मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
व्यावहारिक व कौटुंबिक वर्तन

व्यावहारिक व कौटुंबिक वर्तन

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


‘ स्वभावपरीक्षा ’ या विषयाचाच हा एक भाग आहे. मात्र स्वभाव हा केवळ मनाचा धर्म असून त्या धर्मास अनुसरून जी कृती होते, तिच्यापुरतीच स्वतंत्र परीक्षा होणे इष्ट असल्यामुळे तेवढ्यापुरताच विचार येथे करावयाचा आहे. गुरुगृही दीर्घकाळपर्यंत वास केला असता मनाला पुष्कळ गोष्टी उत्तम प्रकारे समजतात, परंतु व्यवहाराच्या दृष्टीने त्या गोष्टी स्वत: करण्याची पाळी आली असता मनुष्याचे मन कचरते, व पुराणातली वांगी पुराणात राहून जाऊन प्राप्त झालेले ज्ञान निरुपयोगी होते. ज्ञानाचा खरा उपयोग होण्यास मनोधैर्य असावे लागते, व ते असेल तर संपादन केलेल्या विद्येचे व ज्ञानाचे खरे चीज होते. लोकसमाज काय किंवा कुटुंबातील मनुष्ये काय, त्याचेकडून स्वत:च्या समजुतीप्रमाणे वागण्याच्या कामी अनेक प्रकारच्या हरकती येतात ही गोष्ठ खरी आहे; तरी पण या हरकती येतात म्हणूनच मनुष्याच्या मनाच्या दृढतेची परीक्षा जगात होऊ शकते. या परीक्षेचा प्रसंग मनुष्यावर येतो त्या वेळी त्याला आपल्या अंगावर एखाद्या मोठ्या डोंगराचे ओझे पडल्याचाही भास होतो; हा भार सहन करणे याचेच नाव खरे शूरत्व होय. प्रामाणिकपणा, नि:पक्षपातबुद्धी, न्यायैकशीलता, स्वार्थानपेक्षिता, प्रसंगावधान इत्यादी अमेक सद्गुण मनाच्या या स्थितीची केवळ रूपान्तरे अथवा पर्यायवाचक शब्द होत. या शब्दांचे सार्थक जगाच्या प्रत्ययास आणण्याचा यत्न करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्यकर्म आहे. हे कर्तव्य जगात फ़ार थोड्यांस साधते, व त्याचाच परिणाम जगात अनेक रीतींनी अनर्थावह होत असतो. जगाची सामान्य स्थिती पाहू गेल्यास या कर्तव्यतेची ओळख नसणारे असेच लोक फ़ार आढळतात; व ज्यांना विद्या वगैरेंच्या साधनांनी ही ओळख झालेली आहे त्यांना त्या ओळखीचा खरा उपयोग करण्याचे सामर्थ्य ही ओळख झालेली आहे त्यांना त्या ओळखीचा खरा उपयोग करण्याचे सामर्थ्य असत नाही. अर्थात मनास एखादी गोष्ट खरी वाटत असली, तरी तिचा अंमल करणे हे त्यांना दुर्घट वाटते. विचार, उच्चार व आचार या तिन्हींचा मेळ राखिता आला नाही, म्हणजे परिस्थितीविशेषाचा अंमल मनुष्याच्या मनावर होतो व त्याचे खर्‍या न्यायाकडे दुर्लक्ष होते. आपमतलबीपणा, शीघ्रकोपीपणा, उतावळेपणा, दुराग्रह, अतिलोभ, दंभ इत्यादी अनेक स्वरूपांच्या दुर्गुणपरंपरेस मनुष्य वश होतो, व त्यायोगाने त्यास क्षणमात्र सुखाचा अगर धन्यपणाचा भास झाला, तथापि त्यापासून एकंदरीत त्याचे नुकसानच होते. पुरुषाचा संबंध स्त्रीशी विवाहाच्या रूपाने घडला म्हणजे पतीच्या या स्वभावापासून तिला मात्र जन्मभर आपत्तीत पडावे लागते; व समाजनियमाच्या तीव्रतेमुळे तिला कितीही त्रास पोचत राहिला, तरी तिला अगर तिशी सहानुभूती बाळगणार्‍या इतर लोकांना त्या त्रासातून मुक्तता करून घेण्याचा मर्ग राहात नाही. पतीच्या अंगी मनोधैर्य इत्यादी गुणांचा अभाव असल्यास सास्वासुनांच्या व्यवहारात अगर इतर कौटुंबिक व्यवहारात स्त्रियांचे हाल कुत्रेही खाणार नाहीत अशा प्रकारचे होत असल्याची उदाहरणे जगात शेकडोशे घडतात. उपासमार, हाणामारी, शिव्यागाळी, समागमाचा त्याग, माहेरी कायमचा वास, आत्महत्या करण्याची पाळी, इत्यादी अनेक गोष्टी आहेत, त्या सर्वच येथे सांगत बसण्याची जरूर नाही. लिहिण्याचे तात्पर्य मिळून इतकेच की, कन्येचे पालक अगर तिचे दान करण्याचा ज्यांना अधिकार आहे असे लोक, त्यांचे कन्येसंबंधाने खरे कर्तव्य काय आहे याचे साधारण स्वरूप एवढ्या लिहिण्यावरून कळून येण्यास हरकत नाही. अर्थात हे स्वरूप ज्याचे त्याने ओळखावे. व प्रारंभी पूर्णपणे चौकशी करून नंतरच कन्यादानविधीस प्रवृत्त व्हावे. एवढे सूचनार्थ लिहिणे पुरेसे होईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP