अध्याय पहिला - अभंग १ ते १५

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


श्रीशंभुच्या प्रसादें झाली त्रिजगीं मदालसा मान्या,
बुध हो ! या साध्वीतें, सेवुनि सुयश, न वदाल सामान्या. ॥१॥
मार्कंडेयपुराणीं या देवीचें चरित्र सन्महित,
ज्याच्या गानें - पानें होतें, व्हावें तसेंचि, जन्महित. ॥२॥
पूर्वीं होता राजा, नाम जया शत्रुजित् सदाधारा,
यत्कीर्तिसकृति सेव्या, अमृतरसाची जसी सदा धारी. ॥३॥
त्याचा पुत्र ऋतुध्वज वरगुण, जैसा जयंत शक्राचा;
मदहर गजयूथाचा सिंह, तसा जो स्वशत्रुचक्राचा. ॥४॥
ऋषिनृपकुमार भजति प्रेमें त्या सुगुणकेलिसद्मातें,
द्विजरूप अश्वतरफ़णिपतिपुत्रहि, मधुप जेंवि पद्मातें. ॥५॥
एका समयीं ऐसें अश्वतर पुसे, ‘ कुमार हो ! असतां,
रात्रौ मात्र स्वगृहीं, दिवसा कोठें सुबुद्धि हो ! वसतां ? ॥६॥
ते वदले, ‘ नृप आहे शत्रुजिदाख्य प्रसिद्ध, अनयातें
जो स्वप्नींहि न साहे, त्याच्या भुललों गुणाढ्य तनयातें. ॥७॥
सुगुणनिधि तसा तोचि, ज्ञाते बहुतचि तयास मानवती,
जी साधुता तयाची, वांछिति वर्णूनि देवमानव ती. ’ ॥८॥
अश्वतर म्हणे, ‘ सुत हो ! तो धन्य, यदीय सुगुण हे मागें
घेतां मज सुख देतां; वंदावा साधु पुरुष हेमागें. ॥९॥
सत्कार करा प्रेमें, जो तुमचा साधु नरसखा, याचा;
मित्रातें न समर्पुनि, तो स्वर्गींचाहि न रस खायाचा. ॥१०॥
तो मृतचि पुरुष, मित्रीं प्रत्युपकृतितें न जो करी यत्नें,
स्वसख्यातें सुखवाया द्या मत्सदनांत असति जीं रत्नें. ’ ॥११॥
ते दोघेहि कुमार प्रांजलु वदती असें, ‘ अहो ! तात !
साधु गुणज्ञ गुरु जसे, न स्वस्तरुहि प्रसन्न होतात. ॥१२॥
रत्नें ऋतुध्वजगृहीं; त्या द्याया योग्य नव नसे कांहीं;
शशिकांता बालनगा अन्यांहीं तृप्ति न वनसेकांहीं. ॥१३॥
बा ! दिव्य बाहनासनयानांबरभूषणादि जें कांहीं
त्याचें, अस्मत्सदनीं या पाताळांत वस्तु तें नाहीं. ॥१४॥
कर्तव्य एक आहे, स्मरतां खिन्न क्षणक्षणीं करितें,
विधिहरिहर - दत्त - वरावांचूनि असाधु सर्वथा परितें ’. ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP