मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग ११६ ते १२०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


११६.
गोविंदा माधवा केशवा वामना । मायातीता कृष्णा तुज नमों ॥१॥
गोवर्द्धनोद्धरा देवा विश्वंभरा । निर्गुण निराकारा तुज नमों ॥२॥
जनार्दना हरि कृपाळू ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमों ॥३॥
अव्यक्ता क्षेत्रज्ञ अचिंता कुटस्था भुवनत्रयनाथा तुज नमों ॥४॥
अनंत ब्रह्मांडें तुझिये उदरीं । घनश्यामा हरि तुज नमों ॥५॥
देवराया तुझें कोमळ ह्लदय । कृपादृष्टी पाहें मजकडे ॥६॥
तुझा मी किंकर आहें वासुदेवा । अभय या जीवा देईं आतां ॥७॥
नामा म्हणे घाली चरणासी मिठी । बोले जगजेठी स्वामी माझा ॥८॥

११७.
तुझा मोडिला म्यां यज्ञ । ऐक तयाचें कारण ॥१॥
न करिसीरे स्मरण । सुखारूढ तुझें मन ॥२॥
विसरलासी मज । अनुग्रह केला तुज ॥३॥
ऐसें सांगे नारायण । नामा म्हणे समाधान ॥४॥

११८.
आणूनि सुरभि करी अभिषेक । येती सकळिक मरुद्नण ॥१॥
सुरवरांची दाटी करिती नमस्कार । होतसे अपार पुष्पवृष्टी ॥२॥
वेदमंत्रघोष ऋषि करिताती । अप्सरा नाचती थैयथैयां ॥३॥
नारद तुंबर गंधर्व गायन । वर्णिताती गुण कृष्णाजीचे ॥४॥
यथा-विधि इंद्र पूजी विश्वंभरा जोडोनियां करा उभा राहे ॥५॥
आज्ञा घेऊनियां जाय स्वस्थळासी । येती गोकुळासी सकळीक ॥६॥
चरित्र जो कोणी उच्चारील वाचे । जळती पापाचे पर्वत हे ॥७॥
नामा ह्मणे ऐसें सांगतसे शुक । सूत पुराणिक शौनकासी ॥८॥

११९.
गौळी ह्मणती ह्लषिकेशी । दावी आपुल्या स्थळासी ॥१॥
सखा तूंची कृष्णा । आमुची पुरवावी वासना ॥२॥
दावी वैकुंठ सकळां । क्षणएक पाहूं डोळां ॥३॥
नामा तेथील रहिवासी । आला स्थापाया धर्माशीं ॥४॥

१२०.
लोपतां आदित्य पडे चंद्रप्रभा । वृंदावनीं शोभा सुशो-भित ॥१॥
देहुडा पाउलीं उभा तये वनीं । वेणू चक्रपाणी वाजवितो ॥२॥
ऐकतांचि नाद गोकुळींच्या नारी । पाहावया हरि निघताती ॥३॥
भ्रतार सेजेसी टाकुनी उठती । वाढितां पंगती निघताती ॥४॥
स्तन देतां बाळें टाकिलीं भूमीसी । मोकळिया केशीं निघताती ॥५॥
नामा ह्मणे ऐशा गेल्या देवापाशीं । आनंद मानसीं न समाये ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP