केशराजाची रुक्मिणी

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


घरात बसून काही कामधाम करण्यापेक्षा माझी या ना कामाच्या कारणानं घराबाहेरचीच भटकंती दांडगी. त्यामुळं आजवर मला अनेक प्रकारची बायकामाणसे भेटली. त्यांचे बरेवाईट असे मासलेवाईक नमुने पाहायला मिळाले. त्यावरून जो काय बोध घ्यायचा तो मी घेतला. पण बाई पंढरीच्या विठूदेवाच्या रुक्मिणीपुढं खरंच मी हात टेकले ! देवाशपथ ! उगीच खोटं कशाला बोलू एखाद्याबद्दल. असली बाई मी पाहिलीच नाही कुठं. ती आहेच अशी जगावेगळी की, तिची तोड कुणाला येऊच नये अगदी !
आम्ही आपली साधीभोळी माणसं. गरीबीच्या संसारातील अशी. तर आम्हांला श्रीमंतांच्या घरचं कळावं कसं ? पण म्हटलं एवढी सगळी दुनिया पंढरीला लोटतीय दरवर्षी तर आपणही यावं जाऊन. बघावं विठूदेवाचं घर. घ्यावं दर्शन. करावं चारचौघांच्याप्रमाणं चंद्रभागेत स्नान. घ्यावं देहभांडं उजळून. बघावा राऊळातील भक्तांचा दिमाख. पाहावी रुक्मिणीला. घ्यावी जनाबाईची भेट. आणिक बघावी मनाला काही शांती मिळाली तर. म्हणून हा आपला हेतु मनी धरूनच मी पंढरीला जायचा बेत केलेला हं !
लहानपणापासूनच फ़ुगडीझिम्मा खेळायला आमच्या आळीला ये म्हणून आम्ही रुक्मिणीला सांगावा दिलेला. हिर्‍यामोराची काचोळी घालून ती आली तरी आमचे डोळे दिपायचे नाहीत की आम्हांला हेवा पण वाटायचा नाही हे पण आम्ही तिला कळवून दिलेलं. शिवाय पंढरीच्या दामूजी सोनारानं साडेतीनशे मोती गुंफ़ीत तिची एकेक बांगडी केलेली होती हे माहीत होतं तरी आम्ही त्या दिमाखाचा धसका मनाला लावून घेतलेलाच नव्हता. कारण काय की, आम्हांला तिच्याबरोबर खेळायची लाज वाटू नये ! हो, नाहीतर ती डामडौलानं आली म्हणजे आम्ही आकसून बसलो की खेळ उलगणारच ! नाही का ? म्हणून आम्ही आपल्या तयारीतच. म्हणताना कोणसंसं बोलल्याचं आठवतं की, मोत्यांचे झुबुके वाहीन म्हणून अंबिकेला नवस बोलीत न् नेत्राचं काजळ काढून व हाताची लेखणी करून रातोरात हरीला पत्रिका धाडणारी ही रुक्मिणी उगीच कुणी बोलावलं म्हणून यायचीच नाही. तरीपण आम्ही म्हटलं बघावं तरी बोलावून. येणं न येणं तिच्या मर्जीतलं. आपण चोख असावं. तर वर्षानुवर्षं नागारपंचीम खेळायला असं बोलावणं करूनही ती आली नाही, तशी आम्ही ताडलं की, हे प्रकरण साधं नव्हेच म्हणून. आणि त्या आधारावर भीत भीत विठूरायाच्या नगरीला गेल्यावर ती भेटेल की नाही ही शंका बाळगूनच आम्ही जायचा बेत केलेला. म्हटलं, बघू या तरी काय होतं. राऊळी नाही येऊन दिलं तिनं तर केशीराजा म्हणतात तो विठूदेव तरी येईल पुढं ‘ या ’ म्हणायला !  तर काय ?
पण बाई एकेक तिच्याएकी ऐकलं तशी काही हिंमत होईना हं ! पंढरीच्या ठेंगण्या माळणींच्यापेक्षाही आम्ही तिच्यापुढं पार बुटक्या आहोत असं वाटलं. खरं ना ? नाही म्हणजे शेर शेर सोन्याच्या हिच्या बुगड्या आणि लाखो मोत्यांनी गुंफ़लेल्या हिच्या कंगण्या. तिथं आमचा हो काय पाड लागावा ? हिच्या वडिलांनी पैस मैदानाची जागा बघून हिच्यासाठी पंढरी गाव वसवून दिलं न् हळदी-कुंकवासाठी आळंदी लिहून दिली म्हणजे जहागिरी केवढी म्हणावी हिची ! पंढरपूर परगण्याचा सोन्याचा कळस दाखविताना ही म्हणे सांगते की, दीड लाख मोती हिच्या कापाला आहेत न् नऊ लाख मोती पंढरी नगरीच्या कळसाला गुंफ़ताना गवंडीदादा आळसून गेला चढउतारीनं ! म्हणजे हिचा हा दिमाख आणि आम्ही कशा तर लंकेच्या पार्वती शोभू अशा; फ़ुटका मणीही जवळ न बाळगलेल्या ! माझ्यासारखीनं काय तिला बाभळीच्या शेंगाचे दागिने घालून भागविलेली हौस सांगायची का लिंबोणीच्या फ़ुलांचे गुंफ़लेले अलंकार तिच्यापुढे ठेवायचे ? म्हणून म्हणते की, आपण आपल्या घरी सुखी असावं हे उत्तम. हिचा राग लोभ पण नको अगर उणंपुरं बोलणंही नको.
आता कळलंय हे असं. मग खरं खोटं देवाला माहीत बाई ! आम्ही काय सांगावं, नाही का ? बरं हे दागिन्याचं न् पंढरीरायाच्या वैभवाचं सांगताना तिला तिचे वडील भीमकराजे म्हणाले म्हणतात की, मी तुला समुद्र आंदण दिला म्हणून हे वैभव ! पण हिला माहेरचा अभिमान नको ? बाई बाई बाई ! रुक्मिणी, खरंच तू अशी ग कशी ? आणि केशीराजाच्या वैभवानं अशी दिपून जातेस न् ज्याला त्याला आपला मोठेपणा सांगतेस तर मग विठूदेवाबरोबर भांडण ग का ? काय म्हणून रुसायचं मेलं ते ? कशासाठी ? केवळ त्या बिचार्‍या जनाईवरून ? अग, नको ग अशी करूस तू रुक्मिणी ! जनी फ़ार शहाणी. मनाची मोकळी. तुझ्या पतिदेवानं तिला लेकबाळ मानली न् तिच्याएकी तुझ्या मनात संशय दाटावा ? काय बाई म्हणावं तरी तुझ्या या खुळेपणाला ? वेडीच आहेस हं तू ! खरंच ! आमच्याजवळ याशिवाय दुसरा शब्दच नाही गडे. हो बाई.
कारल्याचा मळा पिकू दे मग तुला बाजूबंद करीन, गोपाळपुरी चला मग तुला भिंगाची चोळी घेईन, साजशिणगार लेवून रथात बैस मग तुला पाहिजे तर रथाच्या खिडक्या उघड्या ठेवून देईन, जरतारी सव्वालाखाचं लुगडं घेईन असं काय काय माझा केशीराजा तुला सांगून तुझ्या विनवण्या करतोय तर तू मेली रुसतेसच ग कशी ? सगळी पंढरी नगरी धुंडून पदमतळ्यावर येत तुझा हात धरून त्यान्म ऊठ म्हटलं तरीही तू फ़ुरंगटून बसावंस ? छे बाई, सगळी नगरी हसतेय तुझ्या नवर्‍याला. चांगलं राऊळात बसून विठूदेवाच्या बरोबरीनं मानपान घ्यायचा, तर काय म्हणे अबीर बुक्क्याची गर्दी सोसत नाही ! भले शाबास ! अग, या सोपस्काराची मजा तर बघ अनुभवून ! हो, बघ ना एकदा मनापासून. हातात रमा उमा माळणींनी गुंफ़लेल्या फ़ुलांच्या कंगण्या घालून बघ तरी. हो, बघ तरी मी म्हणते. तर ते राहिलं कुणीकडेच न् तू विठूदेवाच्या पायाला लोणी चोळतानादेखील विचारतेस की, म्हणे जनी तुमची कोण म्हणून तुमची तिच्यावर एवढी प्रीती. अग रुक्मिणी, फ़ाटक्या बोतरांची जनाबाईची वाकळ देवाला तुझ्या घरच्या गाद्यागिरद्यापेक्षा आवडते. खरं ना ? का बरं ? सांग ना ! मी सांगू ? जनाई तुझ्यासारखी रुसत नाही. आणिक पोटच्या पोरीप्रमाणं देवाशी वागते. इमान राखते. म्हणून तर तिला ऊन लागू नये म्हणून गोपाळपुराच्या वाटेवर चिंचबन आणि अंधाराची भीती वाटू नये म्हणून चंद्रज्योत लावलीय देवानं. नाही का ? शिवाय स्वत: तिची कामं करू लागतो देव जातीनं. का बरं ? तिला लकं पडावं म्हणूनच ना ? म्हणून तू घे की जरा समजुतीनं आणि कर जनाईचं कोडकौतुकं. हो, माझं तेच म्हणणं आहे.
अगबाई ! चललीस कुठं ? राग का आला ? नाही हं पुन: बोलायची तुला. कशी का वागेनास. तुझं तुला लखलाभ-मला थोडंच बरं-वाईट भोगावं लागणार तुझ्या घरचं ? तर काय मेलं.... हं हं, देवाची हाक आली होय ? जा हं ! राऊळात कथेचा बोभाटा झाला म्हणून देवाला पागोटं हवंय का ? जा हो, देऊन ये.... काय म्हणालीस ? सडा घालायचाय हळदीकुंकवाचा ? का ग ? कुणी येणार का आहे ?.... कोण ? ज्ञानदेवांची स्वारी येणार आहे ? अगबाई ! मग जा बाई तू. देवाला महावस्त्र चटकन काढून दे आणि जा म्हणावं ज्ञानदेवाला सामोरं. आणि हे बघ, तू बैस रंगमहालाच्या भिंती रंगवीत. तुझं मन तेवढंच रमेल. नाहीतर खिडकीत बसून ज्ञानदेवांच्या दिंडीची शोभा बघ जा बाई. फ़ार चांगला देखावा असतो म्हणतात.
पण रुक्मिणीदेवी, त्या तुळशीला बरीक बोलू नको गडे. तुझा तिच्यावर पण उगीच राग हं ! दरवर्षी  गोविंदाचं न् तिचं लगीन लागलं म्हणून तुझा मान कुठं गेला नाही ना ? मग काय तर. आणिक तुळशीबनात देवानं रात्र घालवलेअए न् त्याच्या शेल्याला काळा डाग पडला म्हणून तुझं काय गेलं ? उलट तू तो शेला सोन्याच्या शिळेवर बसून धू जा की चंद्रभागेत ! खरंच, देवाला किती आनंद वाटेल आणि चंद्रभागा पण हारखून जाईल अगदी ! बघच तू. लाटांच्या पायघड्या घालून नाही तिनं मग फ़ुलांचं आंथरुण घातलं तर मला विचार. अग, तुमच्या दोघांच्या प्रीतीला बघून चंद्रभागाही सुखासमाधानानं हासते. तिला बरं वाटतं. तिचं म्हणणं की, पृथ्वीखंड असा पांडुरंग तू आपल्या मनानं धनी म्हणून निवडला आहेस तर त्याच्या इतमामानं त्याला वागव म्हणून.
विठूदेव जेव्हा हातात टाळवीणा घेऊन भक्तमंडळीच्या घोळक्यात कीर्तनाला उभा राहतो तेव्हा ज्ञानदेव अभंग बोलतात आणि आकाशीचा चंद्र डोलू लागतो. तर त्या भाग्याची तू मालकीण. म्हणजे हे ऐश्वर्य तुझ्या एकटीच्या मालकीचं आहे रुक्मिणी. आणि हे बघ रुक्मिणी, मी आता ऐकलंय की, तुझ्या घरी बायका डोहाळे गायला लागल्या आहेत म्हणून. खरं का ग ? बरं झालं बाई ! कृष्णदेव तर सोनीयाचा दिवस आला म्हणून सुखावला आहे. अठ्ठावीस युगे विटेवर उभ्या असलेल्या देवानं तुझ्यासाठी द्राक्षअंजीराच्या बागा लावल्यात म्हणे आणि तुझा कुंडलीक बंधू केळी नारळी जावाजावांच्या घोळक्यात राखण करतोय म्हणतात एकेका फ़ळझाडाची. तुझ्या आवडीची चव कशी धा-धावून येतेय तुला सामोरी पाहिलीस ? म्हणून म्हणते देवाला तुझ्या रुसण्या-फ़ुगण्यात दह्यादुधाची न् गार पाण्याची आंघोळ होणार नाही हे बघ तू स्वत: आणि खुशीनं ऐस. आम्ही तुला मोत्यापोवळ्यांची न् खणानारळाची ओटी घेऊन येणार आहोत. ऐकलंस ना ?
पण थांब, हे लांबूनच बोलणं पुरे. विठूदेवाचा एकदा सोडून दोनदा सांगावा आलाय आहे तर आम्ही आळीतल्या सगळ्याजणी येणार आहोत तुझ्या घरी. माहेरवाशिणी म्हणून. तर हरिनामाची गजनी चोळी म्हणून आम्ही लेवूच; पण तू दाराशी येऊन आम्हांला “ कधी आलीस पोरी ? ” असं विचारीत पोटाशी धरलं पाहिजेस हं ! मग तू बघन पाची पक्वान्नांनी भरलेल्या दुरड्यांमधून तुला आणलेली बुत्ती कशी चवीची वाटेल ती ! ठरलं हं मग ! बराय तर.
विठूदेवा, आम्ही येतोय खर्‍या. पण तू मात्र सबूरीनं ऐस हं ! मग कशाचीच काळजी नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP