अश्वतर म्हणे ‘ माझें विपुळ नसे हृदय या महा माया;
अभ्यागत बाळहि गुरु, वांछिसि, तरि तूं सुखें पहा माया. ’ ॥२१॥
ऐसें बोलुनि, सदनीं निजली होती मदालसा दुहिता,
ती आणुनि तो दावी, सुतमित्राच्या करी असा सुहिता. ॥२२॥
स्मित करुनि पुसे, ‘ तव मन जीच्या ठायीं सदा असे लोल,
ती हे मदालसा, कीं अन्या ? वत्सा ! पहा, खरें बोल. ’ ॥२३॥
अवलोकितांचि, लज्जा सोडुनि, सहसा उठे, ‘ प्रिये ! आली ! ’
ऐसें म्हणत, तिजकडे आलिंगायास धांव तो घाली. ॥२४॥
नागेंद्र विनोद करी, ‘ रे वत्सा ! मजकडे पहा, काय
भ्रमसी ? हे माया, कीं योग्य स्पर्शावया न हा काय. ॥२५॥
करितां स्पर्श, न राहे माया, दूरूनि मात्र बा ! पाहें;
आलिंगनें न निवविल पळ विद्यारचितगात्र बापा ! हें. ’ ॥२६॥
यापरि वदुनि, निवारण करि जेव्हां पन्नगेंद्र तो हातें,
‘ हाय ’ कुवलयाश्च म्हणे, तत्काळ पडे धरूनि मोहातें. ॥२७॥
मोहे अश्चतराचें पुत्राच्या जेंवि तातमन घातें;
सावध करि शीत वनें पवनें, पुत्रांसमेत अनघातें. ॥२८॥
करुनि विनोद क्षणभरि, तो पन्नग सर्वसाधुराय कवी,
अर्पुनि कन्या प्रेमें, वृत्त सकळ तें तयासि आयकवी. ॥२९॥
कांतेतें पावुनि, तो बहु हर्षे कुवलयाश्च, करि नमनें,
प्रार्थुनि म्हणे, ‘ फ़िटाया ऋण, चरणस्मरण, नित्य करिन मनें.’ ॥३०॥
मग चिंतितांचि आला कुवलय हयवर; चढे तयावरि तो,
ये सस्त्रीक स्वपुरा, सुगुण जन पुन्हा महोदया वरितो. ॥३१॥