(सन १७५८-१८१५)
यांचे घराणे विजापूर जिल्हयातील गोठे गावचे. यांचे कुलदैवत खंडोबा असून यांच्या वडिलांनी, मार्तंड जोशी यांनी सोमयाग केला म्हणून यांचे नाव दीक्षित असे पडले. हे शुक्लयजुर्वेदाच्या काण्व शाखेचे ब्राह्मण होत. कर्नाटकातील मुरगोड गावी यांचा जन्म झाला. वर्णाश्रम धर्मभ्रष्ट झाला, त्याचे नीट पालन व्हावे म्हणून यांचा अवतार झाला. हे गृहस्थाश्रमी असून सरस्वती व सावित्री या नावाच्या दोन बायका यांना होत्या. सहा मुलगे. एक मुलगी; अशी सात अपत्ये यांना होती. मुरगोड येथे पाठशाळा स्थापन करून यांनी धर्मसेवा केली. या गावी एक ब्रह्महत्या झाली म्हणून यांनी हे गाव सोडून देवलापूर, हुबळी, हिपरगी, कुंदगोळ, नवलगुंद इत्यादी गावी भ्रमण केले. यांनी सन १८०७ साली नवलगुंद येथे एक यज्ञ केला. दुसरे बाजीराव पेशवे, रास्ते, गोखले, निपाणीकर सरदार इत्यादींची यांच्यावर श्रद्धा होती. यांची दीड लाखांवर अभंगरचना आहे. गुर्लहोसूर येथे यांची समाधी आहे.
चिदंबर दीक्षित हे द्त्तावतारी म्हणून प्रसिद्ध असून कवी मोरोपंतांचे नातू सखाराम त्र्यंबक ऊर्फ अबूनाना गर्दे यांनी ‘श्रीमच्चरित्र’ नावाच्या अनेक व्रुत्तात्मक चरित्रात यांचा जीवनवृत्तांत दिला आहे. बाभूळगावचे पाटील राजाराम महाराज हे यांचे पट्टशिष्ट असून त्यांनीही सुमारे एक लक्ष अभंगांत यांचे चरित्र सांगितले आहे. शिवशास्त्री या एका तेलंगी ब्राह्मणानेही संस्कृत श्लोकांत यांचे चरित्र गाइले आहे. गोण्णगरास असताना यांनीही सोमयाग केल्याचा उल्लेख यांचे चरित्रकार करतात. या अवताराने सनातनधर्माचा उद्धार करून भक्तिज्ञानाचा प्रसार केला. पाठशाळा. अन्नदान, अध्यापन, निरूपण, पुराणकीर्तन यांत ते रंगून गेले होते. ‘शुभं ब्रूयात् । मंगलं ब्रूयात् । शुभं ब्रूयांत् ।’ अशा शब्दोच्चारांनी ते आसनावर विराजमान होत. ‘आम्हीं ब्राह्मणांनी, ब्रह्मस्वरूपीयांनी, सर्व जगाचे सर्वस्वदान दुसर्यास करता येण्याजोगे दानशूर व्हावे. हात पसरण्यातच स्वधर्म मानू नये.’ असे ते शिष्यांना सांगत.’ दान देण्यात धन्यता वाटावी, घेण्यात आनंद मानू नये, अशी त्यांची शिकवण होती. स्वत:च्या मुलाने एक लाखांचा निधी आपल्या नावावर गोळा केलेला पाहून यांना मनस्वी वाईट वाटले. त्यांनी तो सर्व निधी गोरगरिबांना वाटून टाकला. यांच्या राजाराम महाराज नावाच्या शिष्याने ‘स्वारी चाले चिदंबर । विप्रमंडलीके भार ॥१॥
झांज ढोलकी मंजिरे । प्रेमभजन लागतय्यारे ॥२॥
बिना सतार मुरली । भजन करत स्वारी चली ॥३॥
दास कहे चिदंबर । लीला बतावे अपार ॥’ असे यांचे वर्णन केले आहे.
चिदंबर दीक्षितांच्या भक्तगणांत सर्व जातींचे, पंथांचे, वृत्तींचे लोक होते. गृहस्थ, यती, ब्राह्मण, बाह्मणेतर असे सर्वजण त्यांच्या परिवारात असत. ‘श्रीमच्चरित्रा’त अबूनाना गर्दे यांनी चिदंबरांना दत्तात्रेयस्वरूप मानले आहे. कविवर्य मोरोपंतांची मुलगी आनंदीबाई ही म्हैसाळचे त्र्यंबकराव गर्दे यांना दिली होती. या दांपत्याचा वडील मुलगा म्हणजे सखाराम उर्फ अबूनाना असून तो मोठा दत्तभक्त होता. श्रीपादवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वतींनी आपल्या भक्तांना ‘मुर्गोडी वसतो चिदंबररूपें तूं तेथ जा लौकरी’ असे सांगितल्याची माहिती चरित्रकार देतात. ‘यद्व्याजें शिव हा चिदंबर गुरू त्रैमूर्तीचा पुतळा । दत्तात्रेय सगूण होउनि अता हा पातला भूतला ॥’ अशी अबूनानांची श्रद्धा होती. पूर्वीचे दोन दत्तावतार म्हणजे श्रीपादयती व श्रीनृसिंहसरस्वती आणि ‘आता दत्तचि तो चिंदबर गुरु झाला गृहस्थाश्रमी’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘श्रीमत्सामिचिदंबरा नरहरी यांचे नसे भेद हा’ असे कवी वारंवार सांगत आहे. श्रीपादयती, नृसिंहसरस्वती व चिदंबर दीक्षित यांचे ऐक्य भक्तांना प्रतीत होई. राजाराम महाराजांनी चिदंबरांचे वर्णन मोठया रेखीव पद्धतीने केले आहे.
सगुण सांवळा ब्रह्मींचा पुतळा । देखियेला डोळां चिदंबर ॥१॥
चंद्रकांति ऐसा चिरा साजे शिरीं । भाळीं हे कस्तुरीटिळक शोभा ॥२॥
धोत्र शुभ्रकांठी कासेसी कसोटी । अंगीं शोभे उटी मैलगिरी ॥३॥
त्यावरी हो साजे यज्ञोपवीत शोभा । विद्युल्लता नभामाजीं जैसी ॥४॥
क्षीरार्णव जैसा अंगींचा दुशाला । मेळा भोंवताला ब्राह्मणांचा ॥५॥
दास म्हणे चाले त्रैलोक्याचा राणा । बरोबरी नाना यात्रा दाटी ॥६॥