बालक्रीडा - अभंग १११ ते ११५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१११.
काकुळती येती सकळिक लोक । पाहासी कौतुक काय आतां ॥१॥
मागें बहुतापरी रक्षियलें आह्मां । अगा पुरुषोत्तमा दीनबंधु ॥२॥
कोण तुजविण आह्मांसि रक्षिता । उदारा अनंता जगजेठी ॥३॥
शरण शरण अगा वासुदेवा । अच्युता माधवा नारा-यणा ॥४॥
विलंब केलिया जातील रे प्राण । धरिती चरण नामा ह्मणे ॥५॥
११२.
सकळिकां तेव्हां देवें आश्वासिलें । इंद्रें हें मांडिलें विघ्न येथें ॥१॥
महेंद्राच रंक करीन क्षणांत । पाहें पुरुषार्थ दावीन मी ॥२॥
रक्षिणार यांसी आहें मी गोविंद । उतरीन मद तुझा आतां ॥३॥
शरणागता मारी ऐसा कोण थोर । मशक पामर पाहूं आतां ॥४॥
यासाठीं करीन सृष्टीचा उभारा । लागों नेदी वारा दु:खाचा मी ॥५॥
गोवर्धना तुम्ही चलारे सकळ । दावितों मी बळ इंद्रा आतां ॥६॥
उचलिला गिरी प्रथम अंगुळीं नामा म्हणे बळी बाप माझा ॥७॥
११३.
राहा याचे तळीं आनंदें करूनी । मानूं नका मनीं भय याचें ॥१॥
पाहूं किती दिवस पडतो पाऊस । धरीन नि:शेष प्रलयांत ॥२॥
सांगतांचि ऐसें राहाती सकळ । वर्णिताती बळ परस्परें ॥३॥
सौंगडे म्हणती तेव्हां ते समस्त । लावीं कीरे हात सकळीक ॥४॥
उगेची श्रमती बालकें अज्ञान । ह्मणे नारायण काढा हात ॥५॥
सप्त दीन होती सांगतो योगीद्रं । पाहावया इंद्र येता झाला ॥६॥
अद्भुत चरित्र पाहून गेली भ्रांत । मेघासी सांगत पुरे करा ॥७॥
नामा ह्मणे इंद्र चित्तीं चिंतावला । अपराध घडला समर्थाचा ॥८॥
११४.
राहिला पाऊस निघावें बाहेर । सांगे विश्वंभर सक-ळांसी ॥१॥
दीनबंधू तेव्हां ठेवी पर्वतासी । भेटती देवासी सकळीक ॥२॥
आयुष्य बहुत तुज होवो कृष्णा । वांचविले प्राणा सकळांच्या ॥३॥
विष्णुदास नामा ओंवाळून जाय । येगे माझे माय भेटी देईं ॥४॥
११५.
वाहातसे नेत्रीं इंद्राचिये नीर । अपराधी थोर देवराया ॥१॥
क्षमा करीं आतां अच्युता अनंता । अगा कृष्ण-नाथा दीनबंधू ॥२॥
तुझिया दासासी दु:ख म्यां दिधलें । भ्रांतीनें मोहिलें मन माझें ॥३॥
दावीं तुज थोरी न करींच सेवा । करा दंड देवा मजलागीं ॥४॥
तूंचि माझा बाप तूंचि माझी आई । क्षमा कृष्णा-बाई करीं आतां ॥५॥
दैत्य मारावया भूतळीं आलासी । भक्तांला रक्षिसी निरंतर ॥६॥
जगद्नुरु माझा धनी वनमाळी । जोडोनि आंजुली उभा असे ॥७॥
चतुर्भुज गळां वैजयंती माळा । पाहातसे डोळां नामा ह्मणे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP