तुज अनुलक्षुनि आलों या प्रासादांत कुंडले ! सुमते !
मीं सत्य मनुष्य मधुप, देवासुरपन्नगादि जे, सुम ते ". ॥४१॥
श्रवण असें होतां, ती हर्षे, लाजे मदालसा कन्य,
वदनीं सुस्मित वाहे, पाहे स्वसखीमुखाकडे धन्या. ॥४२॥
ती कुंडला म्हणे, ‘ तूं वीरा ! वदलासि सत्य, मन ईचें
तरिच तुतें अनुसरलें; वरुनि सरा, वन वसेल न नईचें. ॥४३॥
चंद्रातें पावुनियां तपनद्युति पावती अधिक कांति;
क्षांति श्रेष्ठा, धन्या भूति मिळे, धृति भटा, कविस शांति. ॥४४॥
त्यांचि अधम तो वधिला, कां मिथ्या कामधेनु बोलेल ?
कन्याकरग्रह करीं, हर्षें गंधर्वराज डोलेल. ’ ॥४५॥
राजकुमार म्हणे, ‘ सति ! मीं आहें नाथवान्, कसें स्वमतें
हें कन्यारत्न वरूं ? गुरुलंघन यांत मन्मना गमतें ’. ॥४६॥
आलि म्हणे, ‘ न वद असें, होसिल न, इतें वरूनि, अपराधी;
देवी हे दुष्प्रापा, म्हणुनि करावी कदापि न परा धी ’. ॥४७॥
नृपसुत म्हणे, ‘ बहु बरें, देवीवचनहि अलंघ्य, सांगाल
विहितचि, तें कर्म करिल न गुरुजनाचे प्रफ़ुल्ल कां गाल ? ’ ॥४८॥
या कुवलयाश्ववचनें बहु हर्षें सालि कुंडला भरली,
गंधर्वेश्वरकुलगुरु तुंबरुतें तेधवां मनीं स्मरली. ॥४९॥
स्मरतांचि कळे, आणी पाताळीं वत्सलत्व तुंबरुतें;
धेनुहि धांवे, न म्हणे, ‘ करुनि विलंब, स्वतोक हुंबरु तें ’. ॥५०॥
तो तुंबरु संपादी दोघांच्या सुविधिनें विवाहातें,
वंदूनि आखुवाहा, हंसवृषभवाहसह विवाहातें. ॥५१॥
तुंबरु गेल्यावरि ती स्वसखीतें कुंडला म्हणे ‘ आले !
त्वद्हृदयीं, सद्गुण जे, ते सर्व सुखें वसावया आले. ॥५२॥
तुज न लगे शिकवावें, स्नेहें देत्यें परंतु आठवुनी,
पतिभजनीं सुख पावो तव मति, शीतांत जेंवि पाठ वुनीं. ॥५३॥
पति परमेश्वर याच्या भजनीं अनुकूलबुद्धि हो भावें,
लोभावें न तनुसुखीं, त्वां संपादूनि कीर्ति शोभावें ’. ॥५४॥
त्या नृपपुत्राहि म्हणे, ‘ तुज सर्वज्ञासि काय सिकवावें ?
स्रेहें वदत्यें, स्त्रीसह पुरुषार्थत्रय जपोनि पिकवावें. ॥५५॥
स्त्रीयोगें पुरुषाचे साधति धर्मार्थकाम, सत्या गी
हे श्रुतिची, सात्विक घे, राजस कीं ईस तामस त्यागी. ॥५६॥
दोघें चिरकाळ तुम्हीं सतत सुखें पुत्रपौत्रसह नांदा,
तुमच्या यशासि सज्जन सेवूत, चकोर ते जसे चांदा. ॥५७॥
सफ़ल मनोरथ झाले, स्वस्थ मनें जातसें तप कराया.
हेंचि परम मधुर मना माझ्या, अमृतहि गमे सपक राया ! ’ ॥५८॥
स्वसखीतें आलिंगुनि, तत्पतितें नमुनि, कुंडला गेली.
हेलिस्यंदनतुरगीं घेवुनि हृष्ट प्रियें प्रिया केली. ॥५९॥
निघतांचि पुराबाहिर, ये दुर्भति तालकेतु सह-सेन;
गर्जुनि म्हणे, ‘ तुज वधुनि कां मीं, होवूनि मुदित, न हसेन ?’ ॥६०॥