बालक्रीडा - अभंग ६६ ते ७०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
६६.
उठोनी प्रात:काळीं गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आतां ॥१॥
चला जाऊं आतां पाहूं गे श्रीमुख । हरेल ही भूक डोळियांची ॥२॥
तांतडीनें येती नंदाचिया घरा । मुख दावीं उदारा कृष्णराया ॥३॥
कुरळे हे केश सुहास्य वदन । आकर्ण नयन शोभ-ताती ॥४॥
अरुणोदय प्रभा अधरीं दिसती । हिरे झळकती दंत तुझे ॥५॥
भोंवया व्यंकटा सरळ नासिक । पाहोनियां मुख सुख होय ॥६॥
लल्लाटीं शोभत केशराचा टिळा । वर बिंदु रेखिला कस्तु-रीचा ॥७॥
वैजयंती माळा किरीट कुंडलें । नामयानें केलें निंबलोण ॥८॥
६७.
उठोनियां प्रात:काळीं । देवें मुरली वाजविली ॥१॥
गडी मिळोनी समस्त । घ्यारे शिदोर्या सांगात ॥२॥
अलंकार घालिताती दिसे सुशोभित मूर्ति ॥३॥
नामा ह्मणे स्वामी माझा । आला भक्तांचिये काजा ॥४॥
६८.
अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळां विलसताती ॥१॥
रक्त पितांबर आरक्त अधर । चरणीं सुंदर चा-लताती ॥२॥
रक्त चंदनाची घेतलीसे उटी । मयूरपत्रवेंठी शो-भताहे ॥३॥
शिंगें रंगविती देऊनियां रंग । चालती श्रीरंग मागें मागें ॥४॥
चित्तीं सर्वकाळ राहे ऐसें ध्यान । नामा ह्मणे धन्य तो़चिं एक ॥५॥
६९.
शिवादि वंदिती ज्याचे पायवणी । त्यासी पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥१॥
नंद पुण्याचा लेखा न कळे आह्मांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥२॥
सनकादिक ज्याचे ध्यानीं झाले पिसे । गायी चारीतसे गोकुळांत ॥३॥
गडियांसी काला वांटीत्त श्रीधर । कौतुक सुरवर पाहताती ॥४॥
नामा ह्मणे सुख देईल भक्तांसी । वधील दुष्टांसी स्वामी माझा ॥५॥
७०.
कंस धाडी अघासुर । मारी नंदाचा कुमर ॥१॥
एक ओंठ घाली खालीं । दुजा मेघाच्या मंडळीं ॥२॥
गाई गोपाळ उदरीं । देवा कळलें अंतरीं ॥३॥
आंत प्रवेशला कृष्ण । रूप धरीत वामन ॥४॥
क्षणार्धेंची मारी । भक्तजनाचा कैवारी ॥५॥
भेणें गोपाळ पडिले । कृपा दृष्टि अवलेकिले ॥६॥
तेज अद् भुत निघालें । कृष्णमुखीं प्रेवशलें ॥७॥
भक्तासी रक्षीत । नामा ह्मणे कृष्णनाथ ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP