दत्तभक्त - देवगडचे किसनगिरी महाराज
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(सन १९०७-१९८३)
अलीकडे प्रसिद्धीस आलेले एक दत्तस्थान म्हणजे देवगड होय. प्रवरा नदीच्या काठी नेवाश्यापासून चौदा मैलावर चावर मुरमे नावाचे एक छोटे गाव आहे. देवगड याचा उदय मुरमे येथेच झाला. सन १९०७ साली प्रवरेच्या काठी गोधे नावाच्या गावात शबरी जातीच्या समाजात एका कुटुंबात एक तेजस्वी मूल जन्मास आले. त्याच्या आईचे नाव राहीबाई व पित्याचे नाव मारुती असे होते. या मातापित्यांनी मुलाचे नाव किसन असे ठेविले.
हा किसन थोडा वयात येताच गावातील पाटीलांची मुले व शेळ्या सांभाळू लागला. किसनला एकांताची आवड होती. लहानपणापासून महादेवाची भक्ती तो करीत असे. बारा वर्षे महादेवाच्या पिंडीची पूजा केली. नंतर त्याने चार धामांची यात्रा करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे यात्रा करून किसन पंधरा दिवसांत परत आला. एवढया थोडया अवधीत त्याने यात्रा कशी केली? अशी शंका लोकांना आली. पण किसन चार धामांचे वर्णन प्रत्यक्षात जसेच्या तसे करी. त्यापुढे किसन माधुकरी मागून सेवा करू लागला. लोकांचे आजार बरे करू लागला. नेवासे येथील नाथबाबा यांचे शिष्यत्त्व त्याने पत्करले. किसनबाबाने अपार कष्ट करून देवगडची भूमी उदयास आणली. या गावी त्याने एक देवस्थान उभे केले. दत्तमंदिर, शिवाचे मंदिर, पाकशाळा, धर्मशाळा असा या स्थानाचा पुढे विस्तार झाला. सन १९८३ मध्ये किसनगीरांचा देह दत्तचरणी विलीन झाला. यांचे एक शिष्य भास्करगिरी महाराज आता हे देवस्थान चालवीत आहेत.
किसनगिरी यांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडले. मृत व्यक्ती जिवंत करणे. मुक्याला वाचा देणे, संतती देणे. विहिरीचे पाणी सांगणे, इत्यादी चमत्कार यांच्या जीवनात घडले आहेत. किसनबाबांचे काही अभंग प्रसिद्ध आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP