येवुनि पुरासि, वंदुनि तातातें, सर्व वृत्त तो कळवी,
पळवे शोक पळांत, स्वयशें शात्रवजनाननें मळवी. ॥१॥
‘ वाहो देह यशासि, न मोत्यांच्या हा तसा सरा, सासो
सुचिर असां ’ म्हणति असें, शिरिं ठेवुनि हात, सासरा, सासु. ॥२॥
होय पुरांत महोत्सव, वांटिति जन कनक, शर्करा, जीवां;
तो वासर बहु सुखवी त्या पौरां, जेंवि अर्क राजीवां. ॥३॥
वर्णिति अश्वतरा किति, शत्रुजिता किति, ऋतुध्वजासि कवी,
त्यांतें, ‘ मदालसाव्रत, निजभाग्यहि गा ’ असें प्रजा सिकवी. ॥४॥
मंदाकिनींत जैसा जाणे तापा महागज न काहीं,
हा नृप तैसा; वरिलें सुख इतरांच्या महान जनकाहीं. ॥५॥
स्वर्गासि शत्रुजिन्नृप, परिपाळुनि पुत्रवत् प्रजा गेला;
मग कुवलयाश्व राजा, पडुनि गळां प्रकृतिनीं बळें केला. ॥६॥
पोटीं मदालसेच्या शुभलग्नीं प्रथम होय सुत राजा;
संसृति, सतीसहाया, नीतिरता सर्वकाळ सुतरा ज्या. ॥७॥
प्रेमें ‘ विक्रांत ’ असें नाम ऋतुध्वज तया सुता ठेवी,
तेव्हां ती हास्य करी ज्ञानामृतनिधि मदालसा देवी. ॥८॥
उल्लापनछळें ती ज्ञानाब्धि मदालसा स्वतोकातें
बोधी, न सांपडाया इतरांपरि संसृतींत शोकातें. ॥९॥
‘ ताता ! शुद्ध अससि तूं सर्वगत, अनादिनिधन, निष्काम,
आतांचि कल्पनेनें केलें ‘ विक्रांत ’ हें तुला नाम. ॥१०॥
तूं नामरूपवर्जित, मायेनें विश्व कल्पनागेह,
स्नेह नसे विषायांचा, पंचात्मक हा तुला नसे देह. ॥११॥
अन्नें उदकें भूतें वाढति; तुज वृद्ध, हानि बा ! नाहीं;
तूं एक, अविद्येनें दिसती भूतें उगीच नाना हीं ’. ॥१२॥
स्तन पाजितां, निजवितां, हालवितां, बाळकासि खेळवितां,
दे बोध, जो सुदुर्मिळ थोरांसि सहस्त्र कल्प मेळवितां; ॥१३॥
जन्मापासुनि बोधुनि केला विक्रांत पुत्र सुज्ञानी,
वांछीना गृहधर्म, स्तविला बहु नारदादि सुज्ञानीं. ॥१४॥
त्यावरि ‘ सुबाहु ’ ऐसें नाम स्थापी द्वितीय तनयातें;
हांसे मदालसा, जरि मानवती आप्त सुज्ञ जन यातें. ॥१५॥
त्यासहि बाल्यापासुनि बोध करी ती मदालसा सुसती,
अहिता संसारावरि त्याचीही बुद्धि जाहली रुसती. ॥१६॥
मग तिसरा सुत होतां, पुर झालें अद्भुतोत्सवा धाम;
त्यालाहि ‘ शत्रुमर्दन ’ ऐसें ठेवी पिता स्वयें नाम. ॥१७॥
त्या नामें जन हर्षे, तेव्हांहीं बहु मदालसा हांसे,
दे आत्मबोध त्यासहि, जो तोडी विषयवासनाफ़ांसे. ॥१८॥
नाम चतुर्थ सुताचें जों योजी कुवलयाश्च, तों पाहे,
ती हसितमुखी देवी बहु पहिल्याहूनि जाहली आहे. ॥१९॥
नृपति पुसे, ‘ हद कारण हास्याचें, जें मना तुज्या येतें;
नाम चतुर्थ सुताला ठेवावें त्वांचि आजि जाय ! तें. ॥२०॥