भिम्मकबाळी
लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.
लईंदीची गोष्ट आहे. गोकुळातील कृष्णदेवाच्या घरची. त्याच्या आणिक रुक्मिणीच्या प्रीतीची. म्हणजे त्याचं असं झालं की, सत्यभामेच्या रंगमहालात कृष्णदेव आलेला. तिथं त्याच्या सगळ्या राण्या जमलेल्या. त्या घोलक्यात कृष्णदेव सिंहासनावर बसलेला. तर बोलण्याहून बोलणं निघालं म्हणतात.
सत्यभामा कृष्णदेवाला म्हणाली, “ देवा, तुमची माझी प्रीत कशी म्हणावी ? ” तशी कृष्णदेव हसला. म्हणाला की, “ तू मल आवडतेस. गुळासारखी. ” सत्यभामा हे ऐकून हारखली. म्हणताना दुसरीनं - यज्ञजननीनं - कृष्णदेवाला विचारलं, “ आणि मी कशी देवा ? ”
“ मधासारखी. ” कृष्णदेवानं उत्तर केलं.
असं मग दिवसभर चाललं. कुणाला काही कुणाला काही असं उत्तर आलं. सगळ्याजणी आनंदल्या.
होता होता मग रुक्मिणीची पाळी आली. तिनंही देवाला तोच प्रश्न केला. आनि कृष्णदेवानं पण तिला उत्तर केलं, “ जगातील उत्तम लवणाप्रमाणं तू मला लाडकी आहेस. ”
पण बाई रुक्मिणीला ते खपलं नाही. ती क्रोधायमान झाली. संतापानं खाली कोसळली. तशी कृष्णदेव मनातून चरकला. असं बरं नाही म्हणाला. भीम्मकबाळी सुंद झाली.
इतक्यात देवकीमाता आली. झाली गोष्ट तिला कळली. तिनं मग कृष्णदेवाला शांत हो म्हटलं. रुक्मिणीची समजूत करावी म्हणाली.
तिनं मग आपल्या हातानं सोन्याचं घंगाळ काढलं. त्यात पाणी विसणलं. कृष्णदेवाला आंघोळ घातली. रुक्मिणीला या चक्रपाणीचं पाळपण ऐकवलं, सोळा सहस्त्र नारी तुझ्या दासी आहेत म्हणाली. तू माझी लाडकी सून. तुझा वडीलकीचा मान. तर तूच सगळ्यांत मानाची.
पण रुक्मिणीचं मन तेवढ्यामुळं मोकळं झालं नाही. तरीपण मग ती उठली. कृष्णदेवाला तिनं ओळखलं. केशरी गंध लावला. त्यानंही तिची समजूत घातली.
म्हणताना मग देवकीनं युक्ती काढली. पाची पक्वान्नांच भोजन तयार केलं. सोन्याची ताटं मांडली. चंदनाचे पाट घातले. रत्नजडित रांगोळी घातली. हिर्यामाणकांच्या वाट्या घेतल्या. मोत्यापवळ्यांनी जडवलेली झारी पाणी भरून आणली. आणिक कृष्णदेवासह सगळ्या सुनांची पंगत बसवली. जातीनं वाढायला लागली.
नानापरीची रायती, कोशिंबिरी, सांडगे, कुरड्या, लाडू, करंज्या, पुरणाच्या पोळ्या असं काय काय सगळं वाढलं. निरनिराळ्या शिक्रणी वाढल्या. फ़ळं वाढली. आणिक मीठ तेवढं कशातच घातलं नाही. त्या कारणानं कशालाच चव येईना. सगळ्यांनी मीठ आना म्हटलं. तशी देवकी म्हणाली. “ मीठ खारट. रुक्मिणीसारखं. ” आणि मग त्या सगळ्या सुना लाजल्या. तशी एकट्या रुक्मिणीला जवळ घेत तिनं बाकीच्यांना म्हटलं कसं, “ ऐका ग. माझ्या गोविंदाला सांभाळा. मी हिला घेऊन तीर्थयात्रेला जाते. ”
परंतु कृष्णदेवानं तिला अडवलं. म्हणाला, “ आई, अग मी तिथं रुक्मिणी ! तर मलाही घेऊन चल. ”
झालं. एवढ्या एका बोलण्यानं रुक्मिणीला कोण आनंद झाला ! तिनं कृष्णदेवाला गोविंदाविडा करून दिला. देवकीच्या पाया पडली. चुकलं म्हणाली.
आणि मग एक दिवस काय झालं की, रुक्मिणीला खूप करायचं कृष्णदेवाच्या मनात आलं. आलं तर त्यानं जगातील सगळ्या मिठाचा ढिगारा रुक्मिणीच्या महालात आणला. तशी उभं गोकुळ रुक्मिणीच्या दाराशी आलं. तिच्या नावाचा डंका वाजला.
त्यासरशी ही भीम्मकबाळी एवढी हारखली, एवढी हारखली की, तिनं सगळ्यांना ते मीठ वाटलं. कृष्णदेवावर ती प्रसन्न झाली.
सगळीकडे मग आनंदीआनंद झाला. रुक्मिणीनं न् कृष्णदेवानं मग सुखाचे दिवस पाहिले. तसे ते तुम्हांआम्हांला पण पाहायला मिळोत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP