पुरुषोत्तम
लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.
कोण्या एके काळी शंकर आणि पार्वती कैलासावर बोलत बसले वते. समय भल्या पहाटेचा. राऊळतून घंटानाद होतेला. तर पार्वती शंकराला म्हणालेअए कशी ‘ देवा, मला एका गोष्टीचा उतार द्यावा. ’ शंकर ‘ बरं ’ म्हणाले. ‘ विचार ’ म्हणून बोलले. तशी पार्वती म्हणाली, “ देवा, गंगेवर रोज रोज लोकं स्नानाला जातात. आणि गंगामाईला साकडं घालतात हं ! म्हणतात की, पाप पोटात घे. पुण्य पदरात दे. का बरं ? असं काय म्हणून त्यांनी एकसारखं विचारावं देवा ? ”
शंकराला पार्वतीच्या प्रश्नाचं नवल वाटलं. एव्हाना तिला कळायला हवी होती ही गोष्ट त्यांची भावना. पण ते बोलले नाहीत. त्यांनी पार्वतीला ‘ याचं उत्तर समक्षच देतो ’ असं सांगितलं. स्वत: पार्वतीला घेऊन गंगेवर आले. तिथं बघतात तर शेकडो माणसं नदीवर येत जात होती. तेच तेच बोलत होती. म्हणताना शंकरानी पार्वतीला नजीकच्या एका टेकडावर बसवली. स्वत: वाळून कोळ झालेल्या म्हातार्याचा वेष घेतला. एका खोल दरीत स्वत:ला लोटून देऊन तिथून येणाजाणाराला हात जोडू लागले. कसंही करून म्हातार्याला वर घ्या म्हणू लागले. पण कुणीच लक्ष दिलं नाहीं. जो आला तो थेट गंगेवर गेला. स्नान करून परतला. पापपुण्याचं बोलला. म्हणून ह्या म्हातार्याची विचारपूस कोणीच केली नाही. हे बघून पार्वतीला नवल वाटलं. असं कसं म्हणाली.
इतक्यात एक तरणाबांड मुलगा तिथून धावत निघाला. त्यानं म्हातार्याचा आवाज ऐकला. तो थांबला. त्यानं त्या दरीत उडी घेतली. म्हातार्याला वर काढलं. आणि स्वत: गंगेवर नेऊन त्याला आंघोळ घातली. म्हणाला की, ‘‘ मला कुणी जवळचं नाही. नात्यागोत्याचं नाही. दिवाळीचं स्नान करायला आलोबतो. आपण भेटला. तेवढीच सेवा घडली. दिवाळी साजरी झाली देवा. ” त्यासरशी शंकरांनी आपलं खरं रूप प्रगट केलं. त्या तरण्या माणसाला उदंड आयुष्य दिलं न् पार्वतीला सांगितलं की, हा खरा पुरुषोत्तम. माणुसकीचा माणूस हा. पापपुण्य हा बोलून दाखवीत नाही.
म्हणताना पार्वतीला आनंद झाला. तिनं त्या माणसाला जवळ घेतलं. आपल्या हातांनी न्हाऊमाखू घातलं. महावस्त्रं दिली.
सगळीकडे मग आनंदीआनंद झाला.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP