त्या गौतमीनदींत व्याळनरेश्वरकुमार ते सिरले,
जींत स्त्रातसकळजनदोष, ज्वाळेंत शलभसे, जिरले. ॥४१॥
मानी कुमार चित्तीं तटिनीपारीं स्वमित्रसदनातें,
नेती नदींत दोघे फ़णिसुत ते त्या प्रसन्नवदनातें. ॥४२॥
सिरवुनि सरितेंत, बळें आकर्षुनि सर्पपुत्र मित्रास,
नेती पाताळीं ते, परि पावे तो न लेशहि त्रास. ॥४३॥
निजलोकीं निजरूप प्रकटिति मग ते फ़णींद्रसुत दोघे,
पाहुनि हर्षे हांसे, तत्सुगुणांतें गुणज्ञवर तो घे. ॥४४॥
प्रेमीं न चळे, गातां जैसा नारद महातपा ताळीं;
अश्वतरप्रासादीं गेला कुतुकें पहात पाताळीं. ॥४५॥
ते त्या कथिति स्वपिता, अश्वतर व्याळपाळ दावूनी;
तो कुवलयाश्व वंदी विनयें, चित्तांत तात भावूनी. ॥४६॥
सुतमित्रातें पाहुनि, तो अहि उतरे वरासनावरुनी,
भेटे, माथां हुंगी, कुरवाळि तया करास नावरुनी. ॥४७॥
तो त्या म्हणे, म्हणावें साक्षात् तातें जसें, ‘ चिरं जीव;
गुरुजनमन सुगुणांहीं बहु रंजविसी, असेंचि रंजीव. ॥४८॥
सुगुण तुझे आयिकतां या पुत्रांच्या मुखें, हृदय रमलें,
आणविलासि पहाया वत्सा ! तुज पाहतां, सुदिन गमलें. ॥४९॥
जो पुरुष गुणी, त्याचें जीवित तें श्लाघ्य होय लोकांत,
जीवंतहि मृत अगुणी, कीं बुडवी स्वजनचित्त शोकांत. ॥५०॥
गुणवान् सुख वाढवितो साधुमनीं, रिपुजनांत तापातें;
पापा-तेंवि अपत्या अगुणा न भजति, नसोचि बापा ! तें. ॥५१॥
देव, पितर, विप्र, अतिथि, अर्थी, जे विकळ, मित्र, जन बा ! हे
गुणिजीवित चिर वांछिति, वाहे हा यांसि भाग, यश लाहे. ॥५२॥
वत्सा ! गुरुजनरंजनरतहृदया ! भव्यगुणगणावासा !
तुझिया ठायीं जो जो, तो तोहि गुणांत गुण गणावासा. ’ ॥५३॥
ऐसें वर्णुनि फ़णिवर, पुत्रांसि म्हणे, ‘ उठा, सखा न्हाणा,
आणा स्वन्न मधु, अशन करवा, पूजा बहिश्चरा प्राणा. ॥५४॥
राहो, बोलायाची यासीं आहे कथा पुनरपि हिता,
हृदयीं रहस्यवार्ता राहों देयिल न हा सुनर पिहिता. ॥५५॥
विनयें न वदे किमपि, प्रेमें परि वाक्य मान्य तो करि तें,
त्या पूर्ण करूं पाहे अहि, न असों दे समर्थ तोक रितें. ॥५६॥
स्नानाशनादि करवुनि, करुनि, प्रेमें सभेंत सुतसहित
अश्वतर बसे, बसवुनि जवळ नृपतनय, वदावयास हित. ॥५७॥