बालक्रीडा - अभंग १०१ ते १०५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१०१.
तृणाचिया लोभेम गायी गेल्या दुरी । पाचारी मुरारी नामें त्यांचीं ॥१॥
चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने । येईं ताम्रपर्णे धांवोनियां ॥२॥
सरस्वती प्रवरे कालिंदी नर्मदे । येईं तुंगभद्रे धां-वोनियां ॥३॥
देवाजीच्या शब्द ऐकोनियां कानीं । येताती धांवोनी नामा म्हणे ॥४॥
१०२.
त्रिभंगी देहुडे उभे वृंदावनीं । वेणू चक्रपाणी वाज-वितो ॥१॥
तयावरी गायी टाकिताती माना । बाळें स्तनपाना विसरती ॥२॥
सर्प आणी नाग मुंगूसें बैसती । जळेंही वाहाती विस-रलीं ॥३॥
हस्ती सिंह एके ठावीं बैसताती । भ्रमर भूलती वेणुनादें ॥४॥
विंचरिती वेणी तेथें राहे फणी । करितां भोजनीं ग्रास मुखीं ॥५॥
१०३.
मार्गशीर्ष मासीं कात्यायनी व्रत । कुमारी समस्त आचरती ॥१॥
अरुणोदयीं येती कालिंदीचे तीरीं । गाती त्या सुंदरी कृष्णजीला ॥२॥
सिकतेची मूर्ति करूनि देवीची । पूजाअर्चा तिची करिताती ॥३॥
जोडोनियां कर करिताती स्तवना । ऐकें विझापना आदिमाये ॥४॥
नंदाचा नंदन देईं आह्मां पती । नामा ह्मणे येती स्वस्थळासी ॥५॥
१०४.
कालिंदीचे तीरीं वस्त्रें ठेविताती । जळांत रिघती सक-ळीक ॥१॥
गडयांसमवेत आला तेथें कृष्ण । करावया पूर्ण व्रत त्यांचें ॥२॥
वस्त्रें घेवोनियां चढे वृक्षावरी । घाबरल्या नारी पाहो-नियां ॥३॥
वस्त्रें देईं आतां आमुचीं मुकुंदा । जाउनियां नंदा सांगों आतां ॥४॥
अच्युता अनंता कृष्णा गरुडध्वजा । दासी आह्मी तुझ्या सकळिका ॥५॥
वाजतसे सीत जाऊं पाहे प्राण । यशोदेची आण तुज असे ॥६॥
ऐकोनियां ऐसें नामा ह्मणे हांसे । धर्म सांगतसे तयांलागीं ॥७॥
१०४.
नग्न होवोनियां स्नान जे करिती । त्यांचीं व्रतें होती निरर्थक ॥१॥
त्वरें करूनियां या गे मजपाशीं । सांगतों तुह्मांसी प्रायश्चित ॥२॥
एकी आड एक गुह्यस्थानीं हात । आनंद बहूत मनामध्यें ॥३॥
करा नमस्कार सांगे वनमाळी । एक हस्त भाळीं लविताती ॥४॥
देवां द्बिजां ऐसा करितां नमस्कार । पाप याचें फार धर्मशास्त्रीं ॥५॥
ऐकोनियां ऐसें लाज सोडोनियां । पडताती पायां आदित्याच्या ॥६॥
वस्त्रें देत तेव्हां तयां जगजीवन । मनोरथ पूर्ण करीन मी ॥७॥
नामा ह्मणे येती गोकुळासी नारी । चालिला श्रीहरि तेथुनियां ॥८॥
१०५.
प्रात:काळीं सांगे सकळांसी कृष्ण । नका घेऊं अन्न आज कोणी ॥१॥
सोडोनियां गायी चालीले वनासी । गडी ह्लषी-केशी खेळताती ॥२॥
वर्जियलें आम्हां नका घेऊं अन्ना । खावें काय कृष्णा आजी आतां ॥३॥
गडीयांसी सांगे वैकुंठींचा राणा । सांगावें ब्राह्मणा जावोनियां ॥४॥
वनीं उपवासी आहे रामकृष्ण । द्यावें त्यासी अन्न कृपा करोनी ॥५॥
गोपाळासी तेव्हां धाडी वासु-देव । पाहावया भाव याज्ञिकांचा ॥६॥
जोडोनियां हात वंदिती द्विजांसी । धाडिलें आम्हांसी कृष्णनाथें ॥७॥
नामा म्हणे ऐसें सांगती गोपाळ । याज्ञिकां सबळ अभिमान ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP