त्या वीरवरें त्वाष्ट्रें भंगुनि पाताळकेतु़च्या अनुज्या,
विजयश्रीसह नेली गंधर्वक्षोणिजानिची तनुच्या. ॥६१॥
समरीं मुहूर्तमात्रें दंत्यचमूच्या करूनि घातातें,
सस्रीक नमुनि, कळवी वीर कुवलयाश्व वृत्त ताता तें. ॥६२॥
सुतविजयें भूपाच्या आनंदा त्रिभुवनीं नसे जोडा,
थोडा स्वप्राण प्रिय वाटे त्या, त्यापरीस तो घोडा. ॥६३॥
ताताज्ञेनें बैसोनि दिव्याश्वीं, सर्वदाहि साधु निघे,
पूर्वाह्रींच महिवलयगत विश्वाशीं तदिष्ट साधुनि घे. ॥६४॥
क्षितिपर्यटन करुनि, तो स्वजनीं करि अमृतवर्ष वीरमणी,
क्रीडुनि रम्योपवनीं, मणिभवनीं बहुत हर्षवी रमणी. ॥६५॥
यापरि वर्तत असतां, रम्याश्रम रविसुतातटीं पाहे,
ज्यांत महामुनिरूपें मायावी ताळकेतु तो आहे. ॥६६॥
त्यासि न जाणुनि, भेटे शत्रुजिदात्मज; तयासि तो खोटा
मोटा गोड वरि, कठिन आंत, गुळें घोळिला जसा गोटा. ॥६७॥
राजसुतासि खळ म्हणे, ‘ तुज कांहीं प्रार्थना असे, परिस,
परि भंग तिचा न करीं; तूं दाता, कल्प जो, तयापरिस. ॥६८॥
बा ! धर्मार्थ करावा यज्ञ, असें जाहलें असे चित्त,
परि शुचि तप मात्र असे, इतर नसे लेश संग्रहीं वित्त. ॥६९॥
साहित्य दक्षिणेचें नसतां, करिती वृथा कवि न यज्ञ,
दे हें कंठविभूषण, पितृसम दाता, न तूं अविनयज्ञ. ॥७०॥
बापा ! महाप्रतापा ! विप्रावनपुण्यकर्मदक्षा ! या,
उदकीं स्तवूनि वरुणा यें, तों वस आश्रमासि रक्षाया ’. ॥७१॥
ग्रीवाभूषण देवुनि, नमुनि, म्हणे कुवलयाश्व, ‘ चापातें,
सजुनि करीं बसतों, जें कर्तव्य, करीं विशंक बापा ! तें. ’ ॥७२॥
हर्षें कपटमुनि करी मज्जन यमुनेंत, शत्रुजिन्नगरीं
जाय, तसा तो शोकीं पडुनि, जसा जीव होय खिन्न गरीं. ॥७३॥
भेटुनि शत्रुजितातें, गंधर्वेश्वरसुतासमक्ष ‘ महा -
झाला घात ’ म्हणे, ‘ यश ज्याचें दुग्धाब्धिच्या सम क्षम हा ! ॥७४॥
त्वत्पुत्र कुवलयाश्व ब्राम्हणमुख्यप्रजावनामूळें,
बापा ! मायावि - वरें दैत्यें हृदयींच भेदिला शूळें. ॥७५॥
प्राणोत्क्रमणीं मज हें कंठविभूषण दिलें बळें नमुनीं,
तैशा समयीं घ्याया दान सदय मीं न कां वळेन मुनी ? ॥७६॥
त्या शूद्रतापसानीं अग्नि दिला, जरि धरूं न दे वाजी,
रडला तरि, दैत्यानें नेला बंधन करून देवाजी ! ॥७७॥
हें म्यां विलोकिलें बा ! कारण दु:सहतरोग्र तापाचें.
झालें प्राप्त फ़ळ मजहि माझ्या बळिपूर्वजन्मपापाचें ! ॥७८॥
उत्तरकार्य करीं बा ! सविवेका क्षम न शोक घेराया;
मज नि:स्पृहा कशाला हें भूषण ? तूं विलोक, घे राया !’ ॥७९॥
ऐसें बोलोनि, पुढें भूषण ठेवूनि, निघोनि तो जाय.
राय क्षोणिवरि पडे, प्रियसुतशोकें म्हणोनियां ‘ हाय.’ ॥८०॥
राज्ञीला शोक जसा ताप, तसा पापिया न रौरव दे.
अंत:पुरजनचि न तो, ‘ हा ! हा ’ ऐसें अशेष पौर वदे ! ॥८१॥
प्रियशोकें प्राणातें तत्काळ सती मदालसा सोडी.
भूप म्हणे, ‘ शोच्य नव्हे हा मत्सुत, सुयश सुगतितें जोडी. ॥८२॥
मुनिरक्षणासि जैसा, तैसा न प्राणरक्षणा जपला;
खपला अपलायनकर, बहुधा बहुजन्म साधु हा तपला. ॥८३॥
जैसी मदालसेची कोणाचीही असी प्रसू नाहीं,
हे पूजिली सुराहीं, देवी दुर्गा जसी, प्रसूनाहीं,॥८४॥
राज्ञीहि उठोनि म्हणे, ‘ श्रितरक्षक विष्णुचक्र वत्सा ! जें,
तें तुज धन्य म्हणेल, स्वर्गीं त्रिदशांत शक्रवत् साजें. ॥८५॥
जरि गेलासि न पुसतां, तरि वत्सा ! मीं करीन कां रुसवा ?
मरुनि रणीं, त्वां माझा केला बा ! धन्य या जगीं कुसवा. ॥८६॥
वत्से ! मदालसे ! हा तुजसह तव कांत सुचिर नांदावा.
चांदा वाटो प्रियसख, यासीं द्विजपाळ करिल कां दावा ?’ ॥८७॥
सस्त्रीक नृप विवेकें क्षम जाळायास होय देहातें,
दाहोत्तर स्नुषेतें, त्या पुत्रातेंहि तोय दे हातें. ॥८८॥
यापरि दु:सहशोकीं बुडवुनि महिपतिस, महि, मायावी
हर्षें फ़ार; दया कां त्या, करितां घात, अहिसमा यावी ? ॥८९॥
तो यमुनेतूनि निघे असुर, म्हणे, ‘ कार्य करुनि मीं आलों,
झालों कृतकृत्य, तुवां केलें साहित्य, बहु सुखें धालों. ’ ॥९०॥
ऐसें बहु मधुर वदे, दे आज्ञा त्यासि, नमुनि हरिवरि तो
बसुनि पुरा ये, ज्यातें स्वप्नीं पाहोनि, भीति अरि वरितो. ॥९१॥