भावगंगा
लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.
आपल्या मुलाबाळांचं, पतिदेवाचं, घरच्या माणसांचं, माहेरचं, घरादाराचं असल्या एकीचं सुख गाताना माणूस रंगलं की भरदिवसा सूर्यदेव डोलतो म्हणतात. आपल्याजवळच्या अप्रूबाईनं त्यालाही बरं वाटतं असं सांगतात. पण त्यापेक्षा घरच्या लक्ष्मीला गीत गायला आलं की सारजादेवी तिची कौतुकानं ओटी भरायला येते त्यावेळीं एखादीला होणारा आनंद त्यापेक्षाही वाखाणण्याजोगा असतो. काळजातील गोष्ट चारचौघीत बाहेर येताना तिला सुरावट मिळाली आणि भावभावनांची जुळणी गवसली की गीत शिणगारते. जशा काय मग अमृताच्या धारा आपल्यापुढ धा धावून येतात. आणि त्याच वेळी मनोहरा दिसणार्या देवादिकांचेविषयीची आपली गोष्ट सजायला लागते.
अशा वेळी हातांचे टाळ होतात, देहाचा मृदंग होतो आणि भावनांची शहन वाजू लागते. भावगीताला अमृताची गोडी येते. देवाला वाहिलेली हा अपूर्वाईचा असा भावसुमनांचा हार केव्हाच त्याला पोचल्याची साक्षही पटू लागते.
आणि मग या पहिलेपणाच्या सौभाग्याने बाईमाणसांच्या ओठांवर खेळणारी भावगंगा दुथडी भगून वाहू लागते. ईश्वरादेवाच्या स्मरणानं तिचे देहभांडे उजळून निघते. मनी पवित्र विचार येऊ लागतात. उपमादृष्टांतांची खैरात होऊ लागते.
त्या क्षणाला विष्णुपदावरील बेलपत्राप्रमाणं पवित्र असलेली लक्ष्मी, तेरा गंगावनातून रिंगण खेळणारा विठू देव, सोळा चौक मांडून ओटी भरलेली रुक्मिणी, तुळशीखाली पोथी वाचणारा राम, हाती गदा चक्र घेऊन प्रकाशमान होणार्या केशीराजाची जनाई, घागर्या चाळ ल्यालेला गणराज, दाटल्या चौरंगावर शेवंतीफ़ुलात बसलेली सीतामाई, मोत्यांच्या चुंबळीत स्नान करणारा शंकर, गोकुळी जन्मलेले कृष्णनाथ, काशीखंडाचा महादेव असे कोण कोण स्मरणसाखळीत जमा होतात. हरीनामाचा गजर उरी क्ल्लोळतो आणि मग साती आसरांच्या अद्भुत चमत्काराप्रमाणं त्या नादात जीव भुलून गेल्याकारणानं दुसरं कशाचंच भान अशा ओव्या गाणारांन उरत नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP