बालक्रीडा - अभंग २६ ते ३०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
२६.
कोटिशा आदित्य गोठे एके ठायीं । तेजें दिशा दाही उजळल्या ॥१॥
घाबरा होवोनी वसुदेव पाहे । ह्लदयीं आश्चर्य करी-तसे ॥२॥
मुकुटावरी रत्न नक्षत्रांचा मेळा । भाळीं शोभे टिळा केश-राचा ॥३॥
व्यंकटा भृकुटी कमलाकार नेत्र । नासीक विचित्र शुक-चंचू ॥४॥
विद्युल्लते ऐसी झळकती कुंडलें । अधर कोंवळे अरुणोदय ॥५॥
कंबुग्रीव कंठ ह्लदयीं वत्सलांच्छन । ब्रह्मयाची सीण न कळे अंत ॥६॥
चतुर्भुज शंखचक्रगदापद्म । चिमणा मेघ:श्याम वर्ण ज्याचा ॥७॥
कौस्तुभ निर्भळ वैजयंती माळा । कासे सोनसळा हाटवर्ण ॥८॥
रुणझुण रुणझुण वाजताती वाळे । आरक्त वर्तुळ नखीं शोभा ॥९॥
ध्व-जवज्रांकुश जैसीं रातोत्पळें । नामा म्हणे डोळे दिपताती ॥१०॥
२७.
अयुत गायी ब्राह्मणासी । सोडी संकल्प मान सें ॥१॥
ओळखिलें तुज । आतां कळलासी मज ॥२॥
धर्म स्था-पावया । येथें येसी देवराया ॥३॥
आलिंगितां दोहीं बाहीं । नामा म्हणे डोई पायीं ॥४॥
२८.
सोडीं सोडीं मिठीं । लपवा लपवा जगजेठी ॥१॥
झणीं कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥
वासुदेव चिंता मनीं । तेज न माये गगनीं ॥३॥
नामा ह्मणे आलें हासें । देव तेव्हां सांगतसे ॥४॥
२९.
नंदाच्या घराला । मज नेईं गोकुळाला ॥१॥
माया उपजली तेथें । ठेवीं मज आगीं येथें ॥२॥
म्हणसी असे रक्षपाळ । ते म्यां मोहिले सकळ ॥३॥
आच्छादित रूप । नामा ह्मणे माझा बाप ॥४॥
३०.
उचलिला कमळापती । पायींचीं बंधनें गळती ॥१॥
त्रै-लोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥
कवाडें उघडती । देखतांची देवाप्रती ॥३॥
मंद मंद पडे पाऊस । शिरीं छाया करी शेष ॥४॥
पूर चढला अचाट । त्यासी लविला अंगुष्ट ॥५॥
त्वरें आला नंदाघरीं । निद्रिस्थ त्या नरनारी ॥६॥
ठेवी तेथें कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥७॥
रडे माया करी आक्रांत । नामा ह्मणे उठवी दूत ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP