दर्शन

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


आमच्या शेताच्या बांधावर त्या दिवशी महापुराच्या पाण्यानं धुमाकूळ घातला म्हणताना चिखलातून पाय उपसून घेत आम्ही नदीवर गेलो. बघतोय तर तुफ़ान व्हावं तसं पाणी उसळ्या घेतेलं. वरून पाऊस कोसळलेला. पायाखालची रेती सरकतेली. आणिक उकळत्या चहाच्या रंगाचं पाणी बेफ़ामपणानं हातपाय पसरीत आपलं झोकात चाललेलं. तशी गंमत काय झाली की, पाण्यानं माझ्या पायाला विळखा घातला म्हटल्यावर मी मागं सरले तर ते पाणी पण माझ्यामागनं येतेलं ! अगदी मी जाईन तिकडं ! पाठशिवणीचा खेळच जसा काय.
त्यामुळं आमच्या आईनं नदीची खणानारळानं ओटी भरली. हळदकुंकू न् फ़ूलपत्री वाहिले. नमस्कार घातला. आणि ती बोलली, “ किती अवकाळपना म्हनावा ह्यो मातं ? ” तशी उत्तर आलं, “ मी कोकणातून आले. पालापोचळ्यानं माखले. झाडाझुडपात आडकले. तर मग सुटले धावत न् केली सुटका. आता संथवाणी जाईन. ” त्यासरशी आईनं पुन्हा दंडवत घातला. आम्ही पण पाया पडलो न् सांगायचं म्हणजे नदीचं पाणी मागं सरकलं.
त्या दिवशी कृष्णाकोयनेच्या संगमावर देखील असंच घडलं. दोघी एकमेकींना भेटल्या. पण फ़ार दिवसांनी भेट झाल्या कारणानं हुंदक्यानं दाटल्या. कृष्णा कोयनेला बोलली. अवखळपणा सोड म्हणाली. सैदापूरला मग दोघी बोलत बसल्या. दत्तगुरु महाराजांनी जटा धुतल्या म्हणून पाणी लालीलाल झालंय म्हणाल्या.
तेवढ्यात दंडानं पाणी तोडीत पोहणारे आले न् कंजाळाची बेटं बुडाली म्हणाल्या. तशी सवाष्णींनी ह्यांची पूजा केली न् त्यांचा नमस्कार घेत पुन्हा ह्या बोलत बसल्या. इंग्रजांनी आमच्या डोईवर पूल बांधून आमच्या तपाची राख केली म्हटल्या ! पायांतलं पायताण काढून आम्हांला मान देत आमच्या अंगाखांद्यावरून खेळणारा माणूस बुटासकट पाय देऊन जावा याचं दु:ख होतंय बोलल्या.
होता होता मग मन मोकळ झाल्यावर त्या आपापल्या वाटेनं निघून गेल्या.
पुढं मग गोदावरीमाई भेटली. पुण्यवान झालेय म्हणाली. नाशीकगावच्या रामरायाचा पवाडा गातेय म्हणाली. पण तिला सारी दुनिया आंदण पाहिजेय हे ऐकल्यावर नवल वाटलं. इतक्यात शंकर रागावाला न् मग ती मुकाट्यानं त्याच्या मागोमाग धावली. पण जाताना तिनं नारू शंकराला धक्का दिला न् मग पुढं गेली.
पंढरीच्या भीमेचंही असंच आगळं दर्शन आम्ही एक दिवस घेतलं. आणि पोहणारा सुखरूप येऊं दे म्हणून त्या आईची ओटी भरली. मनोभावे पूजा बांधली.
लोकमातांच्या ह्या दर्शनानं आमचा जीव खुळाभैरा झाला. हारखून गेला. पुण्यवान ठरला. म्हणून मग आम्ही या दर्शनाच्या गोष्टी गोणींत बांधल्या. ती गोणी हत्तीवरच्या अंबारीत घातली न् गावोगाव तिचा वाटप केला. म्हटलं ह्या दर्शनानं उभी दुनिया साजिवंत होऊन उठू दे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP