मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
आणखी काही दत्तभक्त

दत्तभक्त - आणखी काही दत्तभक्त

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

ज्या दत्तावतारी पुरुषांनी वा दत्तभक्तांनी आपली एक विशिष्ट अशी परंपरा निर्माण केली, वाढविली, त्यांचा ओझरता परिचय आतापर्यंत आपण करून घेतला. अजूनही ज्ञात अथवा अज्ञात असे अनेक सत्पुरुष असतील. दत्तदैवताचे वा पंथाचे सर्वसंग्राहक रूप लक्षात घेता नाना जातींचे वा धर्मांचे लोकही दत्ताचे उपासक दिसतात. या सर्वांची नोंदही घेणे अशक्य असले तरी येथे आणखी काही थोडया भक्तांचा निर्देश करू. दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना मलंग वा फकीररूपात दर्शन दिल्याचे आपणांस माहीत आहे. दत्तोपासनेत एक विशिष्ट परंपरा निर्माण करणार्‍या शहादत्त अलमा प्रभूच्या प्रेरणेची ऐतिहासिक चिकित्सा व्हावयास हवी. माणिकप्रभूंच्या परिवारात अनेक मुसलमान दत्तभक्त असल्याचे आपण पाहिले आहेत. नूरी महाराज (सन १८६९-१९२३) हा एक थोर दत्तभक्त मुसलमानी धर्माचा होता. इस्लामी परंपरा त्याला दत्ताचा अवतारच मानते. आशियामायनर अथवा बगदादकडून यांचे घराणे भारतात आले. उत्तर प्रदेशात या घराण्यास चांगला मानही होता. यांचे वडील शिपाई म्हणून ब्रिटिश सैन्यात अहमदाबाद येथे चाकरीस लागले. यांना स्वत:च्या उतारवयात निजामउद्दिन अवलियाच्या कृपेने पुत्र झाला; तोच नूरीबाबा होय. कोणा एका फकीराने या पोरामधील दैवीशक्ती जाणून त्याचा विकास केला. यांच्या कविता हिंदी भाषेत आहेत. यांनाही हिंदू व मुसलमान शिष्य होते. मुंबईजवळ ठाण्यास नूरीबाबांचे वास्तव्य असे. आजही तेथे त्यांचा दर्गा प्रसिद्ध आहे.

श्रीवासुदेवानंदसरस्वतींच्या शिष्यपरंपरेत अनेक नावे चमकदार दिसतात. त्यात श्रीयोगानंद सरस्वती ऊर्फ गांडा महाराज (सन १८६९-१९३८) या नावास विशेष महत्त्व आहे. यांचा जन्म सुरतेजवळ तेलंगपूर येथील. यांचे नाव कल्याण असले तरी वृत्तीच्या लहरीमुळे ‘गांडा’ म्हणजे वेडसर अशा नावानेच हे प्रसिद्ध झाले. सन १८९७ मध्ये वासुदेवानंदांनी त्यांना दीक्षा दिली. गुरुभक्तीचा एक आदर्श गांडामहाराजांनी उभा केला. ‘गांडा सम गुरुभक्त ना दीटो बीजो क्यांय’ असे यांच्या संबंधाने म्ह्टले जाते. गुजराती व मराठी भाषांत यांची काही पुस्तके आहेत. ‘श्रीगुरुमूर्ति चरित्र’, ‘स्त्रीधर्मनिरूपण’ ‘श्रींचे चरित्र’ अशा काही पुस्तकांचा उल्लेख करता येण्यासारखा आहे. वासुदेवानंदांच्या समाधीनंतर श्रीगांडामहाराज गोदावरीतीरी गुंजग्राम गावी स्थायिक झाले. त्यांची समाधी येथेच आहे. वासुदेवानंदसरस्वतींनी आणखी एका थोर भक्तांवर कृपा केलेली दिसते. नरसिंहसरस्वती अथवा दीक्षित स्वामी (सन १८६६-१९२७) या एका वैराग्यशील दत्तभक्ताने दत्तसंप्रदायाची चांगली जोपासना केलेली दिसते. घराण्यातील दत्तोपासनेचे व्रत वासुदेवानंदांच्या प्रेरणेने वाढीस लागले. ‘जे एकमेवाद्वितीय परब्रह्म भक्तोद्धारार्थ भूतली अवतरले, ज्याला श्रीदत्त नरसिंहसरस्वती हे नाम आहे, तेच नरसिंहसरस्वती तुम्ही आहां’ असा यांना वासुदेवानंदांचा आशीर्वाद होता. यांची काही संस्कृत स्तोत्रे, ‘गुरुशिष्यसंवाद’ नावाचे मराठी गद्य प्रकरण अशी थोडीफार वाङमयसेवाही आहे.

अक्ललकोटच्या स्वामी समर्थांनी अनेकांना प्रेरणा दिल्याचे आपण पाहिले आहेच. आळंदीचे स्वामी, हरिभाऊ (स्वामीसुत), कृष्णसरस्वती दत्तमहाराज, आनंदनाथ महाराज, काळबुवा, वामनबुवा वामोरीकर, तातमहाराज, सच्चिदानंदस्वामीमहाराज (सिनोर), देव मामलेदार, सीताराममहाराज मंघळवेढेकर, बाळप्पा महाराज, गंगाधर महाराज; हा सर्व परिवार स्वामी समर्थांचाच. पुण्याचे श्रीरामानंदमहाराज बीडकर (सन १८३८-१९१२) हे स्वामींचे आणखी एक शिष्य. लहानपणापासून यांना देवभक्तीचे वेड. व्यवसाय सुगंध्याचा. हाती पैसा भरपूर; म्हणून व्यसनाधीनता. परंतु स्वामीसमर्थांच्या प्रेरणेतून मूळची सतप्रवृत्ती पल्लवित झाली. स्वामींच्या सांगण्यानुसार नर्मदापरिक्रमा घड्ली. काशी, प्रयाग, औदुंबर, नरसिंहवाडी अशी तीर्थयात्रा झाली. प्रपंच व परमार्थ या दोनही अंगांचे विविध अनुभव घेऊन हे शके १८३४ मध्ये समाधिस्थ झाले. पुण्यात शनिवारपेठेत नदीकाठी यांचा मठ आहे. यांच्या शिष्यांत रावसाहेब उर्फ बाबा सहस्रबुद्धे (सन १८८३-१९५४) हे एक नाव महत्त्वाचे असून परमार्थवृत्तीत रंगून जाणारे यांचे व्यक्तित्त्व होते. यांचाही आश्रम पुण्यास मॉडेल कॉलनीत आहे.

मुंबईस राहून गिरणी कामगारांची दु:खे दूर करून, त्यांना जागृत करून दत्तोपासनेचे वेड लावणार्‍या श्रीपद्‌मनाभस्वामी महाराज (सन १८४९-१९१२) यांचाही निर्देश येथेच करायला हवा. यांचा जन्म तुंगभद्रा नदीच्या तीरावरील अंजारपेट येथे झाला. घराण्यात दत्तोपासना होती. मातेच्या कृपाछत्राखाली हे ऐन वयात मुंबईस आले व अनेक नोकर्‍यांचे अनुभव घेऊन शेवटी त्यांनी गिरणीत नोकरी धरली. संसारबंधन लौकरच संपल्यामुळे त्यांनी आपल्या पारमार्थिक धाग्याची जोपासना दत्तकृपेसाठी व दीनदुबळ्या मजुरांच्या उद्धारासाठी केली. नाशिकचे श्रेष्ठ संतपुरुष श्रीदेव मामलेदार (श्री. यशवंतराव महाराज) यांनी त्यांच्यावर कृपा केली आणि ‘गोविंद’ नावाचा हा सत्पुरुष श्रीपदमनाभस्वामी म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांनी आपले कार्यक्षेत्र करी रोड स्टेशननजीकचे ठरविले. श्रमजीवी लोकांना सन्मार्ग दाखवून त्यांनी त्यांच्या विसाव्यासाठी एक दत्तमंदिरही उभारले. कामगारांच्या सेवेत राहून व त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवून स्वामीजी २६ जानेवारी १९१२ रोजी दत्तचरणी विलीन झाले.

त्यांची समाधी पालघरनजीक टेंभेवडे गावी आहे. का. म. ताम्हनकर यांनी श्रीपदमनाभस्वामींचे चरित्रही लिहिले आहे. या पदमनाभ स्वामींची परंपरा आजकाल मोठया प्रमाणावर नांदत आहे. पदमनाभ स्वामींचा प्रभाव कोकणात व गोमंतकावर मोठा आहे. रघुनाथ स्वामी व ठमाबाई यांच्या पोटी पदमनाभ यांचा जन्म झाला. आईवडिलांनी तुंगभद्रेच्या काठी पुत्रकामेष्टी यज्ञ करून तपश्चर्या केली होती. नारदाचार्य यांच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न झाले. बाळपणीच यांची बुद्धी तीव्र असून वृत्ती वैराग्यशील होती. संस्कृतचे शिक्षण यांनी लहानपणी घेतले आणि चरितार्थासाठी ते मुंबईस आले व एका कापडगिरणीत त्यांनी नोकरी पत्करली, कामगारांचे जीवन जवळून पाहिले. काही दिवस शिक्षणखात्यातही त्यांनी नोकरी केली. पुढे ताराबाई नावाच्या स्त्रीशी त्यांनी विवाह केला.

जगातील सर्व धर्मांचा अभ्यास त्यांनी केला होता. त्यांचे भ्रमण सर्वत्र असल्यामुळे त्यांना लोकांची स्थिती नजरेसमोर होती. भट-भिक्षुक, पंडये-बडवे, भोंदू-साधुसंत यांच्या मिठीतून त्यांना लोकांना मुक्त करावयाचे होते. मुंबईतील परळ, लालबाग, काळाचौकी, करी रोड, प्रभादेवी इत्यादी ठिकाणच्या कामगारांमध्ये त्यांनी प्रचार केला. दारू, गांजा, अशी मादक द्रव्ये घेऊ नयेत असा त्यांचा उद्देश होता. ब्रह्मानुभव, भक्तिरसधारा, अमृतविचार, अभंगावली इत्यादी त्यांचे ग्रंथ आहेत. ‘जातवेल’ नावाचा त्यांचा एक ग्रंथ संप्रदायात मान्य आहे. यांच्या पंरपरेत सुसेन महाराज, सदानंद महाराज आणि ब्रह्मानंद महाराज यांनी फार मोठे कार्य केले.

अगदी अलीकडे म्हणजे १९९८ मध्ये या संप्रदायातील पदमनाभस्वामी यांची शतकोत्तर सुवर्णजयंती व ब्रह्मानंदाचार्य यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा मोठया थाटाने साजरा झाला या निमित्त सद्‌गुरुचरणामृत नावाची एक उपयुक्त पुस्तिका तयार झाली आहे. गोव्यातील कुंडई येथील ‘श्रीक्षेत्र तपोभूमी’ आश्रम आता प्रसिद्ध झाला आहे. याच पदनाभस्वामींच्या परंपरेत चिंचखरीस (रत्नागिरी जिल्हा) भंडारी समाजातील बोरकर नावाच्या एका घराण्यातील ‘श्रीगजाननमहाराज’ (समाधी सन, १९६०) यांनी दत्तभक्तीचे रोपटे रुजविले, वाढविले. चिंचखरीस गाणगापुराचे महत्त्व श्रीगजाननमहाराज बोरकर यांच्यामुळेच आले. गुरुचरित्राची पारायणे, अखंड नामसप्ताह, कीर्तने व प्रवचने यांनी हा परिसर जागृत झाला. श्रीपदमनाभसंप्रसदायी श्रीगजाननमहाराज बोरकर यांची दत्तोपासनेची परंपरा श्रीअवधूतस्वामी उर्फ मोरेश्वर वासुदेव लिमये हे मुंबईस दादर येथे निष्ठेने चालवीत आहेत.

अशा प्रकारे आणखी कितीतरी भक्तांची ओळख करून देता येण्यासारखी आहे. विश्वनाथ महाराज केसकर (सन १८८०-१९६१), औदुंबर येथे श्रीगुरु शिवशंकरानंदआश्रम स्थापून तेथेच सन १९६८ मध्ये समाधिस्थ झालेले श्रीनारायणानंदतीर्थ स्वामी महाराज, नुकतेच म्हणजे १९ एप्रिल १९७३ या दिवशी कर्नाटकात वद्दहळळी (वरदपूर) येथे समाधिस्थ झालेले श्रीधरस्वामी, नृसिंहवाडीचे श्रीशांतानंदस्वामी, (समाधी सन, १९२४) स्वामी अच्युतानंदतीर्थ उर्फ भागवतस्वामी (सन १८७१-१९४५), कोल्हापूरकडील दत्तगडगा येथील श्रीदादामहाराज पाटगावकर (सन १८८७-१९४१). अरविंदांना योगदीक्षा देणारे विष्णु भास्कर लेले (समाधी सन १९३८), कोल्हापूर येथील दत्तावतारी श्रीबाल अवधूत बालमुकुंद (सन १९०७-१९६७), नरसिंगगडी समाधिस्थ झालेले बलभीमबोवा साडेकर (सन १८५३-१९०९), सन १९१३) साली अवतार समाप्त करणारे श्रीचिदानंदसरस्वती ऊर्फ ईटगास्वामी, गुरुचरित्राची संशोधित आवृत्ती तयार करणारे रा. कृ. कामत व त्यांचे बंधू दिगंबरदास, पुणे-सातारा रस्त्यावरील पदमावती येथे सन १९४७ मध्ये समाधिस्थ झालेले अवतारी पुरुष श्रीशंकरमहाराज, १५-३-७२ रोजी समाधिस्थ झालेले श्रीओम्‌ काका गडणीसमहाराज, अशा कितीतरी दत्तभक्तांची व अवतारी पुरुषांची नामावली वाढवण्यासारखी आहे. श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर, श्रीकृष्णानंदसरस्वती (समाधी सन, १९४०), अशा आणखी काही भक्तांची भर घालता येण्यासारखी आहे, अगडीचे श्रीनारायणभगवान स्वामी (सन १८६४ ते १९३४), कैवल्याश्रम बोठे स्वामी (सन १८७५-१९११), वजीरबाबा इत्यादी दाक्षिणात्य दत्तभक्तांचाही उल्लेख करणे अगत्याचे आहे.

आणखी दोन दत्तभक्तांची थोडी ओळख करून घेऊ. शिर्डीच्या साईबाबांच्या कृपेने प्रसिद्धीस आलेल्या उपासनी महाराजांनी (सन १८७०-१९४१) साकुरीया दत्तस्थानाची महती वाढविली. यांचे संपूर्ण नाव काशिनाथ गोविंद उपासनी असून हे सन १९१० मध्ये उन्माद अवस्थेतच शिर्डी येथे आले. अनेक चमत्कारिक गोष्टींच्या आचरणामुळे लोकांची यांच्यावर श्रद्धा बसली. थोरामोठयांनी भक्तियुक्त अंत;करणाने यांना देणग्या  दिल्या. त्यांच्या परिवारातील अनेक कन्यांना वेदांचा अधिकार प्राप्त झाला. साईवाक्सुधा, उपासनीवाकसुधा, सतीचरित्र अशी यांची काही पुस्तकेही आहेत. ‘उपासनीलीलामृत’ नावाचा एक चरित्रग्रंथही आहे. यांच्यानंतर साकुरी येथील उपासनासंप्रदाय पू. सती गोदावरीमाताजींनी वाढविला. श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकरांच्या परंपरेतील श्रीअवधूतमहाराज कुरुंदवाडकरांचा उल्लेख मागे आलेलाच आहे. हे मोरेश्वर केशव दातार (सन १८७३-१९३९) मूळचे मुरुडकडील. दानत, चारित्र्य व औदार्य या गुणांनी युक्त असे हे घराणे असून पुढे कुरुंदवाडकरांच्या आश्रयास आले. मोरोपंतांना दत्तभक्तीचा छंद बालपणापासून होता. भजनाचा व नामस्मरणाचा नादही वाढता होता. सन १९०५) मध्ये मोरोपंतांनी श्रीपंतांचा अनुग्रह घेतला. स्वत:च्या अंगावरील कफनी पंतांनी त्यांच्या अंगावर चढविली. मोरोपंतांनी तीर्थयात्रा व कीर्तन करीत भ्रमण केले. त्यांची अवधूतमहाराज म्हणून प्रसिद्ध झाली. चाळीसगाव-भडगावच्या बाजूस त्यांनी कीर्तनसेवेने अवधूतमार्गाचा प्रचार केला. भडगाव येथील दत्तमठात उत्सव सुरू केले. यांची समाधी भडगावला गिरणानदीतीरी आहे. यांच्या सुपुत्रांनी, श्रीदत्तमहाराजांनी पुढे संप्रदाय चालविला. श्रीअवधूतमहाराजांचे विस्तृत चरित्र का. मा. ताम्हनकर यांनी लिहिले आहे.

बेळगावनिवासी श्री. श्रीपादराव काणे महाराज (१८९७-१९७७) यांनी राम व दत्तात्रेय यांची ऐक्यभावाने उपासना केली आहे. नामस्मरणावर यांचा भर असून सदगुरू श्रीतुकारामहाराज येळेगावकर, सदगुरू श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर, श्रीदामोदरबुवा कुरोलीकर अशी यांची गुरुपरंपरा आहे. सत्पुरुषांच्या गाठीभेटी घेण्याचा छंद यांना लहानपणापासूनचा. चिदंबर दीक्षितांचे नातू पांडुरंगबुवा, रामभाऊ शेवडे उर्फ टोपिनकट्टी, श्रीनारायणमहाराज केडगावकर, श्रीयोगानंदजी (मलवडीकर), शांडिल्यमहाराज, अंबूराव महाराज, रामभाऊ रानडे, बाळासाहेब सहस्रबुद्धे, बेळगावचे परमहंस, दादामहाराज आंबेकर, योगीराज गुळवणी, गोविंदबुवा उपळेकर, श्रीरंगावधूत, स्वरूपानंद, भाऊसाहेव परीट महाराज, श्रीनित्यानंदजी इत्यादी सत्पुरुषांची गाठभेट त्यांची झालेली आहे. यांना एकदा तेव्हाच्या राजसत्तेस अनुसरून साहेबी थाटात दत्तदर्शन झाले होते. एकदा पहाटेस श्रीपादवल्लभरूपी दत्तात्रेयांनी यांना एकमुखी षडभुज स्वरूपात दर्शन दिले. अनेक प्रकारची तीर्थयात्रा व अनुष्ठाने करून यांनी नामजपाचा संप्रदाय वाढविला आहे. यांची काव्यरचनाही उपलब्ध आहे. यांचे ‘श्रीगुरुचरित्राचे अभंग’ प्रासादिक व रसाळ आहेत, ‘दत्त मनोहर । दिसतसे उभा । हिरण्याचा गाभा । प्रकटला’ अशी सोपी रचना या अभंगांची आहे. ‘आरती दत्तराज गुरूची । जय जय नत्तोद्धारकाची ॥’ ही दत्तात्रेयांची आरतीही रूप व तत्त्व यांचा बोध करणारी आहे. यांचा पत्रव्यवहार, प्रवचने, मनाच्या श्लोकांवरील विवरण इत्यार्दीसहित यांचे विस्तृत चरित्र श्री. वसंतराव गोखले यांनी लिहिले आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP