ब्राह्मणविवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
उत्तम विद्वान व चांगल्या स्वभावाचा अगर वर्तनाचा अशा पुरुषांस बोलावून आणून त्याची पूजा करावी, व कन्येस वस्त्रालंकारांनी भूषित करून त्यांसुद्धा ती त्या पुरुषास द्यावी, असा सामान्यत: या पहिल्या प्रकारच्या म्हणजे ब्राह्मविवाहाचा विधी वर्णिला आहे. मेधातिथीच्या मते वरासही वस्त्रालंकार द्यावे. लौकिक रिवाजात या प्रकारच्या कन्यादानास ‘ सालंकृत कन्यादान ’ म्हणतात. हा विवाह सर्व प्रकारच्या विवाहांपेक्षा श्रेष्ठ मानिला आहे, कारन कन्यादानापासून पुण्य व परलोकप्राप्ती ही फ़ळे परलोकी काय मिळावयाची असतील ती मिळोत, परंतु या लोकात कन्येसंबंधाने तिच्या पित्याचे वर्तन अत्यंत निर्लोभपणाचे असते.
कन्येचे काही एक घ्यावयाचे नाही, उलट आपले जसे सामर्थ्य असेल त्याप्रमाणे आपण मात्र कन्येस द्यावयाचे, अशी या विवाहासंबंधाने कन्येच्या मातापितराची समजूत असल्याने तिला काही तरी संतती होईपावेतो तिची मातापितरे तिच्या घरचे अन्नग्रहणही करीत नाहीत. हे अन्नग्रहण त्यांना पुढे करावयाचे नसते, याकरिता वरपक्षाची मंडळी वधूच्या मातापितरांस दानविधी होण्यापूर्वीच मेजवानी देते असा लौकिक संप्रदाय आहे. शास्त्रमताने हा विवाह ब्राह्मणास मात्र उक्त आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP