ज्योति:शास्त्राधारे पाहण्याच्या गोष्टी
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
कन्याविवाहाचा उद्देश तिचा संसार चांगला होऊन तिला सुख प्राप्त व्हावे हा असतो, तथापि तिच्या जन्मकाळी तिला मंगळ असल्यास त्यापासून तिला बालवैधव्य येण्याची भीती असते. ही भीती काढून टाकण्याचा उपाय न करिता जर दांडगाईने वराच्या दीर्घायुषीपणाच्या भरंवशावर तिचा विवाह केला, तर हा मंगळाचा दोष पतीस नडू शकतो. तो न नडावा यासाठी विवाहपूर्वी कन्येच्या पित्याने तिजकडून एकान्ती सावित्रीव्रताचे आचरण करवावे, किंवा तिला पिप्पलव्रत म्हणजे पिंपळाच्या पूजेचे व्रत घेण्यास सांगावे.
या ठिकाणी पिंपळ म्हणजे नुसता पिंपळाचाच वृक्ष समजावयाचा असा अर्थ नसून पिंपळ, शमी, बोरी यांची झाडेही चालतात. या झाडांच्या तळाशी कन्येकडून आळी करून झाडांस दररोज पाणी घालवावे, व चैत्र आणि अश्विन महिन्यांत शु. ३ पासून एक महिनाभर ब्राह्मण व सुवासिनी यांची पूजा करवावी; त्याचप्रमाणे कळकाच्या पात्रात पार्वतीची चंदन, अक्षता, दूर्वा, बेल इत्यादी उपचारांची पूजा तिजकडून करवून परतिदिवशी देवीस नैवेद्य समर्पण करवावे, म्हणजे योगायोगाने बालवैधव्ययोगाचा परिहार होतो, असे ज्ञानभास्कर, विवाहपटल इत्यादी ग्रंथात सांगितले आहे. मर्कंडेयपुराणात कुंभविवाह, वृक्षसेवा, प्रतिमापूजा इत्यादी उपायांनी या पापयोगाचा नाश होऊन पतीचे दीर्घायुषीपन कायम राहते असे लिहिले आहे. कुंभविवाहात कुंभ म्हणजे मृत्तिकेचा घट आणि मंथनी म्हणजे ताक घुसळण्याची रवी यांचा विवाह लावून नंतर तो घट फ़ोडून उदकात टाकावा, व नंतर पंचपल्लवांच्या उदकाने कन्येस अभिषेक करावा इत्यादी प्रकारचा विधी सांगितलेला आहे. वृक्षसेवा म्हणजे आता वर्णिलेला अश्वत्थविवाह अथवा पिप्पलव्रतच होय.
प्रतिमापूत विष्णुदेवतेची सुवर्णाची प्रतिमा करून तीशेसे कन्येचा विवाह करावा, व प्रतिमा ब्राह्मणास दान द्यावी. प्रतिमादान झाले म्हणजे विष्णूचा कन्येशी पतित्वाचा संबंध राहात नाही; कारण मागे क. ६९ येथे ज्याप्रमाणे सोम, गंधर्व आणि अग्नी हे तीन दैविक पती सांगितले होते, त्याचप्रमाणे विष्णु हाही दैविक पती होतो. अर्थात दैविक पतीचा संबंध संपला असता स्त्रीस वैधव्यदोष लागत नाही, व ‘ पूनर्भू ’ या संज्ञेस पात्र न होता ती मनुष्यजातीचा पती करून घेऊ शकते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP