‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन रीतीचे ज्ञान
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वरील कलमाच्या शेवटभागी ज्या ‘ सीमान्तपूजन ’ विधीचा उल्लेख केला, त्या विधीचा शब्दश: अर्थ ‘ गावाच्या शिवेवर पूजा करणे, असा आहे. ही पूजा अर्थातच विवाहोद्देशाने आलेल्या वराची वधूपक्षीयांकडून व्हावयाची असते. सांप्रतकाळी मूळचे शास्त्रोद्देश सर्व बाजूस राहून त्यांच्याऐवजी त्या उद्देशाची नाटकी सोंगे आणावयाची असाच प्रकर सर्वत्र माजला असल्यामुळे ‘ गावची शीव ’ या दोन शब्दांचा अर्थ ‘ वधूच्या राहत्या जागेशिवाय दुसरी कोणतीही जागा अगर घर ’ असा अगदी विपरीत होऊन गेला आहे. अर्थात ज्या गावी हा विवाहविधी चालावयाचा, त्या गावातील कोणतेही देऊळ अगर धर्मशाळा, अगर कोणाही परक्या गृहस्थाचे घर समजण्यापर्यंत मूळच्या ‘ सीमा ’ या शब्दाच्या अर्थाची पायमल्ली झाली आहे. विधीच्या मूळच्या हेतूप्रमाणे खरा अर्थ म्हटला म्हणजे ‘ गावाची शीव ’ असाच आहे. या शिवेवर विवाहेच्छू वर येऊन उतरतो, व गावात आपणायोग्य कन्या कोण आहे याचा शोध करीत राहतो. कन्यापक्षाने वरशोधनासाठी गावोगाव भटकत राहणे हा मूळचा रिवाज नसून त्याच्याऐवजी वराने स्वत:च वरशोधनाकरिता देशोदेशी फ़िरावयाचे हे पूर्व काळच्या पद्धतेचे खरे स्वरूप होते.
सूत्रग्रंथांतून व स्मृतिग्रंथांतून सर्वत्र पुरुषांने अमुक अमुक प्रकारची स्त्री वरावी अशा अर्थाचेच लेख लिहिलेले आढळतात; व स्त्रीवर्गाने अमुक प्रकारच्या पुरुषास वरावे अशाविषयीचे लेख कोठेही दिसत नाहीत; यावरून पाहू गेले असताही हेच अनुमान खरे ठरते. नाही म्हणावयास पुराणग्रंथांत स्वयंवरपद्धतीच्या दर्शक म्हणून ज्या कथा वर्णिल्या आहेत, त्यांमध्ये केव्हा केव्हा कन्येच्या स्वयंवरासंबंधाने देशोदेशी पत्रिका पाठविल्याची वर्णने येतात; पण तेवढ्यावरून कन्यापक्षाकडून वरशोधनार्थ यत्न होत असण्याचे चालदेखील पूर्वी असली पाहिजे असे अनुमान करणे वाजवी होणार नाही. कारण एक तर ह्या पत्रिका मोठमोठ्या राजेलोकांपुरत्याच असून त्या पत्रिकांचा उद्देश होणार्या स्वयंवर प्रसंगी निरनिराळ्या राजे लोकांनी त्यांना इष्ट वाटत असेल तर यावे अशी सूचना करण्यापुरताच काय तो असे; त्या सूचनेस अनुसरून ज्यांची इच्छा स्वयंवरात आपल्या नशीबाची परीक्षा पाहण्याची असेल, तेच लिक काय ते आपण होऊन दूरदूर देशांहूनही स्वयंवराच्या ठिकाणी येत; व आपल्या अंगच्या गुणांची खात्री करून दिल्यानंतर इष्ट हेतू सिद्धीस न गेला, तरी निमूटपणे वधूने केलेला निर्णय कबूल करून आपआपल्या स्थानी परत जाण्यास तयार असत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP