तो कुवलयाश्व जावुनि गालवमुनिसह तदाश्रमीं राहे,
तों सूकररूप असुर मुनिचें धर्षण करावया पाहे. ॥१॥
तों गालवशिष्यांहीं त्या पाहुनि फ़ार गलबला केला;
तन्मतिस खररवें दे भय, जेंवि श्येनगल बलाकेला. ॥२॥
अश्वीं चढोनि धांवे नृपसुत होवूनि तप्त कोपानें,
त्या सूकरासि ताडी चंद्रार्धाकार तीव्र रोपानें. ॥३॥
आत्मत्राणार्थ करी आश्रय तो मूढ दैत्य अटवीतें,
फ़टवीतें विधिबळ ज्या, रक्षिल कसि पूजिलीहि सटवी तें ? ॥४॥
लंघुनि महावनाचळ पळतां, गांठावय खळा किटिला,
दिव्याश्व तयामागें राजकुमारें धनुर्धरें पिटिला. ॥५॥
निबिडांधकारगर्तीं सूकर घाली उडी, तयामागें
रागें तो कुवलयही, पक्षीश्वर वंचिल जसा नागें. ॥६॥
नृपसुत मागें लागे, जेंवि वधाया महाहितें विवर,
तत्तेजासि न परि, जरि भंगद रविच्या महाहि तें विवर. ॥७॥
गेला पाताळीं, कीं त्याचें द्वारचि तसें महाबिळ तें,
पाहे प्रकाशवर पुर; सर्वत्र श्रेय साधुला मिळतें. ॥८॥
करुनि प्रवेश, पाहे नृपसुत अतिरम्य शून्य परि पुर तें,
स्त्रीतें विलोकुनि पुसे, उत्तर ईक्षणहि ती न करि पुरतें. ॥९॥
ती स्त्री प्रवेशली ज्या प्रासादीं सत्वरा, तयामाजी
नि:शंक कुमार शिरे, द्वारीं स्थापूनि तो महावाजी. ॥१०॥
रत्नकनकपर्यंकीं पाहे तो रतिसमा नवी रमणी;
अवलोकिला तिणेंही सहसा हा स्मरसमान वीरमणी. ॥११॥
पर्यंकावरुनि उठे, त्यातें अवलोकितांचि ती मोहे,
जळपवनाद्युपचारें स्वस्था तीची सखी म्हणे, ‘ हो हे. ’ ॥१२॥
होय मुहूर्तें सावध, मधुर पुसे सर्व वृत्त तीस,
‘ तूं कोणाची ? कां या शून्यपुरीं क्लेशपात्र होतीस ? ’ ॥१३॥
वृत्त प्रेमें पुसतां सुदती स्वसखीमुखाकडे पाहे,
ती बोले, " पुरुषवरा ! वृत्त क्लेशद इचें असें आहे:- ॥१४॥
गंधर्वांचा राजा, विश्वावसु, जिष्णुचा सखा आहे,
त्याची मदालसाख्या कन्या धन्या, बहु प्रिया, बा ! हे. ॥१५॥
जो वज्रकेतुदानव, तत्सुत पाताळकेतु या नावें,
या पाताळीं वसतो, कळिकाळें ज्यासि मित्र मानावें. ॥१६॥
उद्यानगता हे त्या दुष्टें, हरिणी वृकें, तसी धरिली;
मत्प्रियसखी मदांधें, प्रकटुनि माया तमोमयी, हरिली. ॥१७॥
येत्य त्रयोदशीचा निश्चय केला इला वरायाचा,
‘ शूद्र श्रुतिस, मज तसा हा ’ म्हणुनि इणेंहि बा ! मरायाचा. ॥१८॥
भेटोनि सुरभि वदली, ‘ वत्से ! धरिं तूं मदुक्तिचें स्मरण,
हा दानवाधम तुला पावेल न, वांछितीस कां मरण ? ॥१९॥
या नरलोकगतातें भेदील शरेंकरूनि जो मर्मीं,
तो सत्वर तव भर्ता होवुनि, घालील तुज महाशर्मीं ’. ॥२०॥