वेधदोष - पंचशलाका वेध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
विवाह ज्या नक्षत्रांवर व्हावयाचा, ती नक्षत्रे क्रूर ग्रहांनी विद्ध ( शब्दश: जखमी केलेली, अर्थात पीडायुक्त ) नसावी, असा सामान्यत: ज्योति:शास्त्राचा नियम आहे. नक्षत्रे विद्ध असली म्हणजे उत्पन्न होणार्या दोषास ‘ वेधदोष ’ असे म्हणतात. सत्तावीस ( अगर अभिजित धरून अठ्ठावीस ) नक्षत्रे आहेत, त्यांपैकी विवाहोपयोगी अशी ११ च नक्षत्रे असल्याने त्यांच्यापुरते वेध पाच रेघांची एक आकृती काढून तीत दाखविण्याची चाल आहे, व तिजवरून या वेधांस ‘ पंचशलाकावेध ’ असे नाव दिले आहे. वाराहीय विवाहपटल नामक “ ग्रंथात या वेधांपैकी विवाहित दंपत्यास नडनारे असे सूर्य आणि मंगळ यांचे वेध सांगितले असून, त्यांची फ़ळे अनुक्रमे वैधव्य व पुत्रशोक ही आहेत.
कित्येक ग्रंथकार चंद्रासंबंधाने वेध घेऊन ते सात शलाकांनी अथवा रेषांनी दाखवितात. या वेधांत काही पापग्रह व काही चांगलेही ग्रह आहेत, तथापि ते वेध विवाहप्रसंगी झाले असता ‘ विवाहवेश घेतलेली कन्या त्याच वेशाने रडत श्मशानभूमीकडे जाईल. ’ अशा प्रकारचे भयंकर फ़ळ ते ग्रंथकार सांगतात !! वेध पाहताना वेधस्थानी नक्षत्राचा अंक येईल तितक्या वर्षांनी कन्येस वैधव्य येणार असा अर्थ समजावयाचा असतो. वेध क्रूर ग्रहाने केला असल्यास ते नक्षत्रच अजीबात सोडून द्यावे; व चांगल्या ग्रहाचा वेध असला तर नक्षत्रस्थानाचा फ़क्त एक चरण सोडून इतर चरणांवर विवाह व्हावा, असा या ग्रंथकारांचा आशय आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP