बालक्रीडा - अभंग ५६ ते ६०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
५६.
मुलें सांगताती । माती खातो गे श्रीपती ॥१॥
लांकूड घेऊनि हातांत । माती खातो कां पुसत ॥२॥
भावा भुललासे खरा । कांपतसे थरथरा ॥३॥
मुख दावीं उघडोनी । पाहें ह्मणे चक्रपाणी ॥४॥
ब्रह्मांडें देखिलीं । नामा ह्मणे वेडी झाली ॥५॥
५७.
यशोदा घुसळीत । स्तन मागे भगवंत ॥१॥
घालोनी पदर । पाजीतसे जगदीश्वर ॥२॥
दूध जातसे उतोन । उठे कृष्णासी टाकून ॥३॥
मंथन पात्रातें फोडीत । पळे तेथूनि त्वरित ॥४॥
मागें धांवली यशोदा । धरावया त्या गोविंदा ॥५॥
हातीं न लगे जगजेठी । नामा ह्मणे होय कष्टी ॥६॥
५८.
कृपा उपजली । उभा राहे वनमाळी ॥१॥
धरूनि आणीला । आजी बांधीन मी तुला ॥२॥
दावें सोडूनियां । बांधि-तसे देवराया ॥३॥
फार करितोसी खोडया । गोपी दाविती वांकु-डया ॥४॥
दावीं अनंत लावीत । दोन बोटें उणें येत ॥५॥
करि-ताती चोज । परी नव्हेचि उमज ॥६॥
श्रमतसे वारंवार । पुरती करी जगदोद्धार ॥७॥
विष्णुदास नामा पुढें । आला जेथें उभीं झाडें ॥८॥
५९.
दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा । परंज्योति नारायणा तुज नमो ॥१॥
विश्वव्यापका जनार्दना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥२॥
अनंत अवतार घेसी भक्तां-साठीं । कृपाळु जगजेठी तुज नमो ॥३॥
यज्ञेशा सर्वेशा दयानिधि ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥४॥
धन्य हा दिवस देखिले तुझे पाय । कृपादृष्टी पाहें आह्मांकडे ॥५॥
जोडोनियां हात करिती विनंति । देईं तुझी भक्ति जन्मोजन्मीं ॥६॥
करूनि नमस्कार हळू-हळू चालती । वेळोवेळां पाहाती कृष्णाकडे ॥७॥
मोडतांचि वक्ष नाद ऐकूनियां येती । धांवोनि पहाती नामा ह्मणे ॥८॥
६०.
समस्तां सांगती लहानालीं मुलें । नवल देखिलें आह्मीं आतां ॥१॥
वृक्ष मुळींहूनि दोघे निघताती । पायासीं लागती कान्होबाच्या ॥२॥
यशोदेचे मनीं झालासे विवेक । वैकुंठनायक येथें आला ॥३॥
नामा ह्मणे तिशीं घालितसे घाला । अपराध तिजला काय असे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP