(सन १८८५-१९४५)
कर्नाटकातील शिंदगी गावच्या एका दत्तभक्तिसंपन्न अशा घराण्यात भीमराव व लक्ष्मी यांच्या पोटी एका तेजस्वी मुलाचा जन्म शके १८०७ मध्ये झाल. विजापूर जिल्ह्यातील बागलकोट हे त्याचे जन्मस्थान होय. या बालकाचे नाव नारायण ठेवण्यात आले. लहानपणीच नारायणाचा पिता व नंतर लौकरच त्याची माता यांचे निधन झाले. नरगुंद येथे आजीच्या देखरेखीखाली नारायण वाढू लागला. व्यंकटेशाच्या देवळात बसून ध्यान करावे, भजन-कीर्तनात रंगून जावे, डोंगरावरील गुहेत ध्यानस्थ बसावे. असा नारायणाचा छंद होता. नरगुंद येथील दरेकर यांच्या घरी नारायण असताना श्रीधरभट घाटे यांच्या सहवासात त्याला उपासनेची गोडी लागली. नित्य स्नानसंध्या, सूर्यनमस्कार, गुरुचरित्रपठण, यायत्रीमंत्राचा जप यांत तो रमून जायचा. घरगुती कटकटींमुळे नारायणास अल्पवयातच आजीचे घर सोडावे लागले.
वयाच्या दहाव्या वर्षापासून नारायणाची भ्रमंती सुरू झाली. कुंदगोळ, यल्लमा डोंगर, सोगर, विजापूर, उगुरगोळ, गुर्लहसूर, हुबळी इत्यादी ठिकाणचा त्याने प्रवास केला. हुबळीस सिद्धारूढ स्वामींचा आशीर्वाद घेऊन नारायण बेळगाव शहराकडे आला. बेलापूरचे श्रीविद्यानंद महाराज हे त्या वेळी शहापुरास होते. याच श्रीविद्यानंदस्वामींची परंपरा बालनारायणाने चालवावी असा संकेत होता. नृसिंहवाडी, औदुंबर, पलुस, सज्जनगड येथील प्रवास संपवून नारायण पुण्यास आला. त्यानंतर तो दौंडजवळच्या आर्वी मुद्गलेश्वर नावाच्या क्षेत्रास गेला. या वेळी त्याच्याजवळ कोपरगावचे त्र्यंबकराव अत्रे, कुलकर्णी होते. त्यांच्या पत्नीस पिशाचबाधा होती, ती दूर व्हावी म्हणून ते आर्वीस उपासन करीत होते. येथेच नारायणास गाणगापुरास जाण्याचा दृष्टांत झाला. दत्तकृपेकरूनच पोरवाडीच्या जहागीरदाराने मदत केल्याने नारायणास गाणगापुरास येणे सुलभ झाले. नारायणाच्या दैवी सामर्थ्याचा प्रत्यय आता लोकांना येत राहिला. गुरुचरित्रपारायण, ध्यानधाराणा, उपासना यांत नारायण रंगून गेला असताना त्याचे चुलतबंधू शंकरदेव संती गाणगापुरास आले. त्यांनाही नारायणाचे सामर्थ्य पटले. नारायण हा साक्षात् दत्तावतार असल्याची साक्ष अनेकांना पटत गेली. श्रीदत्ताच्या आज्ञेवरून नारायण पुन: आर्वीस आला. बालनारायण हा वाळूच्या खडयांची खडीसाखर करतो. हे पाहून लोकांना नवल वाटत राहिले. पुढे सुप्याचे सदाशिव गणेश देशपांडे, वढारकर यांच्याबरोबर नारायण सुप्यास आला. सदाशिव ऊर्फ नानासाहेब व त्यांच्या पत्नी उमाबाई यांची श्रद्धा नारायणावर होती. जवळच्याच जुन्या बेटात झोपडी बांधून नारायणाची उपासना सुरू झाली. त्याच्या दैवी प्रभावामुळे लोक त्याला नारायण महाराज म्हणून ओळखू लागले.
याच जुन्या बेटात औदुंबर वृक्षारवाली दत्तपादुका त्यांना सापडल्या. सांजसकाळ पादुकांची पूजाअर्चा होत राहिली. दत्तप्रभूंच्या नावाची गर्जना करताच नारायण महाराजांच्या हातातून गंगेची धार निघत असे. नारायण महाराजांच्या जुन्या बेटास जाण्यासाठी केडगाव केडगाव येथे उतरावे लागे. नाना गावचे लोक त्यांना नारायणमहाराज केडगावकर या नावानेच ओळखू लागले. मुंबईच्या विख्यात गायिका अंजनी मालपेकर या एक थोर गायिका व नर्तकी होत्या. त्यांचा आवाज बसला. कोणत्याही इलाजाने गुण येईना. नारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांना गुण आल्यावर अंजनीबाईंनी त्यांना गुरुस्थानी मानले. मुंबईस त्यांच्या ‘श्रीनारायण-आश्रम’ मध्येच महाराजांचा मुक्काम असे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपल वुडहाऊस एकदा बेटास शिकारीसाठी आले. त्यांना हवे होते त्याठिकाणी महाराजांनी पाणी काढून दिल्यामुळे महाराजांचा लौकिक सार्या भारतात वाढला. वुडहाऊसनी हा चमत्कार वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्यामुळे बेटाकडे लोक सतत येत राहिले. अनेक थोर लोक नारायणमहाराजांच्या परिवारात येत राहिले. अनेकांनी महाराजांच्या सहवासासाठी बेटावर बंगले बांधले.
नव्या बेटावर आता दत्तसंस्थान नावारूपास येत राहिले. निवडुंग व खाचखळगे यांनी भरलेली नऊ दहा एकरांची जमीन नारायण महाराजांना मिळाली. खानदेशा. मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी ठिकाणांहून संपत्तीचा पूर लोटला, इमारतींसाठी सामानसुमान आले. बेट नारायण महाराज या नावाने एक ब्रँच पोस्ट ऑफीस सुरू झाले. अत्यंत शोभिवंत अशा संगमरवरी दगडांचे दत्तमंदिर उभे राहिले. कोठी, स्वयंपाकगृह, अन्नपूर्णागृह, निवासस्थान यांची निर्मिती झपाटयाने होत गेली. मुंबईच्या गणपतराव म्हात्रेकडून सुंदरशी दत्तमूर्ती लाभली. दत्तस्थापनेचा दिवस वैशाख शु. ५ शके १८३५ (सन १९१३) हा ठरला. काशी, म्हैसूर. काठेवाड इत्यादी ठिकाणांहून वैदिक ब्राह्मण जमा झाले आणि मोठया थाटाने नव्या दत्तमंदिरात दत्तमूर्तीची स्थापना झाली. जुन्या बेटातील मूर्ती पुण्यास अर्काटकर यांनी आपल्या ‘श्रीपाद-आश्रम’या निवासस्थानी बसविली. यानंतर महाराजांनी काशी, गया, प्रयाग, नेपाळ येथील प्रवास केला. नेपाळनरेशांनी महाराजांचा गौरव करून विविध वस्तू देणग्या म्हणून दिल्या. महाराजांच्या वैभवात अशीच देणग्यांची नित्य भर पडत होती. सोन्याची दत्तमूर्ती, चांदीचे सिंहासन, चांदीची पालखी, भरजरी गालिचे इत्यादी वस्तूंच्या देणग्या सतत मिळत गेल्या. सन १९३२ मध्ये द्त्तमंदिरापुढे भव्य मंडप बांधून तयार झाल. सन १९३६ साली बेटावरील लिंबाच्या झाडीत भव्य मंडप टाकून ११०८ सत्नारायणाच्या पूजा मोठया थाटाने झाल्या. बेटावर जणू एक नवे शहरच वसले होते.
यानंतर नारायण महाराजांनी दोनशे भक्तांज्ना बरोबर घेऊन मोठया ऐश्वर्याने तीर्थयात्रा केली. इंदूरजवळील ओंकारमांधाता, उज्जयनी, मदुरा, श्रीरंगम्, चिदंबरम, शिवकांची, विष्णुकांची, मद्रास, तिरुपती, जगन्नाथपुरी, कलकत्ता, नवद्वीप, गया, बद्रीनारायण, दिल्ली इत्यादी ठिकाणी महाराजांची तीर्थयात्रा मोठया थाटाने व ऐश्वर्याने झाली. सन १९४२ साली द्वारका, प्रभासपट्टण, सोरटी सोमनाथ, पोरबंदर, डाकोर अशा ठिकाणचा प्रवास महाराजांनी केला. अनेक राजे-महाराजे नारायणमहाराजांपुढे लीन असत. बेट केडगावचे वैभव वाढत होते. भजन, नामस्मरण आणि दैवी चमत्कार यांमुळे त्यांचा लौकिक एकसारखा वाढत होता. अंजनी मालपेकर, विष्णु दिगंबर पलुस्कर, नेपाल, ग्वाल्हेर, इंदूर, वासदा, पोरबंदर, म्हैसूर, भोर इत्यादी ठिकाणचे संस्थानिक डॉ. बेलसरे, आबासाहेब मुजुमदार, हिराचंद शेठ इत्यादींची नारायणमहाराजांवर मोठी श्रद्धा असे. त्यांच्या प्रेरणेतून अनेकांना दत्तभक्तीची दीक्षा मिळाली.
सन १९४२-४३ च्या दुसर्या महायुद्धाच्या काळात महाराजांची प्रकृती खालावली. अँनिमियामुळे ते अशक्त बनले होते. सन १९४५ मध्ये त्यांचा एकसष्टावा वाढदिवस थाटाने साजरा झाल्यानंतर त्यांनी हवापालट म्हणून उटकमंड व निलगिरी येथे जाण्याचा बेत केला. गुंटकलवरून ते बंगलोरला निघाले. बंगलोर, म्हैसूर, उटकमंड येथील वास्तव्याने महाराजांची प्रकृती सुधारली नाही. म्हैसूरहून परत ते बंगलोरला आले. तेथील ग्रामदेवता मल्लिकार्जुनास महाराजांनी अतिरुद्राचा अभिषेक केला. सोन्याची एकशे अकरा कमळे देवास वाहण्यात आली. महाराज अतिशय थकून गेले होते. पूर्णाहुती झाल्यावर ब्राह्मण भोजनास बसले असल्याचे कळताच संकल्प पूर्ण झाला असे समजून महाराजांनी आपला आत्मा दत्तस्वरूपात विलीन करुन टाकला. त्याच गावी त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार झाले. लाखो लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना अखेरचे वंदन केले. केडगाव बेटात ज्या ठिकाणी महाराज निवासस्थानी बसत, त्या ठिकाणी अस्थींचा कलश स्थापन करण्यात आला. काही दिवसांनंतर रीतसर समाधिस्थान तयार करवून तेथे पादुकांची स्थापना झाली.