आपल्या दारात अवचितच अंबारीचा हत्ती यावा. त्यात माहेरच्या किराण्यानं दाटलेल्या गोण्या असाव्यात. तशात आईचं कोडकौतुक भेटावं. हौसमौज दिसावी. मनच्या गोष्टींचा सपाटून उपसा व्हावा. आणिक त्या हत्तीसंगं आलेल्या जासुदाबरोबर गोष्टी करताना जीव भुलून जावा; तसंच मला त्या दिवशी झालं. कामाधामाच्या धांदलीत असताना अवचितच कृष्णदेवाची आठवण झाली न् बाई त्यानं अशा डामडौलानं दर्शन दिलं की, विचारूच नये.
कृष्णदेव आधीच थोरामोठ्यांचा मुलगा. तशात साता नवसाचा. त्या कारणानं त्याच्या जन्माच्या वेळी गोकुळ नगरीनं हर्षाचे गुढे उभारले. दारी तोरणं बांधली. घरोघरी दीपोत्सव झाला. हत्तीवरून साखर गेली. मानपानाच्या सवाष्णी आल्या. दारी पाणी आलं. खणानारळांनी ओट्या भरल्या. सारी नगरीच नंदाच्या घरी जमा झाली.
बाळलेण्यांचा थाट तर बघूनच घ्यावा. कमरी करदोडा, दंडी बाजूबंद, हातात मुद्रिका, मनगटावर कडीतोडे, भाळावर रत्नजडित पिंपळपान, गळ्यात नवलाखी हार, अंगड्याटोपड्यांला मोती खंचलेले, पायी पोलार वाले आणिक काय वाटेल ते तिथं आलेलं. तर आम्ही कधी न पाहिलेला असाच की थाटमाट सगळा ! म्हणताना ऐकीव वार्तेनं जीव भुलून गेला, तिथं प्रत्यक्ष बघितल्यावर तहानभुकेपेक्षाही आणखी काही हरपलं असतं बाई ! हो, अगदीच.
आणि गौलणींच्या वाटेत येऊन त्यांचे घडे फ़ोडणारा, वाटेत डांव रोवणारा, घरचे रवीदोर तोडणारा, शिंकी फ़ोडून दुधाचे न् दह्याचे पाट वाहू देणारा, बासरी वाजवून लोकांचं चित्त हिरावून घेणारा, गौलणींचे शेले वारंधरी सोडणारा आणिक गवळ्यांच्या घरी शेंडीवेण्यांच्या गाठी बांधणारा कृष्णदेव नानापरीच्या खोड्या करताना ऐकला, म्हणजे तर त्याच्यापुढं आपली मतीच गुंग होते. हात टेकले पण पोर ऐकत नाही असं खुद्द यशोदेप्रमाण्म वाटतं तर !
पण ज्या वेळी त्यानं कंसमामाचा वध वैराळाचं रूप घेऊन केला आणि आईचं उसनं फ़ेडल्याचं कानावर आलं तेव्हा वाटलं की, शाबास म्हणावं त्याला ! आणि कालियामर्दनाच्या वार्तेनं तर त्याची कड घेऊन दुनियेशी लढत द्यायची ईर्षा मनी येते !! खरं ना !
शिवाय अंबिकेच्या स्थळी मोत्यांचे झुबुके तिला वहात नवस बोललेल्या रुक्मिणीशी जेव्हा कृष्णदेव विवाहबद्ध होतो आणि तिनं अंगुपती लिहिलेल्या पत्रिकेमुळं तिथं त्याला वेळेवर यायला सुचतं हे ऐकल्यावर मनाला हुरूप येतो. भीमकबाळीला आंदण मिळणारे ऊसमळे, पानमळे, तस्त, तांब्या न् वजरी, हंडेघंगाळी न् पराती आणि काय काय पाहिल्यावर तर त्यापुढं चंद्रज्योतीचाही उजेड कसा फ़िक्का फ़िक्का वाटू लागतो ! अशा वेळी ह्या दोघांच्यावरूनही आपोआप अलाबला घेतली जाऊन कानशिलावर बोटं मोडली जातात ! वाटतं की, या सुखाला दृष्ट लागू नये.
पण कृष्णदेवाच्या चमत्कारानं खरा जीव भुलून जातो तो द्रौपदीला तो वस्त्रांचे ढीग पुरवतो त्या वेळेला ! आणि वाटतं कीं, आपल्या भर्जरी शालूची चिंधी फ़ाडून कृष्णदेवाची करंगळी बांधलेली ही त्याची बहीण पुन्हा शत्रूच्या तडाख्यात गवसू नये ! तिच्या एकीच्या विचारानं मनात कालवाकालव होते. द्रौपदीला देवानं सुखी ठेवावी असं वाटतं. राजसूय यज्ञाचे वेळी तिनं घेतलेला पुढाकार नजरेत तरळू लागतो.
आणि मग उभ्या जगाचे धनीपण पत्कारून गीता बोललेल्या ह्या भगवंताला आपले हात आपोआप जोडले जातात. जन्माष्टमीचा सोहळा या संदर्भात दरवर्षी हौसेमौजेनं साजरा होतो न् या कृष्णदेवाला उदंड आयुष्य चिंतिण्यासाठी माणूस उतावीळ होऊन जातो !