बालक्रीडा - अभंग ९६ ते १००
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
९६.
राहूं नका येथें जावें समुद्रासी । सांगे हर्षाकेशी सक-ळिकां ॥१॥
तुझिया मस्तकीं असे माझा चरण । न भक्षी तुज जाण पक्षीराज ॥२॥
दिव्य सुमनाच्या घालिताती माळा । पूजिती सांवळा बाप माझा ॥३॥
अनर्ध्य रत्नांचे देती अलंकार । श्रीमुख सुंदर पहाताती ॥४॥
जांबुनदातटीं घालिती भोजन । निघती तेथून सक-ळिक ॥५॥
आला भगवान आनंदले गडी । उभारिती गुढी जन तेव्हां ॥६॥
काळिया आख्यान स्मरे जो मानसीं । न डंखिती त्यासी सर्पकुळें ॥७॥
अहर्निशीं याचें करी जो पठण । नामा ह्मणे विघ्न नाहीं तेथें ॥८॥
९७.
आला वनमाळी । मग भेटती सकळी ॥१॥
यशोदा रोहिणी । पोटीं धरिती चक्रपाणी ॥२॥
गायी धांवताती । कृष्ण अंगातें चाटिती ॥३॥
उडया मारिताती । गडी आनंदें नाचती ॥४॥
न वर्णवे तो आनंद । नामयाची बुद्धि मंद ॥५॥
९८.
झाला अस्तमान तेथेंचि रहाती । ऐकें परीक्षिती अद्भुत हें ॥१॥
निद्रेनें व्यापिलें शौनकारे सर्वां । लागला वणवा तया स्थानीं ॥२॥
गायी पाळताती पक्षी उडताती । पिलीं पडताती कृष्णापुढें ॥३॥
हाहा:कार झाला धांव धांव कृष्णा । वांचवीं रे प्राणा सकळांच्या ॥४॥
तुझीं आह्मी बाळें वाचवींरे आह्मां । धांव धांव रामा ह्मणताती ॥५॥
आक्रोशें रडती मारिताती हांका । वैकुं-ठनायका रक्षीं आह्मां ॥६॥
दीनाच दयाळ मनाचा कोवळा । घाली अभिज्वाळा मुखामाजी ॥७॥
होतां प्रात: काळ सकळ चालिले नामा ह्मणे आले गोकुळांशी ॥८॥
९९.
दुष्ट दुराचारी । गोपाळाचा वेषधारी ॥१॥
दैत्य ओ-ळखिला । रामें प्रलंब मारिला ॥२॥
देव करिती जयजयकार । पुष्पें वर्षती अपार ॥३॥
सूर्य आलासे माध्यान्हा । देवा बाहाती भोजना ॥४॥
नामा ह्मणे पाचारती । गडी एकत्र बैसती ॥५॥
१००.
एके ठायीं करुनी अन्न । हातें वाढी नारायण ॥१॥
हें पाहोनी सुरवर । चित्तीं करिती विचार ॥२॥
धन्य पुण्य गौळीयांचें । आम्हां अन्न मिळे कैचें ॥३॥
एक असे युक्ति । हात धुवील श्रीपति ॥४॥
उच्छिष्टाचे मिषें । देव जळीं झाले मासे ॥५॥
हें कळलें घन-नीळा । सांगतसे हें गोपाळ ॥६॥
चला वृंदावना जाऊं । नामा ह्मणे उदक घेऊं ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP