जी अज्ञानतमोघ्नी प्रभुदृष्टि पडे नता नृपावरि ती,
शरणागता तयातें तत्काळचि जाहली कृपा वरिती. ॥२१॥
वंदुनि म्हणे, ‘ प्रभो ! मीं शरणागत, मुख्य तूं शरण्यांत;
रक्षीं, दु:खीं पडलों, मृग जेंवि दवाकुळा अरण्यांत. ’ ॥२२॥
श्रीदत्तात्रेय म्हणे " बा ! वद तूं कोण ? दु:ख तें काय ?
घाय दिसे ना देहीं, हो सावध, ऊठ म्हणसि कां ‘ हाय ? ’ " ॥२३॥
ऐसें विश्वगुरु पुसे, चित्तांत अलर्क जों विचार करी,
जाणे, ‘ मीं सच्चित्सुख एक, इतर कोण मित्र ? कोण अरी ? ॥२४॥
देहादि इतर सकलें विकळे, एणें न मीं सकळ विकळ,
देहाभिमान नसतां, ताप उठुनही बुधा न कळवि कळ. ’ ॥२५॥
तो श्रीदत्तासि म्हणे, ‘ मज दु:ख बरें विचारितां नाहीं,
जीव असम्यग्दर्शी संसारी सुख न पावती कांहीं. ॥२६॥
पुरुषाच्या चित्ताचें जेथें जेथें ममत्व बा ! होतें,
तेथुनि तेथुनि दु:खें आणुनि देतें समर्थबाहो ! तें. ॥२७॥
गृहकुक्कुटासि खातां मार्जारें, जेंवि दु:ख होय जना,
तेंवि न ममताशून्या चटका कीं मूषका, स्वभक्तधना ! ॥२८॥
म्हणुनि न दु:खी, न सुखी, कीं प्रकृतीहून, पाहतां, पर मीं;
कळलें असें, विचारीं या आतां क्षणहि राहतां परमीं. ’ ॥२९॥
त्यातें श्रीदत्त म्हणे " जें तूं वदलासि, सत्य, तें बा ! गा !
दु:खाचें कारण ‘ मम ’, ‘ न मम ’ सुखाचें, नृपा ! महाभागा ! ॥३०॥
हें ज्ञान मत्प्रसादें झालें तुज, साधुवृंद या गातें;
‘ मम ’ हा प्रत्ययशाल्मलितूळ उडविला सुदूर ज्या वातें. ॥३१॥
सत्संगशाणनिशितें विद्याशस्त्रेंकरूनियां ज्याहीं
ममतादु तोडिला, बा ! नाहीं भय या भवीं तयां काहीं. ॥३२॥
अमता ममता त्यजितां आत्मसुख प्राप्त होय, गा ! राज्या !
लाजति, विरति, निपट सुख द्याया, नेणोनि सोय, गारा ज्या. ॥३३॥
राजा ! भूतेंद्रियमय हें, स्थूळ न तूं, न मींहि, बा ! समज.
क्षेत्रज्ञ क्षेत्राहुनि पर कथितों, बहु अभीष्ट दास मज. ॥३४॥
झषजळ, मशकोदुंबर, या एकत्वीं जसा पृथग्भाव,
ऐसा क्षेत्रात्म्यांचा जाण, अलर्का ! धरीं बरा भाव. " ॥३५॥
इत्यादि दत्त बोधी, शोधी मन, कथुनि साधु योगातें;
शरणगतासि तारी, कविवृद उगेंचि काय हो ! गातें ? ॥३६॥
श्रीदत्तात्रेयातें नमुनि म्हणे तो अलर्क राजवर,
‘ गुरुजी ! मीं उद्धरिलों, नरकीं होतों निमग्न आजवर. ॥३७॥
झाला बरा पराभव, कोधबळांच्या क्षयें परित्रास;
आला हा शरण तुज त्रिजगत्पावनमहाचरित्रास. ॥३८॥
उपकारी काशीश्वर, अग्रज माझा सुबाहुही मोटा,
खोटा गमला जाड्यें, त्वत्संगचि लाभ, राज्य तो तोटा. ॥३९॥
व्यसन बहु बरें तें, कीं आलों या ज्ञानदा पदापाशीं,
सांपडतों काळाच्या, भोगाया आपदा सदा, पाशीं. ॥४०॥