यास्तव उद्योग असा करवुनि, हें साधिलें महाकार्य,
हो पात्र ज्ञानातें गावोत तुझ्याहि कीर्तितें आर्य. ’ ॥६१॥
काशिपति म्हणे, ‘ घडत्ये ज्या ज्ञानें गति परा, सुबाहो ! तें !
सांग मजहि, अमृत उठवि सत्वातें, जें परासु बा ! होतें. ॥६२॥
तूं साधु, प्रणतजनीं सर्वींही त्वां दया करावि खरी;
जो उगवला अमृतकर, सर्वत्रहि तो दयाकरा विखरी. ’ ॥६३॥
तो ज्ञानी त्यासि म्हणे, " विश्वासें ‘ मम, अहं, ’ असा राया !
त्वां प्रत्यय न करावा; यावरि सोडून दे असारा या. ॥६४॥
वृत्तिरहित अभ्यासें हो; ‘ न स्वामी दुजा, न दास मज,
आपण एक विशुद्ध ब्रह्म ’ असें निश्चयें सदा समज. " ॥६५॥
ऐसा उपदेश करुनि, हरुनि भवभ्रम, सुबाहु साधु निघे,
काशिप, अलर्कहि सुता दे राज्य, स्वपद, भव्य साधुनि घे. ॥६६॥
तो आपणासि पाहे सावध, सर्वा जगा प्रमत्तातें,
प्रमुदित अलर्क होय ब्रह्मानुभवें भजोनि दत्तातें. ॥६७॥
‘ हा ! हा ! केलें राज्य, क्लेशद विषयांत सर्वदा रमलों;
श्रमलों व्यर्थ, ‘ परम सुख योगचि ’ हें नुमजलों, बहु भ्रमलों. ॥६८॥
करूणासुधासमुद्रा ! श्रीदत्ता ! ब्रह्मवित्सभानाथा !
माथा पदीं वहातां उद्धरिसि, ’ अलर्क गाय हे गाथा. ॥६९॥
राज्य सुतांतें देवुनि गेला, ठेला तपोनिधी रानीं,
पावे गति ते, वरिली जी श्रुतिगीता तपोनि धीरानीं. ॥७०॥
पावे सुबाहुबोधित, संग त्यागूनि, काशिराज गती;
झांकी विरक्ति, न तसी ज्याच्या बहुभोगदा शिरा जगती. ॥७१॥
श्रीमद्गुरुपुत्रांहीं आज्ञा केली, निरोप पाठवुनि;
श्रीरामसुत मयूरें लिहिलें श्रीहरिहरांघ्रि आठवुनी. ॥७२॥
श्रीहरिहरकीर्ति - तसी न मुखमनांतुनि मदालसा जावी;
‘ साधुसभेंत ’ रसिक हो ! प्रेमें ऐकुनि वदाल, ‘ साजावी. ’ ॥७३॥
मूर्तिमती श्रीशंकरकरुणाचि मदालसा, असी अन्या
धन्या कोणालाही झली नाहीं अहासती कन्या. ॥७४॥
हें सच्चरित्र भावें गावें नि:शेषही अघ सराया,
उच्चपदीं वेधाय, तेथुनि कल्पक्ष्यीं न घसराया. ॥७५॥