सीतामाईच्या वनवासाच्या कहाणीनं काजळून गेलेलं मन बरोबर घेऊनच त्या दिवशी मी नाशिकला गेलेवते. म्हटलं, ऐकलं होतं त्यांतलं ऐकलं होतं त्यांतलं खरंखोटं करायचं तर ते खुद्द रामरायाकडूनच करून घ्यावं आणि मनाला शांत करावं. म्हणून कौसल्येच्या रामाला एकटं गाठून घटकाभर बोलत बसावं असा बेत केला. पण बाई रामनामाच्या गजरानं भारलेली माणसं रामाभोवती अशी गर्दी करून उभी की, काय सांगू ? त्याची व माझी गाठ पडायची मुष्कील तर बोलणं कुठलं आलंय ? तरी पण मी त्या गर्दीतून तशीच पुढं घुसले न् रामाला हात जोडून नमस्कार केला. बघतेय तर रामाबरोबर सीतामाई तिथें उभी ! आणि राऊळ येणार्याजाणार्यांनी फ़ुललेलं. आता काय करावं ? म्हणून मग मी जरा विचारात पडले तर तिथं आलेल्या एका बाईनं मला विचारलं, “ मोकळ्या हातांनी कशी देवदर्शनाला आलात ? गंध, फ़ुलं, अक्षता, हळदकुंकू असलं काही बरोबर हवं माणसाच्या. त्याशिवाय शोभा नाही. काय ? ” तशी मी तिला उत्तर केलं, ‘‘ कौसल्येच्या रामाला मी चांगलं ओळखते. माझा नमस्कार सड्या हातांनी देखील त्याला पोचला. ”
पण तिला ते खपलं नाही. रागानं माझ्याकडे पहात ती बोलली, “ शिकलेल्या दिसता म्हणून हे बोलणं ? तुमच्या हृदयात रामाचा बंगला नाहीच कधी दिसायचा ! ” आणि फ़णकार्यानं निघून गेली.
इतक्यात तोंडाचं बोळकं झालेली एक म्हतारी तिथं फ़ूलवाती करीत बसली होती तर तिनं मला विचारलं, “ कोण्या गावाच्या ? ” मग मी बोलले, “ पुण्याची. ”
“ रामाचं नाव घ्यावं. ओठी अमृताचा पेला येतो. शीणभाग जातो. मग रामराया चांगला भेटतो. ”
“ हं ! ” मी त्या बाईला असं त्रोटकच उत्तर केलं. पण तिच्या बिनदातांच्या तोंडाप्रमणं माझ्या मनात रामाच्याबद्दल हलणार्या अनेक आठवणी जशा काय ओठावरच आल्या. म्हणताना मी तिला एकच प्रश्न विचारला, “ सीतेच्या एकी असा का वागला हा रामराया आजी ? ”
“ करीलच काय बिचारा ! रावणाचा कलंक लागला. राणी म्हणून सीता गादीवर बसावीच कशी ? ” त्या बाईच्या बोलण्यानं मला जरा चीडच आली. पण मग मी तिचा नाद सोडून दिला आणि राऊळाच्या बाहेर आले. समोर गोदावरी वहात होती, पलीकडे रामकुंड होतं. त्या पलीकडे पंचवटी दिसत होती. म्हणून त्या सगळ्यांच्या साक्षीनं मी आपल्याच मनाला विचारलं, “ परशुरामाचं घोडं करून खेळलेल्या सीतेला रामरायानं राणी करून घेतली. स्वयंवराचे वेळी धनुष्य मोडून दाखवीत सीतेनं केलेला पण जिंकला. ता मग त्या वेळी रामानं आपल्या मनी काय बरं निश्चय धरला असावा ? ” आणि मग काय झालं कुणाला माहीत. आपलं आपणच उत्तर घ्यायचं त्यापेक्षा राऊळातील रामरायालाच विचारून मोकळ व्हावं म्हणून माघारी मान वळवली तर काय बाई चमत्कार म्हणावा तरी ?
पंचवटीचे दलाल व व्यापारी झालेला राम, रामकुंडावा स्नानाला आलेला कौसल्येचा राम, गादीवर बसायला जाताना वडिलांचा आशीर्वाद घ्यायला जाणारा दशरथपुत्र, कैकईच्या हटवादीपणामुळं राज्यावर लाथ मारून वनवासाला निघालेला राम, रेशमी गोंड्याचा धनुष्यबाण हाती घेऊन लक्षमणाबरोबर जंगलातून भटकणारा राम, सीतेला हरणाच्या कातड्याची कंचुकी शिवायची हौस भागविणारा राम, रावणानं सीतेचं हरण केलं हे कळल्यावर भयभीत झालेला राम, लंकेवर चाल करून जाणार्या हनुमानाजवळ आपली खुनेची मुद्रिका देणारा राम, रावणाशी झालेलं युद्ध जिंकून सीतेच्या दर्शनानं भारावलेला राम, शबरीची बोरं खाणारा राम, हलक्या कानानं लोकांचं ऐकून सभोंवती सीतेला पुन्हा वनवासात धाडणारा राम आणि लवांकुशांच्या धनुर्विद्येतील पारंगततेनं सुखावलएला राम अशी शेकडो रूपं घेऊत राम सामोरा आल्यावर मी त्यांपैकी कोणत्या म्हणून रामाला माझ्या मनीची शंका विचारू ? मला कसं खुळ्यागत झालं. म्हणून मी जरा राऊळाच्या दाराशीच घुटमळले. तर रामाच्या मुद्रिकेचे खडे वेणीत घातलेल्या सीतामाईनं मला आत ये म्हटलं. मी राऊळात गेले. रामरायाचं पुन्हा दर्शन घेतलं आणि भाडभीड न ठेवतां तिथली माणसं थोडी बाजूला सारीत विचारलं, “ देवा, तुझ्या चरणी लक्ष तुळस वहावी तेव्हा कुठं तुझ्यामुळं अमृताचा द्रोण गवसतो म्हणतात ! खरं का ? आणिक एक सोडून रोज तुळशीला शंभर खेट्या घालाव्यात तेव्हा कुठं म्हणो सौभाग्याचा करंडा तुझ्यामुळं हाती येतो म्हणतात ! होय ? बाई बाई बाई ! माझ्यापाशी एवढा वेळ आहेच कुठं, तेव्हा ही उपसाभर मी करीत बसू. ”
पण मग बोलता बोलताच मी आपली जीभ चावली न् मलाच मी प्रश्न केला, “ अग, बोलायचं होतं खरं ते सोडून हे ग काय खुळे ? ” त्यासरशी मग बाई घाम फ़ुटला न् हलक्या पावलानं बाहेर येत मी पदरानं तोंड पुसलं. आणि मग पुन्हा एकदा लोकांच्याप्रमाण्म तिथल्या रामाला नमस्कार घालीत सरळ ते राऊळ सोडलं. घरी निघाले. आणि चारसहा पावलं चालून आले नाही तर एका गाडीवाल्या पोरानं मला हाटकली, “ चार आण्यांत राम !.... चार आण्यात राम !.... पाहिजे का ?
त्या वेळी मी एवढी दचकले की, विचारू नये बाई. चार आण्यांत राम म्हणजे ? हे पोरगं खुळं तर नाही ? मी त्या मुलाकडे जरा रोखून बघितलं तर एक तसबिरीत घातलेलं चित्र उचलून दाखवीत त्यानं पुन्हा तीच भाषा केली. मग मी त्याच्याकडे गेले. ती तसबीर हाती घेतली. बघतेय तर राम, लक्ष्मण, मारुती आणि शबरी यांचा घोळका त्या तसबिरीत उभा ! त्यासरशी मग मी ती तसबीर जरा बारकाईनं न्याहाळीत उभी राहिले. माझ्या अंगावर एका आठवणीनं रोमांच उभे राहिले. मी ती आठवण आणखीन जरा चांगली अशी मनात घोळली. कारण त्या चित्रामागच्या कल्पनेत फ़ार सुंदर अशा भावनेची गुंफ़ण झाली होती न् एके काळी त्या कारणाच्या श्रवणानं रामराया सुखावला होता !
वनवासाच्या वेळची गोष्ट. शबरीच्या घरी रामराया येत होते. दाट जंगलातून वाट निघाली होती. सगळीकडे सुगंधी दरवळ सुटलेली. झाडावरची पानं फ़ुलं सुखावलेली, मोहरलेली तर रामानं शबरीला विचारलं की, एवढा चांगला वास कशाचा येत असावा ? तशी आपली बोरं खायला देते शबरी रामाला म्हणाली, “ देवा, ऐकावं. मगधऋषीमुनींच्या वेळची गोष्ट. पावसाळा जवळ येण्याचा काळ. आश्रमात विद्यार्थी त्यांना घेऊन मुनीवर्य जंगलातून फ़िरले. चार महिन्यांचं सरपण गोळा केलं. त्यांच्या अंगातून घाम गळला. धरित्रीनं तो समाधानानं झेलला. तर त्या समाधानाचा तिनं जो सुस्कारा टाकलाय त्याची ही दरवळ महाराज ! ”
ह्या शानदार आठवणीनं भुललेल्या मी ती तसबीर विकत घेतली. तो पोरगा हसतमुखानं निघून गेला. मी पण पुढं चालले. पण त्या वेळी माझ्या मनात एकसारखं आलं की, एवढा चांगला हा राम मग त्यानं सीतेच्या एकीच तेवढं असं का वागणं करावं ? शीळा झालेल्या अहिल्येला देखील ह्यानं आपल्या साक्षीनं साजिवंत केली न् आपल्या बायकोला तेवढी खुशाल दिली सोडून जंगलात ! लोकांचं ऐकून केवळ !! अग्निदिव्यानंतरही !!! छे ! शोभतं का रे रामराया बाबा तुला हे ?
माझ्या मनाची जरा चांगलीच चलबिचल झाली म्हणताना मी आमच्या ओळखीच्या एका रामवेड्या बाईंच्या घरी गेले.
पण तिथं जाऊन बघतेय तर रामाच्या दर्शनाला जमलेल्या बायकांची ही गर्दी उडालेली. भजन कीर्तन रंगलेलं. रामनामाच्या गजराचा कल्लोळ उडालेला. आणि त्या धांदलीत माझ्या ओळखीच्या बाई दिसेनाशा झालेल्या ! म्हणताना मग मी दारातच थबकले. इतरांच्याप्रमाणं तिथल्या रामाला लांबूनच नमस्कार घातला. अशा डामडौलात की, नाशिकच्या कामकरीबाईनं पंचवटीला कामाला जायचा धांदलीत रामरायाला लांबूनच दंडवत घालावा ! पण तिथल्या एका बाईच्या नजरेतून मी सुटले नाही. तिनं मला आत बोलावलं. आपल्या भर्जरी शालूचा पदर मागं सारला न् मला प्रसाद देत ती बसा म्हणाली. त्यासरशी मग मी रामाचं दर्शन घ्यायचंय म्हणाले. आत गेले. बघतेय तर राम आणि सीता भर्जरी महावस्त्रात न् हिर्यामाणकांच्या अलंकारात लोकांना दर्शन देत उभे ! त्यांना पाहाताच माझी तहानभूक हरपून गेली आणि मग मी त्या रामाला सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं सांगितलं, “ देवा, रामराया, आता या सुखाला पारखा होऊ नकोस हं कधी ! ही सीतामाई तुझ्याजवळ अशीच हसतमुखानं उभी असू दे. नाहीतर मग रामसीता पदराची किंवा रामबाण नक्षीच्या काठाची साडीदेखील मी घ्यायची नाही ते तुझ्या दर्शनाला यायची खटपट कुठली रे बाबा करायला बसलेय ! खरं का खोटं ? नव्हे तूच सांग. ”