विठूरायाची नगरी
लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.
आमच्या घरच्या माणसांनी पंढरी एकदा सोडून दहादा केली असेल. पण म्हणून आपल्या मनानं आम्हांलाही कधी चला म्हटल्याचं आठवत नाही. पण गंमत काय झाली की, मागच्या सालालाच विठूदेवानं एक सोडून दोन चिठ्ठ्या पाठवून आम्हाला या म्हटलं. म्हणताना घरच्या माणसांचा निरूपायच झाला. संगं पीठकुट आणि कपडालत्ता घ्यावा त्याप्रमाणं आम्हांला पण त्यांनी घेतलं ! तर हो ! मग आमचा आनंद काय सांगावा ? अंहं ! सांगून जमायचं नाही न् त्यातलं काही ऐकून पण कळायचं नाही.
तर सांगायचं म्हणजे वटीच्या गूळशेंगा खात आम्ही पंढरीची वाट धरली. झिरीमिरी पावसात चालताना शाडू मातींने रंगलेली पावलं बिगीनं उचलली. झम्माट्यानं निघालो. पण वाटेत आमच्या मनात ऐकल्या गोष्टींनी धुमाकूळ मांडून सोडला. पंढरी, विटूरायाची नगरी, कशी असेल न् कशी नाही या विचारानंच मन भांबावून गेलं.
आम्ही वर नेहमी वडीलधार्यांच्याकडून ऐकलेलं की, पंढरपूर परगणा आहे. आणि तिथं विठूच्या दरवाजावर मोत्यांचा खेळणा टांगला असून कुणीतरी परशुरामाला हालवायला सांगीत म्हणे स्वत: सैपाकाला गुंतलेलं आहे ! म्हणजे काय काय भानगड आहे कुणाला ठाऊक. आम्हांला कसं मेलं भुलल्यागतच झालं बाई.
अठ्ठावीस युगं विटेवर उभ्या असलेल्या देवाला म्हणतात की, फ़ुलांचा पायजमा शिवतात ! आणि त्यासाठी पंढरीच्या रमा उमा माळणी फ़ुलांच्या पाट्या डोईवर घेऊन झोकानं राऊळाला येतात ! म्हणजे एकेक नवलंच म्हणावं हं ! आमच्या घरी देवपूजेला चारदोन फ़ुलं मिळायची मारामार तर हा जामानिमा आम्ही कुठला हो पाहिलेला ! त्या कारणानं ह्या कल्पनेनंच खुळंभैरं झालेलं आमचं मन जेव्हा तुळशी बनात जाऊन स्थिरावलं तेव्हा जीव खाली पडला. मनाची उलघाल कमी झाली. खरं ना !
तुळशी मंजिर्यांचा मधुर सुवास आम्हांला ठाऊक होता आणि त्यांचा गुंफ़लेला हार पण आम्ही पाहिलेल्यातला. तरीदेखील पैस मैदान बघून टाळमृदंगांच्या साक्षीनं वसविलेल्या या नगरीतलं तुळशीबन कसं होतं हरी जाणे बाई ! म्हणून मग साधुसंतांच्या घोळक्यात टाळवीणा घेऊन चंद्राप्रमाणं डोलणार्या विठूदेवालाच आम्ही मनोमनी विचारलं की, तुमच्या नगरीच्या गोष्टी तुम्हीच देवा बोलाव्यात हे चांगलं.
पैशाला मिळणार्या नऊ नऊ माळा घालताना हात पुरेना तर खाली बैस म्हणून सांगायचं विठूदेवाला तर मग हे विचारायला काहीच हरकत नव्हती. पण वाटेत कुठला विठूदेव भेटायला ! आणि पंढरीनगरीचा सोन्याचा कळस तर अजून नजरेच्या टप्प्याखालीही न आलेला ! त्या कारणानं आमच्यासंगं आलेल्या लोकांना काही विचारावं असा बेत केला. हुरड्याला आलेल्या तुळशीबनातील भोरड्या घालवाव्यात म्हणून वीणा वाजवणारा विठूदेव ह्या लोकांना माहीत होता. पंढरीनगरी ओळखीची होती. म्हणताना विठू देवाच्या रथाचा हेलवा आल्यावर तिथल्या दुकानदारांची जशी धांदल उडे तशी आमची पण उडाली. कारण हरीच्या रथाला लक्ष पाय गुंतलेल्या विठू देवाच्या नगरीत रस्ते मोठे न् सगळीकडे ऊदकाड्यांचा घमघमाट सुटलेला अशी वदंता आम्ही ऐकलेली. तशात दर वाटेत जिकडे तिकडे जाई फ़ुललेली. म्हणजे मग आम्हांला सगळं नवीनच म्हणावं की ! आणि पंढरीला गेल्यावर मावशीला चांदीच्या कळशीनं आंघोळ घालायची, बापाजींच्याकडून चंद्रभागेच्या तासात गाईला कडबा सोडायचा, बंधूला शेंडीचा नारळ फ़ोडायला लावायचा असल्या कितीक गोष्टी आमच्या कानावर. म्हणताना आपल्या रथाला वाघ जुंपीत नवल विकणार्या विठूदेवापुढं आमची हो दाद कशी लागावी ? खरं का खोटं ! तरीपण मग धीर धरला. वाखुर्या वड्यावर फ़ुलांचं आंथरूण झाल्यामुळं येणार्या ज्ञानदेवाच्या दिंडीला सामोर्या येणार्या विठूदेवाच्या जोरावर आम्ही तसंच झोकात जाऊया म्हटलं. आणिक बुक्क्याच्या रांगोळीच्या खुणेनं पंढरीतील विठूदेवाचं राउळ गाठायचा बेत केला. म्हटलं मग काय व्हायचं ते होऊ दे.
पण मग असल्या विचारांनी उरी दाटलेला कल्लोळ दाबून धरताना पंढरीच्या राऊळातील विठूदेव नजरेत आला ! त्याच्या चंद्रहारानं डोळे दिपून ग्ले आणि मग जिवाची अशी धांदल उडाली की काय बोलावं न् कसं सांगावं ? मनाची मेली तालेवरीच अशा एकी आटपेना तर !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP