ब्रह्मचर्यनियमांचा स्वभावाशी संबंध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
वरील कलमात ब्रह्मचर्यस्थितीत पुरुषास अतिकडक नियम पाळावे लागत असल्याचे सांगितले आहे. हे नियम व त्यांपासून स्वभावावर होनारे परिणाम यांबद्दल या ठिकाणी चार शब्द लिहिले असता ते अप्रासंगित्क होणार नाहीत. ब्रह्मचर्यस्थितीच्या आरंभी पुरुषाचे उपनयन म्हणजे मुंज होते, व ती होण्यापूर्वी शिशू अर्थात बालक हा कामचारी ( यथेच्छ भटकणारा ), कामवादी ( वाटेल तसे बोलणारा ) व कामभक्षी ( निषिद्धादिकांचा विचार न करिता मनास येईल ते खाणारा ) असे. त्याची त्या वेळची स्थिती लाडाची असल्याने तो साहजिकच स्वच्छंदी व उनाड असावयाचा. या स्थितीतून त्याने निघावे, व पुढे त्यास चांगली शिक्षा व चांगला मार्ग लागावा, या हेतूने त्याला गुरुगृही पाठविणे याचेच नाव त्याचे उपनय होय. हे उपनयन होऊन तो गुरुगृही गेल्यावर व जातानाही, त्याचा पूर्वीचा स्वच्छंदीपणा काढून टाकण्याकरिता जे उपाय योजण्यात येत, त्या उपायांचे स्वरूप म्हटले म्हणजे त्यास पाळावे लागणारे कडक नियम हेच होय. या नियमांचा उपदेश गुरू शिष्यास पुढील शब्दांनी करीत असे :
“ ब्रह्मचार्यसि । अपोशान । कर्म कुरु । दिवा मा स्वाप्सी: । आचार्याधीने ।
वेदमधीष्व । सायंप्रातर्भिक्षेथा: । सायंप्रात: समिधमाधेहि । ब्रह्मचर्य चर । ”
अर्थ : तू आता ब्रह्मचारी आहेस, अर्थात तुला आता पूर्वीप्रमाणे स्वच्छंदीपणाने व उनाडपणाने वागता यावयाचे नाही. तू जल ग्रहण कर, म्हणजे आजपावेतो तुझी मलमूत्रविसर्जनाची कृत्ये पाण्यावाचूनही होऊ शकत असत, परंतु इत:पर तुला प्रत्येक प्रसंगी पाण्याचा उपयोग करावाच लगणार. तू कर्म कर; म्हणजे शास्त्रामध्ये ज्या प्रकारे कर्मे करण्याविषयी सांगितले आहे त्याप्रमाणे व इत:पर कर्म करीत राहिले पाहिजे. दिवसा निजत जाऊ नको; अर्थात गुरुगृही राहून गुरूच्या सेवेची जी जी कृत्ये करावयाची ती करण्यास तू सदा तत्पर असले पाहिजे. आचार्यांच्या म्हणजे गुरूच्या आज्ञेत राहून तो वेद शिकवील ते तू शिकत रहा. - संध्याकाळी व सकाळी माधुकरी मागून आणीत जा; अर्थात आता तुला पूर्वीप्रमाणे आईबापाकडून लाडांच्या पोटी गोडधोड खाव्यास मिळत असे, तसे इत:पर तुला मिळावयाचे नाही; व आता तू भिक्षेच्या रूपाने जे काही मिळविशील त्यावरच तुला आपला गुजारा करण्यास शिकले पाहिजे. प्रतिदिवशी दोन वेळ गुरूच्या अग्निशाळेत हजर राहून अग्नीला समिधा देत जा; आणि ब्रह्मचर्याचे आचरण कर; अर्थात त्याच्या नियमांचे अनुसरण पूर्णपणे करीत राहून स्त्रियांशी संबंध ठेविण्याचे बिलकुल मनात आणू नको.
हा जो अर्थ या ठिकाणी संक्षेपाने लिहिला आहे, त्याच्या पोटी आणखी कडक नियम पुष्कळच आहेत, परंतु ते सर्व येथे सांगत बसण्याचे काही कारण नाही. ब्रह्मचर्याची दीक्षा एकसारखी बारा वर्षे चालावयाची असते, व त्या अवधीत गुरूच्या आज्ञेनुरूप वर्तन व्हावयाचे असते. यायोगे ब्रह्मचार्याच्या अंगच्या उच्छृंखलपणा जाऊन त्याच्या अंगी विचार येतो; घरच्या माणसांचा संबंध दूरावून भिक्षावृत्तीवर अवलंबन करण्याचे असल्यामुळे स्वावलंबनाचा गुण अंगी येतो; - इत्यादी अनेक फ़ायदे या दीक्षेच्या योगे प्राप्त होणारे असतात, व त्यांचा मनुष्याच्या स्वभावावर काही तरी सुपरिणाम झालाच पाहिजे, हे नुसत्या वरवरच्या दृष्टीने विचार करू जाणणारासही सहज कळण्याजोगे आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP