जावयास मदत, व घरजावई करणे
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
कित्येक प्रसंगी पालकांचे विचार याहून निराळ्या प्रकारचे असतात, व त्यांची कन्येची जबाबदारी आपल्या शिरावर घेण्याची तयारीही असते. वराच्या घरी संपत्ती असो वा नसो, तिची त्यांना किंमत वाटत नाही. व त्यामुळे त्याच्या वर्तनाच्या दिशाही त्या मानाने भिन्नभिन्न होतात. कित्येकांचे लक्ष फ़क्त वराच्या अंगचे गुण व त्याची विद्या आणि उमेद या गोष्टींकडेच अस्ते, व ते कन्येच्या पतीस हरएक तर्हेने मदत करितात व त्याचा संसार नीट रीतीने चालवितात. दुसर्या कित्येकांचे विचार इतके प्रगल्भ नसतात, व ते आपल्या संपत्तीच्या तोर्यात आपल्या कन्येची किंमत विशेष मानीत असल्यामुळे कोणास तरी घरजावई करून ठेवणे यातच त्यांना भूषण वाटते. घरजावयाची स्थिती एकंदरीत विचार करिता मोठीशी अब्रूची आहे असे नाही; कारण सासर्याच्या घरी ऐषआरामात राहता येण्याकरिता त्याला सर्वकाळ आपल्या कुटुंबाची मनधरणी करीत राहण्याचा अपमानकारक प्रकार पत्करावा लागतो. परंतु जगात या स्थितीसही राजी होणारे कित्येक खप्पी लोक आहेत. अशा लोकांसंबंधाने सुभाषित ग्रंथांतून पुढील विनोद केलेला सर्वत्र प्रसिद्ध आहे --
असारे खलु संसारे सारं श्वशुरमंदिरं ।
हरो हिमालये शेते विष्णु: शेते पयोनिधौ ॥
या श्लोकाचा तात्पर्यार्थ येणेप्रमाणे : संसार बोलून चालून कुचकामाचा. त्यात मौज मानण्यासारखे काही नाही. मात्र त्यातल्या त्यात मौजेचे स्थान एक आहे. ते कोणते म्हणाल, तर सासुरवाडी ! याचा प्रत्यक्ष पुरावा पाहिजे असेल, तर सांब आणि विष्णू यांची उदाहरणे घ्या. सांब कैलासपर्वताचा स्वामी, व विष्णू वैकुंठलोकाचा मालक, पण त्या दोघांनाही आपली घरे पसंत पडत नाहीत, म्हणून सांब आपली सासुरवाडी म्हणजे हिमालयपर्वत येथे जाऊन निजतो, व विष्णू आपले शयनस्थान क्षीरसमुद्राच्या ठायी पत्करतो !!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP