शिवलिंगाची पूजा
लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.
एकदा काय झालं की, रामरायाला शिवलिंगाची पूजा करायची होती. पण ऐन वेळेला शिवलिंगच गवसत नव्हतं. म्हणजे त्याचं असं झालेलं की, राम, सीता व मारुती लंकेहून माघारी आलेले. रावणाशी झालेली लढाई जिंकून आलेले. सीतामाईला घेऊन ते आलेले. तर ते उतरलेले कन्याकुमारीच्या वाळवंटात हं ! तिथं सगळीकडे वाळूच वाळू. ती वाळू मोठी रंगीबेरंगीरणरणत्या उन्हात चमचमतेली. म्हणून सीतामाईनं शिवलिंगाचा ढीग तपास केला. पण ते तिथं कुठं गवसेनाच. आणि शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण किंवा पाणी ग्रहण करायचं नाही असा तर रामरायाचा नित्याचा नियम. आता काय करावं ? भर दुपारची वेळ. ऊन मी म्हणतेलं. आणि रामाचा जीव तर तहानेनं व्याकूळ झालेला ! सीतामाई विचारात पडली. शिवलिम्ग आणायचं कोठून ? तिनं मारुतीला बोलावलं. अशानं असं आहे म्हणाली.
मारुतीनं हे ऐकलं न् म्हणाला की, आत्ता आणतो शिवलिंग. आणि निघाला. निघाला तर उड्डाण मारलं. डोंगरामागून डोंगर पालथे घातले. जंगलं धुंडाळली. नदीनाले तपासले. दरीखोरी पाहिली. पण शिवलिंग कुठं आहे ? तशी त्याचा पण जीव उडून गेला. किती का वेळ लागेना शिवलिंग घेतल्याशिवाय जायचंच नाही म्हणाला. आणि राहिला आपला फ़िरत.
इकडे तोवर सीतामाई मारुतीची वाट बघून थकली. रामराया तर तहानेनं अगदीच व्याकूळलेला. म्हणताना मग तिनं काय केलं की, तिथलीच मूठ दोन मूठ वाळू घेतली. देवाचं नाव घेतलंन् स्वत: खरी पतिव्रता असेन तर ह्याचंच शिवलिंग होऊं दे म्हणाली. आणि केली की स्थापना ! बघतेय तर काय चमत्कार ! शिवलिंगाचं रामरायाला दर्शन घडलं. त्यानं पूजा केली. पाणी प्याला. अन्न घेतलं न् झोपी गेला.
होता होता मग मारुती रिकाम्या हातानं परत आला. खाली मान घालून सीतामाईपुढं उभा राहिला. मानहानी झाली म्हणाला. आपल्या शक्तीचा गर्व उतरला बोलला. तशी मग सीतामाईनं त्याला पूजातर झाली असं म्हणाली. त्यासरशी मारुतीला आनंद झाला. शिवलिंग कुठं आहे म्हणाला.
सीतामाईनं त्याला शिवलिंग दाखविलं. ते दिसायला एवढंसं होतं. म्हणताना मारुतीनं ते उचलून बघावं म्हणून त्याला हात घातला. तर बाई काय चमत्कार म्हणावा तरी ? ते शिवलिंग मारुतीला हालतंय कुठं ? अंहं ! हालेल तर शपथ ! त्यासरशी मग मारुतीनं सीतामाईचे पाय धरले न् लोळणफ़ुगडी घातली. आपला गर्व गेला म्हणाला.
इतक्यात रामरायाला जाग आली. झाली गोष्ट समजली. सीता पवित्र आहे म्हणाला. मारुतीला त्यानं जवळ घेतलं. पाठीवरून हात फ़िरवला न् शाबासकी दिली. म्हणाला की, तुझ्यामुळं सीता गवसली. तू शहाणा आहेस. रामानं मग सीतेलाही जवळ घेतली. तिच्या सामर्थ्याबद्दल त्यानं तिच्यापुढं नम्रभाव प्रकट केला.
सीतेला आनंद वाटला. मग सर्वांनीच पुन्हा शिवलिंगाची पूजा केली. आनंद आनंद झाला. तर त्यांचा तो आनंद तुमचा आमचा पण होवो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP