तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [मंदाक्रांता]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
देवा देवा ! कुठूनि तरि तूं आणिशी ही लढाई ! ।
जाती सारे हुरळुनि तिची ऐकुनीया बढाई ॥
‘‘शस्त्रें वस्त्रें सकल मिळुनी मोठमोठे पगार ।
दर्या माजी सुखकर हवा बर्फही थंडगार’’ ॥१॥
‘‘लोकीं होतें प्रगट सहजीं आपुली राजनिष्ठा ।
शूरांमाजी करिति गणना देऊनीया प्रतिष्ठा ॥
धैर्ये शौर्यें चढूनि बळ तत्तेज अंगीं विराजे ।
योद्धे सारे सारे स्तवन करुनी मान देतात राजे’’ ॥२॥
‘‘भालीं दैवें मरण लिहितां कोण कोठें पळेल ।
अंतःसद्मीं लपुनि बसुनी सांग कां तें टळेल ?॥
धारातीर्थीं पतन घडतां कोणता सांग तोटा ।
स्वर्गश्रीही मिळुनि घडतो कीर्तिचा लाभ मोठा ॥३॥
‘‘ऐशीं स्वर्गासम बहु फळें दाटलीं एक जागीं।
स्यांतें हातें ढकलिल बळें तोच लोकीं अभागीं ॥
मी तों मागें समजुनि असें काय घेईन पाय ।
भाग्यें हातीं सहज पडला सौख्यदाता उपाय’’ ॥४॥
‘‘ऐशीं संधी नवस करुनी काय येई फिरून ।
जाणोनी दे अनुमति मला धैर्य चित्तीं धरून ॥’’
ऐशी माझी करूनि समजी हाय गेलांत नाथा ।
मी तों येथें झुरत पडलें कोण वाली अनाथा ॥५॥
विलायत कुठें कुठें शहर भव्य तें लंदन ।
अहर्निश जलामधें पळति अग्निचें स्यंदन ॥
दिसे भरूनि राहिला दशदिशा महासागर ।
तुफान उठतां गमे निवळ मृत्युचें आगर ॥६॥
पडे झुकुनि बोटही घडिघडीस बाजूवरी ।
धका बसुनि माणसें सकल कावरीं बावरीं ॥
धडाधड उडोनिया पडति एकमेकावरी ।
सुटोनि कर लोळती कवण तैं कुणा सावरी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP