देवा अभंग बोलावा

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


पंढरी केली की देहू आळंदीला जाऊन आलंच पाहिजे असा आमच्या घरच्या वारकरी गणगोतांचा शिरस्ता. म्हणताना विठूदेवाच्या नगरीचं दर्शन घडून आम्ही घरी आलो न् मग लगेच देहू आळंदीची वाट धरली. म्हटलं कसं, यावं माऊलीला भेटून. कराव्यात चार जिवाभावाच्या गोष्टी. आणि मग तुकारामबोबांची पण करावी विचारपूस असा आमचा बेत. तशी मग पंढरीपासून घनदाट सावलीतून जाणारी या गावांची पायवाट आम्ही नेटानं धरली न् निघालो.
आळंदीचा ज्ञानदेव संन्याशाचा बाळ. तर त्याच्या घरी काय असावं ? अशी आपली जाता जाता मनात शंका आली. म्हणताना इंद्रायणीलाच काय ते विचारावं न् मग राउळात शिरावं असं आम्ही ठरवलं. त्याप्रमाणं आठवणी गोळा केल्या. त्यांचं गाठोडं बांधलं न् ते डोईवर घेऊन आपले चाललो. तर चालताना ओटीत घेतलेली फ़ुलं कोमेजणार नाहीत इतपत आळंदीचा पल्ला असावा असा विचार मनात आला. म्हणताना डोईवर फ़ुलांच्या पाट्या घेऊन पुण्यापासून झोकात जाणार्‍या माळणी वाटेत दिसल्या तशी जिवाला हुषारी आली. ज्ञानोबा माऊलीच्या भेटीला चांगदेव आला न् रेड्यानं वेद बोलून दाखविल्याची वार्ता कानावर आली होती. तसेंच चांगदेवाची भ्रांत घालविण्यासाठी माऊलीनं भिंत  चालवल्याचंही आम्ही ऐकलेलं. त्या कारणानं आम्ही आपले जरा बेतानंच चाललो. म्हटलं सांभाळून असावं हे चांगलं. माऊलीनं शाबासकी द्यावी असं आपलं वर्तन घडावं हे उत्तम.
आळंदीला गेलं की शेंडीचा नारळ इंद्रायणीला वाहावा आणि तिथल्या हालत्या बोलत्या तुळशींच्या बरोबर पोटभर बोलावं असा एक बेत आम्ही वाटेतच केला. कारण तोवर रस्त्यानं जरीपताका भुईला लोळवीत आळंदीकरांच्या दिंडया आल्या होत्या आणि अजानुवृक्षाच्या सावलीत बसलेल्या माऊलीच्या नावाचा जयघोष त्यांच्या मुखी होत होता. ज्ञानोबारायांच्या संग जोडीनं तुकारामबोवांचाही जयघोष होतेला. त्यामुळं मग देहू किती लांब असल्याची विचारपूस आम्ही एका जासुदाजवळ केली. तशी कळलं की, येलवाडाईच्या गव्हाच्या पुरणपोळ्या खंडीनं इंद्रायणीच्या काठाला चालल्या असून तुपाचे द्रोण देत तुकोबाराय उभे आहेत म्हणून ! एवढेच नाहीतर दोघांच्याही गालावर सोन्याच्या मुद्रिका असल्याच्या गोष्टी सांगीत तुकारामबोवा वैकुंठाला कसे काय गेले असावेत याबद्दलच्या शंका उसळत्या आहेत असाही गवगवा झाला.
तशी मग उधळत्या बुक्क्याच्या घनदाटीत आपला रेशमी जोडा ठेवून स्वर्गलोकी गेलेल्या तुकारामबुवांना हात जोडीत मी बोललेअ, “ न्हवं मग नडलं होतं काय एवढं वैकुंठाला जायचं देवा ? नाही आली जिजा तर बसू दे. तुमचं कवतिक तिला जसं नाहीच. हाती टाळवीणा घेऊन तुम्ही दारोदार फ़िरलात पण कुणी तुमच्यासंगं आलंच नाही वैकुंठी ! आपली नाराजी झाली देवा. आणिक आपण इंद्रायणीच्या साक्षीनं टाळवीणेच्या खुणा ठेवून एकलेच निघून गेलात ! बाळपणाची आपली समाधी घ्यायची हौस भागवलीत.
तुम्ही आणि ज्ञानदेव विठूदेवाचे लाडके मित्र. तुमच्या दोघांच्या गाठीभेटी व्हायच्या वाखुर्‍यावड्यावरी. रिंगणाचे वेळी. तर तुमच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांनी तुम्हांला फ़ुलांचं आंथरूण घालावं एवढी जनलोकांला तुमची आगत देवा. तर आमचं काय म्हणणं की, आम्ही निघालोच आहोत तर तुमच्या गावी येऊन आपलं दर्शन समक्ष घेऊच. पण त्या आधी आमचं आपल्यापाशी एकच म्हणणं आहे की, देवा, आपण अभंग बोलावा. विठूदेव कीर्तनाला उभा राहील न् आम्ही साथीला येऊ. देवा, मायमराठीला राजसिंहासनावर बसवायला म्हणून आपण उभयतांनी अभंग बोलून आमच्या इच्छा-आकांक्षांची परिपूर्ती करावी देवा ! जनलोकांचे उदंड आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील आणि आपण आमच्या भोळ्याभाबड्या वाणीचे राखणदार ठराल !!

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP