भगवती उषा
लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.
रोजच्या रोज हसतमुखानं दुनियेला दर्शन देणार्या उगवीबद्दल आणि रामप्रहराबद्दल आजवर माणसं नेहमीच बोलत आली आहेत. एवढेच नाही तर ह्या उगवतीला ऋग्वेदकालीन मंडळींनीं देवता मानून तिच्याकडून सुखसमृद्धीबद्दल अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
परंतु लोकगीतांतून आलेली ही भगवती उषा काहीशी निराळीच आहे. इथे देखील घरच्या मुलाबाळांना व घरधन्याला उदंड आयुष्य तिच्याकडून अपेक्षिले आहे. मात्र तिचे वर्णन अधिक विस्ताराने व अपूर्वाईने झालेले दिसून येते आहे.
भल्या पहाटेच्या वेळी पूर्वेला लाल झालेली उगवती लाल शेंदराच्या खापेसारखी दिसते आणि चंद्र मावळायला जात असताना ही उगवती लाल आगीच्या भडक्याप्रमाणे दिसत असल्याचे इथे म्हटले आहे. तसेच गुलालाच्या गोण्या उधळीत दुनियेत येणारा सूर्यदेव हा आपल्या दारी मोत्यांच्या सडका फ़ेकीत असून त्याच्या दर्शनाने सारे रान मखमलीप्रमाणे हसत असल्याचेही वर्णन इथे गवसते.
गाडीच्या चाकाएवढा दिसणारा सूर्यदेव नऊ लाख पृथ्वीवर प्रकाश पाडू शकतो हे सांगताना इथे त्याचा प्रकाश धावत्या हरिणाप्रमाणे दिसत असल्याचे म्हटले आहे. सकाळच्या वेळी सडासंमार्जन करावयाचे ते ह्या सूर्यदेवाला सुखाच्या प्रवासासाठी रस्ता करून देण्यासाठी हा भाव इथे लोकगीते अपूर्वाईने सांगतात.
उगवता सूर्य हा तान्ह्या बाळाप्रमाणे दिसतो, त्याचेकडून चुडेदान मिळते असा भाव व्यक्त करताना लोकगीतकारांनी या देवाला रामराम घालण्यासंबंधी आपल्या मुलांना विनविले आहे.
रामप्रहार वर्णन करीत असताना लोकगीतकारांनी आपल्या जीवनातील त्या घटकेचे कार्यक्षेत्र वर्णन केलेले आहे. सूर्यदेवाचा रथ आल्याची चाहूल लागल्यामुळे कोंबडा भल्या पहाटे बांग देतो, तुळशीबनात कृष्ण खेळायला जातो, नदीनाले माणसांनी फ़ुलून जातात, वाजंत्री तुर्यांनी देवाची आंघोळ घडते, राउळातून काकडआरती होते, हरीनामाचा गजर होतो अशा सुंदर कल्पना लोकगीतांनी मनोभावे सांगितलेल्या आहेत.
त्यामुळे भगवती उषा ही जशी काय साजिवंत होऊन उठली आहे आणि प्रत्येकाला उदंड आयुष्याचं दान करते आहे असाच इथे भास झ्याल्याखेरीज रहात नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP