मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
वराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ

वराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


( वैधव्यस्थितीची भीती. ) : या विषयाचे स्वरूप निव्वळ व्यावहारिक असून प्रत्येक कन्यापालकाने त्याचा पोक्त विचार करणे अगत्याचे आहे. कन्या एक वेळ आपल्या पित्याच्या कुलाचा त्याग करून पतीच्या कुलात गेली की तिचा पोषणाचा हक्क पहिल्या कुलाकडचा अजीबात सुटतो. ती नव्या कुलात गेल्यावर ती आपल्या पतीची अर्धांगी होते, अर्थात आपल्या पतीप्रमाणेच ती पतीच्या संपत्तीची मालकीण सर्वत्र मानिली गेली तरी खरे मालकीणपण तिला कायमचे प्राप्त होऊ शकत नाही. तिला मुलेबाळे झाली व पती निवर्तला, तर मुलेबाळे तिच्याशी आईपणाचे नाते ठेवून एकत्र राहात असतील तोपर्यंत मालकिणीचे स्वरूप लोकदृष्टीने कायमचे म्हणता येते; परंतु मुलांबाळाम्चे व तिचे जमले नाही, व तिला निराळे राहण्याची पाळी आली, तर ती मुलांच्या बरोबरीने पतीच्या संपत्तीचा वाटा मागू शकत नाही. नवर्‍याच्या वेळी तिचेच म्हणून जे अलंकार अगर कपडेलत्ते म्हणून पतीने तिला दिले असतील त्यांजवर मात्र तिची स्वत:ची पूर्ण सत्ता राहते; व शिवाय राहण्यापुरती जागा व कुटुंबाच्या स्थितीच्या मानाने केवळ अन्नवस्त्र व थोडाबहुत दानधर्म एवढ्या गोष्टीपुरतीच तिची आपल्या कुटुंबावर सत्ता चालू शकते. अशी आपत्ती तिजवर न यावी म्हणून तिच्या पालकवर्गाने नुसती इच्छा केली, तरी तिजपासून उपयोग थोडाच होणार आहे ! दुर्दैवाने अशी आपत्ती कोसळण्याचे प्रसंग जगात शेकडोशे घडतात; व यासाठी अशा आपत्तीत निदान एवढे तरी आपल्या कन्येच्या चरितार्थाचे साधन राहावे अशा दृष्टीने पालकांनी याबद्दलची खबरदारी अवश्य घेतली पाहिजे. कुटुंबाची वडिलार्जित मिळकत अगर पतीनेच स्वतंत्रपणे संपादन केलेली मिळकत, असे मिळकतीचे दोन प्रकार असले, तर त्यायोगे तिच्या वाटणीच्या हक्कात काही थोडा फ़ेरफ़ार होऊ शकतो; परंतु त्याबद्दलची चर्चा या निबंधात करणे तादृश अगत्याचे नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP