बालक्रीडा - अभंग ७१ ते ७५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
७१.
गडी आणि रमापती । तेव्हां आनंदें जेविती ॥१॥
कोणी मांडिताती पानें । वरी ठेविताती अन्नें ॥२॥
कोणी ठेवी मांडीवरी । कोणी जेवी भूमीवरी ॥३॥
कोणी पसरिती चवाळें । कोणी अंथरती जाळें ॥४॥
गोळे घेऊनियां हातीं । येरयेरातें हाणीती ॥५॥
पाहाताती देव । धन्य धन्य त्यांचा भाव ॥६॥
मिटकीया देती । देवा वांकुल्या दाविती ॥७॥
माया मोही ब्रह्मादिका । नामा ह्मणे तोचि एका ॥८॥
७२.
गौळियांचीं पोरें वांकुल्या दाविती । क्रोधावला चित्तीं ब्रह्मदेव ॥१॥
चोरोनियां नेत गोवत्स गोपाळ । पाहूं याचें बळ किती आहे ॥२॥
जाणोनी चित्ती देव हांसतसे । सामर्थ्य पाहातसे पुत्र माझा ॥३॥
ते-थून आणवीं नव्हे हें उचीत । ह्मणोल किंचित पराक्रम ॥४॥
नामा ह्मणे ऐसें विचारिलें चित्तीं । करीतसे श्रीपति काय तेव्हां ॥५॥
७३.
गायीवत्सगोपाळ केलीसे निर्मान । न लागतां क्षण परीक्षिती ॥१॥
पूर्ववत सर्व न्यून कांहीं नाहीं । करीत आपाही मनामाजी ॥२॥
इच्छामात्रें करी ब्रह्मांडाच्या कोटी । त्यासी काय गोष्टी अपूर्व हे ॥३॥
सायंकाळीं गेले गोकुळाभीतरीं । आपुलाल्या परी घरीं सर्व ॥४॥
ब्रह्मादिकां ज्याचा नकळेची पार । मानवा विचार न कळे कांहीं ॥५॥
ऐसा हा समर्थ नामयाचा धनी । वंदी पायवणी सदाशीव ॥६॥
७४.
एक संवत्सर जालासे सकळां । पाहावया आला ब्रह्मदेव ॥१॥
पूर्ववत गायी गोपाळ देखिले । आश्चर्य वाटलें तेव्हं त्यासी ॥२॥
ब्रम्हांडांत ब्रह्मा दूजा असे कोण । केलेंसे उत्पन्न याजलागीं ॥३॥
घेवोनियां गोलों तेची आहे येथें । जावोनियां तेथें पाहातसे ॥४॥
भ्रांतीने व्यापीलें तयाचें तें मन । देखतों मी स्वप्न किंवा सत्य ॥५॥
नामा म्हणे एके ठायीं उभा राहे । न्याहाळून पाहे सकळांसी ॥६॥
७५.
चतुर्भुज दिसे शंखचक्र हातीं । मुकूट शोभती सर्वां -लागीं ॥१॥
कर्णीचीं कुंडलें वैजयंती माळा । देखतसे डोळां ब्रह्म-देव ॥२॥
कौस्तुभ ह्लदयीं श्रीवत्सलांछन । बाहूचीं भूषणें पाहातसे ॥३॥
चरणीं तोडर पीत पीतांबर । तेजें दिवाकर लोपतसे ॥४॥
आपादपर्यंत तुळसीच्या माळा । मुद्रिका दयांगुळा रत्नाचिया ॥५॥
केशराचे टिळे नेत्र कमलाकर । दंतीं इंदुकर बैसलेती ॥६॥
कोटी-कृष्ण मूर्ति कोटि ब्रह्में दिसती । स्तवनीं स्तविताती सुरवर ॥७॥
नामा ह्मणे ऐसें दावीत गोविंद । झालासे सावध ब्रह्मा तेव्हां ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP