मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
रंग अवधूत

दत्तभक्त - रंग अवधूत

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १८९८-१९६८)

श्रीमत्‌ वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामी गुजरातेत दत्तभक्तीची गोडी निर्माण करून श्रीक्षेत्र गरुडेश्वरी ब्रह्मस्वरूपी लीन झाले. ही दत्तभक्तीची परंपरा त्यांचे शिष्य श्रीरंग अवधूत महाराजांनी वाढीला लावून गुजराती जनतेच्या ह्रदयात अढळ स्थान मिळविले. ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ भजनाने अवघा गुजरात घुमू लागला. दत्तभक्तीचा सुगंध जिकडेतिकडे दरवळू लागला. पैसा, मान, किर्ती यापलीकडे देखील एक आनंददायी विश्व आहे, याची जाण अधिकाधिक गुजराती जनतेला होऊ लागली.

त्या श्रीरंग अवधूत महाराजांचे पूर्वाश्रमींचे नाव पांडुरंग विठ्ठल वळाये. श्रीमहाराजांचे वडील विठ्ठलपंत हे धर्मपरायण, वेदपरायण व दशग्रंथी विद्वान्‌ ब्राह्मण. गुजारातेतील गोधरा या शहरात श्री. सखारामपंत सरपोतदार यांच्या विठ्ठलमंदिरात देवपूजेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ‘देवळे’ या गावाहून आले. विठ्ठल व रुक्मिणी या भाग्यशाली मातापित्यांच्या पोटी श्रीरंग अवधूत महाराज कार्तिक शुद्ध अष्टमीला गोपाष्टमीला जन्मले. (विक्रमसंवत १९५५)

बालपणापासूनच श्रीमहाराजांना जिज्ञासावृत्ती स्वस्थ बसू देईना, एकदा. दारावरून प्रेत चालले होते. वडिलांना त्यांनी अनेक प्रश्न विचारले. शेवटचा प्रश्न होता, ही जन्ममरणाची उपाधी दूर होण्यास उपाय कोणता? वडिलांनी सांगितले, श्रीरामनामामुळे उपाधी दूर होते. श्रीमहाराजांनी मनाशी खूणगाठ बांधिली. श्रीरंग अवधूत महाराज गुजरातील लिहितात ---

नाममंत्र मोटो छे जगमां, जगम-मरण भूत जाय;
मुक्ति सुंदरी दौडी आसे आकर्षण एवूं थाय !
हरिना नामनो सौथी मोरो छे आधार ।’

दिव्य, तेजस्वी अशा या योगभ्रष्ट आत्म्याला पूर्वजन्माची अपूर्व साधना पूर्ण करण्याची तीव्र तळमळ लागली; ईश्वराच्या भेटीची उत्कंठा साधनेच्या पायर्‍या भराभर चढू लागली.

पांडूरंग ५ वर्षांचे व धाकटे नारायण २ ॥ वर्षांचे असतानाच माता रुक्मिणीबाईच्या पदरात ही दोन बालके टाकून विठ्ठलपंत प्लेगला बळी पडून विठ्ठलचरणी विलीन झाले.

पांडुरंग ८ वर्षांचे झाले. देवळे गावी व्रतबंध झाला. उपनयनविधीनंतर श्रीनृसिंहवाडीला श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या दर्शनाला आले. श्रीटेंबेस्वामी म्हणाले, ‘हा बाळ तर आमचाच आहे.’ हे शब्द ऐकताच पांडुरंगांनी कपडयासकट श्रीचरणांवर मस्तक अर्पण केले. मार्ग स्पष्ट झाला. साधनेला धार चढू लागली. ‘धाव धाव दत्ता किती वाहूं आता । चैन नसे चित्ता येई वेर्गी ॥’ असे आर्त स्वर निघू लागले. ‘धेनु जेवीं वत्सा धाव दत्ता तैसा । तुजविण कैसा राहूं जगी? ॥’ म्हणून डोळ्यांतून प्रेमाश्रू येत. आणि त्या करुणानिधान परमात्म्याला करुणा आली. कानी शब्द पडले. ‘पोथी पहा !’ मामांच्याकडे श्रीगुरुचरित्राची पोथी होती. त्याची अखंड पारायणे सुरू केली. मन शांत झाले.

श्रीरंग अवधूत महाराजांची बुद्धी तेजस्वी, स्मरणशक्ती तीव्र होती. मराठी, गुजराती, इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. पदरी लहान भाऊ, विधवा माता यांच्या पालन पोषणाची जबाबदारी होती. म्हणून बी. ए. ची परीक्षा दिली. काही काळ शिक्षकाची नोकरी पत्करली. पण मन रमेना. मूळची वृत्ती फकिरी.

धाकटा बंधू नारायण आता मातेचे पोषण करण्यास समर्थ झाला, हे पाहून रुक्मिणीमातेची आज्ञा घेऊन श्रीपांडुरंग आध्यात्मिक तपाकरिता घराबाहेर पडले.
तपसी छोड दिया संसार । जैसी सूकर विष्ठा भाई ।
तैसे भवसुख भुजमन आई । दत्त दिगंबर मन लुभाई ।
तपसी छोड दिया संसार ॥


(अवधूती आनंद)

वैराग्याने संतप्त झालेल्यांना शांत करणार्‍या नगाधिराज हिमालयाच्या कुशीत विसावण्याकरिता स्वारी विघाली. पण ईश्वरेच्छा बलीयसी ! कानांवर शब्द आले. ‘मागे फीर, मागे फीर.’ अर्थ कळेना. पण श्रीसदगुरुवासुदेवानंद सरस्वतींची इच्छाच ‘मागे फीर’ म्हणत होती. गुजरातेत अपूर्ण राहिलेले दत्तसंप्रदायाचे काम पूर्ण कर, हाच आदेश तो होता, आणि म्हणून साधक-मुमुक्षूंची माता नर्मदाबाई जिच्या दोन्ही तटांवर असंख्य तीर्थक्षेत्रे आहेत, अशा एका तीरी श्रीगणेशांनी जेथे श्रीशिवलिंग स्थापन केले आहे, अशा श्रीनारेश्वर क्षेत्री त्यांनी निवास केला.

विक्रम संवत १९८१ च्या मार्गशीर्ष महिन्याच्या हेमंत ऋतूचे दिवस; कडाक्याची थंडी, कृष्णपक्षाची अंधारी रात्र, अशा वेळी मियागामकडून कोरलकडे जाणार्‍या गाडीतून मालोद स्टेशनवर (हल्लीचे नारेश्वर रोड) श्रीमहाराज उतरले. नारेश्वर हिमालयाची वाट चालू लागले. नारेश्वर शिवालयाचे समोर कडूनिंबाच्या झाडाखाली थांबले. नजर टाकली. काय होते तेथे? जेथे आज हजारो लोक उत्तम धर्मशाळेत राहतात, भोजनगृहात भोजत घेतात, नर्मदामाईच्या घाटावर स्नान करितात, रात्री विद्युतदीपांनी आसमंत उजळून जातो, अशा आजच्या नारेश्वरी ४५ वर्षांपूर्वी होते एक निबिड अरण्य ! जेथे दिवसा लोक जावयास भीत, ते होते आजूबाजूच्या गावांचे स्मशान ! मोठमोठी वारूळे, विषारी सर्प, विंदू, हिंस्र पशू यांचा वास असे ! नर्मदामाईच्या किंनार्‍यावर जावयास साधी पायवाट्देखील नव्हती. अशा निवासाचा लोभ त्यांना जडला.

जीर्ण शिवालयासमोरील निंबवृक्षाखालची भूमी हेच निवासस्थान ! अनुष्ठानाला सुरुवात झाली. खाण्यापिण्याची काळजी त्या भगवंताला “तन की सुधि न जिसको, जनकी कहाँसे प्यारे?” परमसदगुरु श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या ‘श्रीदत्तपुराणाची’ अष्टोत्तरशत पारायणे पूर्ण झाली. उद्यापनास द्रव्य नाही. सद्‌गुरुची आज्ञा झाली, १०८ दिवसांत नर्मदा-प्रदक्षिणा पुरी कर, म्हणजे तप:प्रधान उद्यापन होईल.

नर्मदाप्रदक्षिणेचा निश्चय ठरला. पण कानांत शब्द घुमू लागले,ज ‘ब्रह्मचारी, तू दक्षिणेकडे जा.’ गुरुमहाराजांची आज्ञा मानून चालू लागले. इकडे श्रीवासुदेवानंदसरस्वतींचे मराठी चरित्र ‘गुरूमूर्तिचरित्र’ गुजराती शिष्य श्री गांडामहाराज यांनी लिहिले होते. त्यांना सांगितले. ‘तू काळजी करू नको; एक ब्रह्मचारी तुझ्याकडे येत आहे.’ दोघांना अंतरीची ओळरव पटली. मराठी प्रत शुद्ध करण्याचे काम अंगावर घेतले.

बारा ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर येथून नर्मदा प्रदक्षिणेस सुरुवात झाली. रोज २५-३० मैल चाल होत असे. एकदा तर एका दिवसात ५६ मैल चालून गेले.

‘तेरो नाम ही गावत जाऊं, धाऊं रूप विशाल; कानोंमे तेरी ही चर्चा, और न शब्द विचार ! मुर्दा बन के फिरूं जगतमें, सार खराब निहार ! निर्विकार सदा नि:संगी, डरूँ न देखत काल !’

कशाची भिती, कशाची पर्वा, ना तहान, ना भूक ! गूळपाणी हाच पोटाला आधार ! बरोबरीचे लोक म्हणत. महाराज, कशाला हा कष्टप्रद प्रवास करता आहात? महाराज म्हणत, मला तर कष्ट वाटतच नाहीत; जिकडे तिकडे आनंदच आनंद भरून राहिलेला दिसतो.

नर्मदाप्रदक्षिणा म्हणजे दिव्यच आहे. एकदा बरोबरीच्या लोकांबरोबर चालले असताना लोक म्हणाले, ‘महाराज अस्वल आले.’ लोक घाबरले. महाराजांनी ‘गुरुदेव दत्त’ ही आरोळी ठोकल्याबरोबर अस्वल उडया मारीत निघून गेले.

पूर्वसंकल्पित श्रीगुरुआज्ञेप्रमाणे १०८ व्या दिवशी नर्मदाप्रदक्षिणा पूर्ण करून उद्यापनाची सांगती केली. यानंतर पूर्वी ठरल्याप्रमाणे श्रीगांडामहाराजांनी लिहिलेला ‘श्रीगुरुमूर्तिचरित्र ग्रंथ’ संशोधन करून भडोच शहरी छापवून घातला, आणि तेथेच १०८ श्लोक असलेले ‘वासुदेवनामसुधा’ हे श्रीटेंबेस्वामींचे जीवनचरित्र संक्षिप्त रूपाने लिहिले. नारेश्वरी श्रीमहाराजांचा कीर्तिसुगंध दरवळू लागला. आर्त, मुमुक्षू यांची रीघ लागली. जंगलचे मंगल झाले. श्रीदत्तजयंतीकरिता हजारो लोक येऊ लागले. पण नारेश्वराला खरे महत्त्व प्राप्त झाले ते श्रीरंग अवधूत महाराजांच्या पूज्य मातोश्रींच्या करिता ! संवत्‌ १९९२ मध्ये पू. मातोश्री नारेश्वरी राहण्यास आल्या. धाकटे बंधू नारायणराव हेही आजारी अवस्थेत नारेश्वरी आले. परंतु प्रभूची इच्छा निराळीच होती. नारायणरावांचा नश्वरदेह श्रीदत्तचरणी विलीन झाला.

नारेश्वरी दत्तकुटी तयार झाल्यावर बरेच आश्रम, धर्मशाळा बांधूज्न तयार झाल्या. महाराजांचे गुजराती भक्त त्यांना राजैश्वर्यात ठेवत होते. पण महाराजांची वृत्ती अत्यंत विरागी ! फक्त एक लंगोट हेच वस्त्र. द्रव्यस्पर्श सहन होत नसे.

प्रतिवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमा-गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुद्वादशी, गुरुप्रतिपदा, दत्तययंती तर फारच थाटात होत असे. पुढे पुढे दरवर्षी महाराज एरवाद्या गावी जाऊन तेथे दत्तजयंती साजरी करीत. यामुळे अनेक गावांतील लोकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळे. कार्तिक शुद्ध नवमी (कूष्मांडनवमी) हा महाराजांचा जन्मदिवस. रंगजयंती या नावाने गुजरातमध्ये हा दिवस प्रसिद्ध आहे. दरवर्षी निरनिराळ्या गावी हा होत असतो.

डाकोर, द्वारका व नारेश्वर येथील ६० वी रंगजयंती तर फारच थाटाची झाली. ह्जारो भक्त या रंगजयंतीत सामील होत. मोठया प्रमाणावर अन्नदान होते. महाराजांना फुलांचे निरनिराळे पोषाख करून घालणे हा तर गुजराती भक्तांचा आवडता छंद ! श्रीकृष्णाकडे जसे व्रजवासी आकर्षित होतात. तसे सर्व गुर्जर बंधु-भगिनी श्रीमहाराजांकडे आकर्षित होत असत. महाराज कधी प्रवचन करीत नसत. अनेक वेळा तर त्यांचे मौनच असे. पण सहज बोलता बोलता भक्तांना मार्गदर्शन होई,

महाराजांच्या मातोश्रींची तब्येत बरी नसे. अनेक भक्त प्रवासासाठी त्यांना विचारत. आमच्या गावी या, हा लकडा लागे. पण ‘मातृदेवो भव’ हा भाव मनी असल्यामुळे आईची परवानगी घेतल्याखेरीज ते कोठेही जात नसत.

महाराजांनी काही गुजराती भक्तांबरोबर १९५० साली गाणगापूर, नृसिंहवाडी. औदुंबर, पंढरपूर, अक्कलकोट वगैरे तीर्थक्षेत्री याता केली. यानंतर त्यांनी तर माणगावी श्रीटेंबेस्वामींच्या जन्मग्रामी मोठया प्रमाणात श्रीदत्तजयंती साजरी केली. श्रीटेंबेस्वामींच्या समाधिस्थानी-गरुडेश्वरी-तर दर आषाढ शुद्ध प्रतिपदेला उत्सवासाठी ते जात. श्रीमहाराज ज्या दिवशी हीरद्वारला समाधिस्थ झाले त्याच दिवशी पहाटे गरुडेश्वरी सदगुरूच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेले तेथील एका सेवकाने पाहिले. श्रीमहाराज भक्तांची कामना पूर्ण करण्यासाठी गुजरातेतील अनेक गावी जात. मुंबईला १९६५ साली मोठा दत्तयाग माधवबागेत झाला, त्यावेळेस ते तेथेच उपस्थित होते. १९६७ साली श्रीमहाराज आफ्रिकेतील भक्तांच्याकरिता नैरोबी, कंपाला या ठिकाणी ४-६ महिने जाऊन आले.

महाराजांनी गुजराती, मराठी व हिंदी भाषांत विपुल साहित्य निर्माण केले. मराठीत गुरुचरित्रग्रंथ आहे. त्याचप्रमाणे गुजरातीत त्यांनी ‘गुरुलीलामृत’ ग्रंथ लिहिला. यामध्ये श्रीगुरुचरित्र, (सरस्वती गंगाधर) श्रीगुरुमूर्तिचरित्र, (गांडामहाराज) यांचा समावेश आहे. हा ग्रंथ ज्ञान, कर्म व उपासनाकांड या तीन भागांत आहे. गुरुराती भक्त याची अरवंड पारायणे करतात. दत्तबावनी-श्रीगुरुचरित्राची ५२ श्लोकांची ही गुजराती दत्तबावनी फक्त तीन मिनिटांत म्हणून होते. लाखो गुजराती भक्त दररोज ही दत्तबावनी म्हणतात. एका भक्ताचे संकट निवारण्यासाठी श्रीमहाराजांनी ही द्त्तबावनी लिहिली. भक्ताचे संकट दूर झाले व तीच दत्तबावनी संकटकालात लाखो श्रद्धावान्‌ भक्तांचा आज आधार बनली आहे. या दत्तबावनीच्या जोरावर भक्तांमध्ये अपूर्व आत्मविश्वास निर्माण होऊन कोणत्याही संकटातून पार पाडण्याचे सामर्थ्य अंगी येते. जेथे जेथे गुजराती दत्तभक्त आहेत तेथे तेथे दत्तबावनी आहेच. महाराजांनी अनेक गुजराती भजने प्रासादिक भाषेत लिहिली आहेत. हजारो भक्त दररोज ती म्हणतात. अवधूती आनंद, अवधूती मस्ती, ग्राम अवधूत, ऊभो अवधूत, बेठो अवधूत त्याचप्रमाणे हिंदी अवधूती मौज हे भजनांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. दत्तनामसंकीर्तन, श्रीदत्तपंचपदी, उष:प्रार्थना; या छोटया पुस्तिका नित्य उपासनेसाठी आहेत. उपनिषदोनीवातो, पत्रगीता, संगीतगीता, आत्मचिंतन, दत्तउपासना, अबुध अवधूत, नित्यस्तवन, अष्टगरबी, डाकोरमाहात्म्य, हालरडा वगैरे पुस्तके प्रसिद्ध आहेत.

महाराजांनी मराठीत श्रीवासुदेवसप्तशती ही ७०० श्लोकांची पोथी लिहिली आहे. रंगतरंग हे भजनाचे पुस्तक आहे. अभंग तर अत्यंत रसाळ आहेत. आर्त भाव व्यक्त होतो, देवापाशी मागणे हेच की, ‘न मिळो अन्न, वस्त्र प्रावरण । परि दत्त जाण अंतरीं ना ॥ कवडीमोल धन होवो नि:संतान । न राहो निशान कोण रडे ॥ हेंचि मागो देवा दे गा संतसेवा । अंतरीं केशवा ठाण देईं ॥’ संस्कृत भाषेत त्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली आहेत. रंगह्रदयम्‌ या सुप्रसिद्ध ग्रंथात त्यांनी अनेक स्तोत्रे लिहिली आहेत. श्रीवासुदेवनामसुधा, दत्तनामसंकीर्तन, सद्‌बोधशतकम्‌, बोधमालिका, दत्तनामस्मरणम्‌, स्तोत्रषट्‌कम्‌ वगैरे पुस्तके संस्कृतमध्ये आहेत.

श्रीमहाराजांविषयीही अनेक भक्तांनी ग्रंथ लिहिले आहेत. सौ. भागिरथीबाई ऋषी यांनी मराठीत व डॉ. वाणी यांनी गुजराथीत चरित्र लिहिले आहे. मराठी-गुजरातीत रंगबावनी आहे. रंगस्तवन, नारेश्वरनो संत, अवधूतदर्शन, अवधूतस्मरण, अलौकिक अवधूत, रंगचिंतामणी, श्रद्धानुफळ, श्रीअवधूतप्रशस्ती, रंगप्रशस्ती, रंगमंगलमालिका व सरतेशेवटची श्रद्धांजली वगैरे पुस्तके प्रसिद्ध आहेत. यांशिवाय प्रवासी अवधूत, सप्ताहमाथी, सप्ततीर्थी वगैरे प्रवासविषयक माहितीने परिपूर्ण अशी पुस्तके आहेत. श्रीमहाराजांची ६० वी रंगजयंती नारेश्वरला साजरी झाली होती, त्यासंबंधी तसेच डाकोरची रंगजयंती, यांसंबंधी माहितीपूर्ण पुस्तके निघाली आहेत.

श्रीमहाराजांनी काळाची पावले ओळरवून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम नोरश्वरी घडवून आणले. त्यांपैकी एक म्हणजे १९६५ साली पाकिस्तानशी युद्ध सुरू झाल्यावर रायफल क्लब चालू करून एक शिबीर भरविले. दुसरे शिबीर म्हणजे. शस्त्रक्रिया-शिबीर. गुजरातमधील नामांकित शस्त्रवैद्यांकडून गोरगरीबांच्या अनेक शस्त्रक्रिया मोफत करविल्या.

मातोश्रींच्या प्रकृतीला आराम पडेना, अनेक उपाय झाले. ‘न मातु: परदैवतम्‌’ म्हणून अनेक प्रकारे त्यांनी सेवा केली. आईसाठी म्हणून श्रीमहाराज नारेश्वरपासून फारसे दूर कधी गेलेच नाहीत. अखेर निर्जळा एकादशीच्या दिवशी पू. मातोश्री श्रीविठ्ठलचरणी लीन झाल्या. महाराजांनी सर्व विधी यथासांग केले.

यानंतर भक्तांच्या इच्छेप्रमाणे आफ्रिकेला जाऊन परत आल्यानंतर त्यांनी मातोश्रींचे प्रथम वर्षश्राद्ध केले. पू. मातोश्रींच्या मुळे गुजरातला श्रीरंगअवधूत महाराजांचा लाभ झाला. म्हणून पू. मातोश्रींना भक्त फार मान देत, प्रथम वर्षश्राद्धदिनी २०-२५ हजार भक्तांनी महाप्रसाद घेतला.

श्रीमहाराजांचे सर्व लौकिक पाश तुटले. ‘हम सदा नि:संगी हैं’ म्हणणारे महाराज निर्वाणीची भाषा काढू लागले. १९६८ मधील ऑक्टोबर महिन्यात त्यांनी नारेश्वर सोडले ते कायमचेच. हरिद्वारला जावयाचे म्हणून महाराज निघाले.

अवधूतआश्रमाचे ट्रस्टी श्री. मोदीकाका, एक महान्‌ भक्त, कार्यरत सेवक यांना काय कल्पना की, महाराजांचा पार्थिव देह येथे नोव्हेंबरमध्ये परत येणार आहे. नारेश्वर सोडताना महाराज म्हणाले, मी नारेश्वरी आलो तेव्हा एक लंगोटी अंगावर होती. आता जातानाही फक्त लंगोटी अंगावर आहे. सर्व वैभव, राजविलासी ऐश्वर्य सोडून ममत्व न ठेवता महाराज निघाले अनंतात विलीन व्हावयाला ! नारेश्वरनंतर अनेक गावी भक्तांना दर्शन देत देत गुरुद्वादशीला ते अरेरा गावी आले. नडियादजवळ हे गाव आहे. नंतर कापडगंज वगैरे गुजरातेतील गावांनंतर जयपूरला आले. एक भक्त म्हणाला, मी हरिद्वारला तुमच्याबरोबर येतो. महाराज म्हणाले, हरीच्या दारी गेलेला परत येत नाही. यावयाचे असेल तर या ! हरिद्वारला फक्त ४-५ भक्त बरोबर होते. सर्व तीर्थे बघितली. सकाळी साधूंना भोजन दिले. १९ नोव्हेबर, मंगळवारी १९६८ ला रात्री ९ वाजता भक्तांना सांगितले, घशात काहीतरी होत आहे. भक्त मंडळींना कल्पना येण्याच्या आधीच श्रीमहाराज श्रीदत्तचरणी विलीन झाले. लाखो भक्तांचा लाडका संत समाधिस्थ झाला. बडोदा, अहमदाबाद, नारेश्वरला ट्रंक लागले. त्याच दिवशी दिल्ली, अहमदाबाद, बडोदा रेडिओने बातमी दिली. अवघा गुजरात ढसढसा रडावयास लागला. रात्रभर भक्तांना चैन पडेना. श्रीमहाराजांचे अंतिम दर्शन कसे व्हावयाचे याची चिंता लागून राहिली. हरिद्वार शेकडो मैल दूर ! ट्रस्टींनी ठरविले की, महाराजांचा पार्थिव देह नारेश्वरी आणावयाचा ! काही मंडळी हरिद्वारला विमानाने गेली. दिल्लीहून अहमदाबादपर्यंत विमानाने आणले व अहमदाबाद ते नारेश्वर शृंगारलेल्या ट्रकवर आणून लाखो भक्तांना दर्शन दिले. अहमदाबाद, बडोदा, सुरत, नडियात, आणंद कडून दिवसभर २५ हजार भक्त आले. रात्री १२ ला नर्मदामाईच्या स्नानानंतर चंदनकाष्ठावर देह ठेवून अग्निसंस्कार केला. कडक थंडी, पण भक्तांचा महापूर लोटला होता. भक्तांना अंतिम दर्शन मिळाले. १२-१३ दिवसांपर्यंत लाखो भक्त नारेश्वरी य़ेऊन श्रद्धांजली वाहून गेले.

श्रीमहाराजांच्या प्रथम वर्षश्राद्धदिनी भक्तांनी सुंदर मंदिर बांधले आहे. मातृमंदिरासमोरच मातृभक्त पुत्राचे मंदीर ! श्रीमहाराज लौकिक अर्थाने समाधिस्थ झाले. पण भक्तांच्या ह्रदयात ते आहेत.

हजारो गुजराती बांधवांच्या तोंडी रंग अवधूत खालील धूनेच्या स्वरूपात आहेत.

रंग अवधूत रे. रंग अवधूत रे ॥
नारेश्वरनो नाथ मारो रंग अवधूत रे ॥
गाणगापूरमां वसे मारा नरसिंह सरस्वती रे ।
अक्कलकोटमां वसे मारा स्वामी श्रीसमर्थ रे ॥
गरुडेश्चरमां वसे मारा वासुदेवानंद रे ।
शिरडीमां वसे मारा साईनाथबाबा रे ॥
रंग अवधूत रे, रंग अवधूत रे ।
नारेश्वरनो नाथ रंग अवधूत रे ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP