमहाराजांना मिळाले. नैष्ठिक आचरण, मनाची ऋजुता, निरंहकार या गुणांमुळे दत्तमहाराजांचा लौकिक वाढला.
गुळवणी महाराजांच्या आज्ञेवरून दत्तमहाराजांनी त्यांच्या गादीचा स्वीकार केला. वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी सज्जनगड येथे दत्तमहाराजांना योगीराजांनी संकल्पदीक्षा दिली. दत्तमहाराज व्यासंगी होते. पण त्यांनी कधी आपला अभ्यास मिरविला नाही. वेदांत पारिजात-सौरभ या आचार्य निंबार्क यांच्या ब्रह्मसूत्रांवरील भाष्याचा अनुवाद कवीश्वरांनी केला. वासुदेवानंदसरस्वती यांच्या समग्र वाङमयाचे संपादन दत्तमहाराजांनी केले. चारित्र्य, भक्ती व दत्तसेवा या गुणांमुळे यांचे माहात्म्य वाढले. सर्व भारतात त्यांना शिष्य परिवार मिळाला.
दत्तमहाराज हे प्रकांड पंडित व साक्षात्कारी आध्यात्मिक सत्पुरुष म्हणून ओळखू जाऊ लागले. संस्कृत शास्त्रांचा त्यांचा व्यासंग व सखोल विद्वत्ता पाहून भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. विद्यावाचस्पती, राष्ट्रीय पंडित, महामहोपाध्याय या पदव्या त्यांना प्राप्त झाल्या. शंकराचार्यांनी त्यांना सुवर्णकंकण देऊन भूषविले. पुण्याच्या वासुदेवनिवासाचे ते प्रमुख होते. अनेकांना त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP