लक्ष्मी
लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.
असंच आपलं एक गाव होतं. तिथं एक नदी. नदीच्या काठावर खंडीभर पोरं. त्यांचा खेळखेळ चाललेला. त्यांची राखोळी जनावरं तिथं चरतेली. कंदमुळं खातेली. तशी अवचितच लगीन लगीन खेळायची गोष्ट निघाली. कुणाला तरी नवरा केलं. कुणीतरी नवरी झालं. फ़ुलांचे झुंबडे आले. गवताचे भारे आले. लगीन मंडप सजला. पालापाचोळ्यांचं बोहलं केलं. केळीच्या पानांचा दरवाजा बांधला. उसाच्या पानांचा अंतरपाट केला. नवरा मुलगा पुढं आला. शेंगदाण्याच्या अक्षता आणल्या. पोरांनी नाकाची सनई वाजवली. हातांचा चौघडा झडला.
तर इतक्यात गंमत झाली की, तिकडून एक माणूस आला. नवर्या मुलाचा त्यानं हात बघितला. भाग्याचा आहेस म्हणाला. धनसंपदा तुझ्यासंगं लगीन लावीन म्हणाला. म्हणताना हे खोटं खोटं लगीन मोडलं. पोरं पळाली. तो माणूस निघून गेला.
होता होता मग हा मुलगा मोठा झाला. त्याचं लगीन झालं. एक देखणी मुलगी त्याच्या घरात आली. तिच्यासंगं धनसंपत्ता पण आली. पैक्या अडक्यांनी घर भरलं. गुराढोरांनी दावणी नटल्या. पैसे वाडा आला. शेतीवाडी भरपेट मिळाली. मुलांबाळांनी घर नटलं. तर एक दिवस हा माणूस कर्ता झाला. म्हणाला की, “ ऊतमात नको. असली पैक्या आडक्याची लक्ष्मी घटकेच्या सोबतीची. कष्ट तिला आवडतात. ऐदीपणा खपत न्हाई. तर हातपाय खेळूंद्यात सर्व्यांचं. न्हाईतर ही लक्ष्मी कुठंबी जाईल निघून. तिला काय वाट्टल तवा पाय फ़ुटतील. ”
तशी मग एकदा काय झालं की, त्या घरात लगीन निघालं. हंड्याझुंबरांचा लखलखाट झाला. ताशेवाजंत्री वाजले. चंदनाचे पाट मांडले. चांदी सोन्याची ताटं मांडली. तर पंक्ती बसल्या म्हणताना एक म्हातारी अवचितच तिथं आली. तिचं नेसूचं फ़ाटकं तुटकं. पंक्तीला बसली हं ती. पण सगळी तिला बघून उठली. चालती हो म्हणाली. घरचा माणूस पण तिच्या वर खेकसला. त्यासरशी ती एकदम गडप झाली न् पंक्तीची शोभाच गेली. समया झुंबरं विझलेअए. तशी बरीक माणसं हाबकली. घरचा माणूस मनातून चरकला. भरल्या घरातून लक्ष्मी गेली म्हणाला. रडत बसला. तशी लक्ष्मी त्याला हळूच कानात बोलली, “ येळ गेली निगून. लई मस्ती चडलीवती काय ! पुना तोंड बगायची न्हाई. ध्येनात घे. मानपान कुनाचा बगीतलास मेल्या ? ” म्हणताना त्याचं धाबच दणाणलं.
त्यानं पक्की हाय खाल्ली. सारं घर धुऊन निघालं. फ़ुटका मणी पण घरात उरला नाही. म्हणताना चुकीचं ह्यानं गाठोडं बांधलं. गुरं वळीत नदीवर गेला. लक्ष्मीला हात जोडून ये म्हणाला. गडागडा लोळला. महापूजा बांधीन म्हणाला.
पण लक्ष्मी जी गेली ती गेलीच. ह्या दोघांची म्हणून पुन्हा कधीच गाठ पडली नाही. तो माणूस मनातून खूप कष्टी झाला. पण मग त्याला विचारतो कोण ? न्हवं खरं का खोटं ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP