(सन १८३८-१९१८)
शिर्डीचे नाव सार्या भारतात प्रसिद्ध करणार्या श्रीसाईबाबांचे स्थान दत्तपंथीयांत महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर बाबा रामाचे उपासक, शिर्डीस दत्तात्रेयांचे मंदिरही नाही. ज्या पादुका आहेत त्या बाबांच्या गुरूंच्या आहेत. बाबांनी स्वत: द्त्तोपासनेचा प्रचारही केलेला दिसत नाही. श्रीसाईबाबांची जात कोणती, त्यांचा जन्म केव्हाव कोठे झाला, ते शिर्डीस केव्हा व कसे आले, इत्यादींची फारशी माहिती कोणासही नाही. श्रीबाबा हे थोर दैवी व साक्षात्कारी पुरुष लोकांची दु:खे नाना मार्गांनी दूर करतात, एवढीच त्यांची कीर्ती, ते कोणाचे अवतार आहेत? याही प्रश्नाचे नेमके एकच उत्तर नाही, राम, कृष्ण, हनुमान, शंकर, गणपती, गुरुदत्तात्रेय, स्वामी समर्थ अक्कलकोटकर, माणिकप्रभू, इत्यादींचा संबंध श्रीबाबांच्या अवतारलीलांशी पोचतो. दासगणूसाररव्या श्रेष्ठ भक्तास ते पंढरीच्या विठ्ठलासररवे दिसतात. ‘शिर्डी माझें पंढरपूर । साईबाबा रमावर’ असे त्यांचे वचन आहे. साईबाबांची धुनी, उदी, त्यांचा हिंदुमुसलमान भक्तपरिवार, त्यांचे लोकविलक्षण वागणे, त्यांची आर्तांबद्दलची करुणा ध्यानात घेऊन अनेकांनी त्यांना दत्तावतारीही मानले आहे.
माणिकनगरप्रमाणे शिर्डीसही हिंदु व मुसलमान यांना पंथीयांत सारखाच मान आहे. साईबाबा हे नाथपंथीय दत्तात्रेयांचे अवतार आसल्याचे अनेकांना मान्य आहे. ज्ञात असलेल्या त्यांच्या जीवनक्रमाचा प्रारंभ थोडक्यात असा. औरंगाबाद जिल्ह्यातील धूप नावाच्या एका गावालगतच्या जंगलात चांदभाई नावाचा एक सधन व्यापारी आपली लाडकी घोडी शोधीत होता. या घोडीचा तपास एका मुसलमानी वेषातील तरुण बैराग्याने करून दिला. चांदभाईची निष्ठा या तरूण फकिरावर जडली. त्याने चिमटा जमिनीवर आपटून चिलमीसाठी निखारे तयार केले, तेव्हा तर या तरुणाच्या दैवी शक्तीबद्दल चांदभाईची खात्रीच पटली. चांदभाईने या फकिरास आपल्या घरी आणले. चांदभाईच्या घरी एक लग्न निघाले. त्या वर्हाडाबरोबर हा तरुण फकिर शिर्डीला येऊन शिवेवरील खंडोबाच्या देवळात आला. पण या मुसलमानाला पुजार्याने आत येऊ दिले नाही. तेव्हा तो देवळाबाहेर एका वडाच्या झाडाखाली चिलीम फुंकत बसला. याच वेळी खंडोबाच्या देवळाचे मालक म्हाळसापती सोनार हे तेथे आले. झाडाखाली बसलेल्या फकिरास ते म्हणाले, ‘आवो, साईबाबा !’ तेव्हापासून हा फकीर साईबाबा म्हणून ओळखला जाऊ लागला.
म्हाळसापतीबरोबर श्रीसाईबाबा शिर्डीतच राहू लागले. काशिराम शिंपी, आप्पा जागले अशा काही लोकांची बाबांवर श्रद्धा जडली. ज्या निंबाच्या वृक्षाखाली बसून बाबा चर्चा करीत त्याच्याखाली त्यांच्या गुरूंच्या पादुका असल्याचे आढळून आले. येथूनच जवळ असलेल्या एका पडीक जागेत बाबांनी फुलबाग तयार केली. बाबांचे वागणे, बोलणे वरवर पहाता वेडयासारखे होते. हातात पत्र्याचे टमरेल, मळकट कापडाची झोळी, अंगावर एखादी कफनी, अशा वेषात बाबा भिक्षा मागत असत. खाण्यापिण्याचीही नीट शुद्ध त्यांना नसे. काही दिवसांनी गावातील एका पडक्या मशिदीत ते राहू लागले. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली हीच जागा पुढे द्वारकामाई म्हणून प्रसिद्धीस आली. रामानामाचा जप येथे सुरू झाला. अक्षय जागृत असणारी धुनी तयार झाली व हजारो, लाखो भक्तांना उदीभस्म मिळत राहिले.
बाबांनी अनेक चमत्कार केले, दुकानदारांनी तेल दिले नाही म्हणून त्यांनी पाण्याच्या पणत्या पेटवून लोकांना चकित केले. बाबांनी अनेकांची शारीरिक व्याधी दूर केली, पिशाचबाधा दूर केली; अनेकांना धनाचा, यशाचा मार्ग दाखविला. पुणतांबे येथील संत गंगागीर महाराज व स्वामी अक्कललोटकरांचे शिष्य महंत आनंदनाथ यांनी बाबांचे दर्शन घेऊन कृतार्थता व्यक्त केली. वासुदेवानंदसरस्वती हे बाबांचे गुरुबंधू असल्याचे सांगतात. साईबाबांच्या अंगुळातून गंगायमुनांचा झरा वहात असतानाची साक्ष दासगणूंची आहे. योगविद्येतही श्रीबाबा तत्पर होते. संसारग्रस्त जीवांना सुखी व समाधानी करण्यासाठी बाबा या योगसामर्थ्याचा उपयोग करीत. त्यांच्या उदीचा प्रभाव अनेकांच्या अनुभवातला होता. उमरावतीचे दादासाहेब खापर्डे यांची श्रीबाबांवर नितान्त श्रद्धा होती. श्रीबाबांच्या वास्तव्याने लौकरच शिर्डी हे एक क्षेत्र बनले. भक्तांच्या निवासासाठी तेथे नवीन इमारती झाल्या. पाण्याची, विजेची सोय झाली. साठे. दीक्षित, नागपुरचे बुटी यांच्या इमारतींनी शिर्डीस एक नवे वैभव प्राप्त करुन दिले.
श्रीबाबांचे चमत्कार व त्यांचा उपदेश यांनी सर्वसामान्य लोकही भारावून गेले. बाबा म्हणत असत, “कधीही न मिळणारा हा मनुष्यजन्म विषयभोगांच्या नादाने फुकट घालवू नका, तुम्हांला जे समजणार नाही ते मला विचारा. तुमच्या सेवेसाठी मला परमेश्वराने येथे पाठविले आहे. तुमच्यासाठी माझा जीव तळमळत आहे. तुमचा उद्धार करणे हे या अल्लाच्या सेवकाचे पहिले कर्तव्य आहे. या जगात अमर कोणीही नाही. प्रत्येकाला एक दिवस मरावयाचे आहे. मरणाचे भूत नित्य डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे त्या भितीने तरी तुम्हांस परमेश्वराची आठवण होईल.” असा त्यांचा साधा व सरळ उपदेश असे. त्यांना फारसे कर्मकांडही नको होते. विशिष्ट देवाचा वा देवतेचाही त्यांचा आग्रह नव्हता. मनातील अहंकार सोडून आपल्याला आवडेल त्या देवाची अढळ विश्वासाने आराधना करण्यास ते सांगत. सांसारिक लोकांना परमार्थाची गोडी श्रीसाईबाबांनी लावली.
श्रीबाबांनी अशा रीतीने कधी कनवाळूपणाने, कधी रागावून, कधी लोभावून, कधी नीट समजूत काढून लाखो लोकांची पीडा दूर केली. त्यांना परमार्थाचे मार्गदर्शन केले. कसल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता ते अन्नदान करीत. हजारो लोकांच्या शारीरिक व मानसिक व्याधी दूर करणारा हा अवतारी पुरुष १५ ऑक्टोबर १९१८ रोजी समाधिस्थ झाला. अखेरच्या प्रसंगी त्यांना बुटींच्या वाडयात आणले होते. तेथेच त्यांचे समाधिस्थान निर्माण झाले. श्रीबाबांनी कोणासही मंत्र देऊन शिष्य केले नसले तरी आजही लाखो भक्तांचे डोळे शिर्डीकडे लागलेले असतात. शिर्डीच्या जवळचे साकुक्री येथील उपासनी महाराजांचे दत्तस्थान साईबाबांच्या प्रेरणेनेच निर्माण झाले. आजचे सत्यसाईबाबा शिर्डीच्या या श्रीसाईबाबांचे अवतार असल्याची अनेकांना खात्री आहे.