समक्रियादोषाचा निषेध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
या दोषाप्रमाणे आणखीही एका दोषाबद्दल जपण्याची पाळी असते. या दोषास ‘ समक्रियादोष ’ असे म्हणतात.या दोषासंबंधाने ‘ सारावली ’ या ग्रंथात पुढील वचन आढळते :
एकोदरप्रसूतानामेकस्मिन्वत्सरे तदा ।
विवाहं नैव कुर्वेति.............................॥
या वचनाचा अर्थ : ‘ एकाच आईच्या पोटी जन्म पावलेले भाऊ, अगर बहिणी, अगर भाऊ आणि बहिणी यांचा विवाह एकाच वर्षी करण्यात येऊ नये. ’ या वचनात नुसत्या विवाहाचाच उल्लेख केला आहे, परंतु गर्ग वगैरेंच्या मते हा निषेध प्रत्येक मंगल कार्यास लागू आहे. मात्र ही कार्ये एकाच दिवशी व एकाच मंडपात होणारी नसावी; व क्वचित्प्रसंगी एकाच दिवशी करण्याचे कारण पडले असता होणार्या दोन कार्यांच्या जागांमध्ये नदी किंवा डोंगर असावा. या मताप्रमाणे वागावयाचे म्हटल्यास दोन्ही कृत्ये एकाच वर्षात फ़क्त दिवस बदलून केली असता चालू शकतील असे अनुमान निघते. कोणी कोणी ग्रंथकार होणार्या कृत्यात लग्न व मुंज ही कार्ये मोठ्या प्रतीची, व त्या मानाने इतर मांगलिक कृत्ये हलक्या प्रतीची असा भेद करितात; व त्यांच्या मते दोन मोठी कृत्ये अगर दोन लहान कृत्ये एकाच कुळात्र निदान सहा महिन्यांचा अवधी निघून गेल्याशिवाय करू नयेत. अशा प्रकारचे अनेकांच्या मते अनेक नियम आहेत, व त्यांचा निर्णय आयत्या वेळी ज्या त्या ठिकाणच्या शिष्टाचारास अनुसरून होत असतो. प्रस्तुत स्थळी सांगावयाचा मुख्य विषय म्हटला म्हणजे इतकाच की, मंगलकार्याचा विचार कर्तव्य असता या गोष्टीबद्दल ज्याने त्याने आपापल्यापरी शोध केल्याशिवाय राहू नये.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP