मनुस्मृतिकाळी सवर्ण व शूद्र - स्त्री - संबंध
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
‘ अनुलोमा ’ची उदाहरणे : स्त्रीशूद्राविवाहाचा निषेध नुसत्या वर्णदृष्टीनेच स्मृतिकारांनी केला असता, तर त्याबद्दल विशेष विचार करण्याचे कारण न पडते. परंतु तिच्या मुखात मुख घालणे व तिच्या नि:श्वासाचे सेवन करणे या गोष्टींचे उच्चार स्पष्ट शब्दांनी करण्यात आले आहेत, त्या अर्थी स्मृतिकाळी हे प्रकार समाजात मोठ्या जारीने चालत असावेत, व त्यामुळेच स्मृतिकारांस जोरदार निषेधाचे शब्द वापरण्याची पाळी आली असावी, असे साहजिक अनुमान निघते. स्मृतिकारास ही स्थिती इष्ट वाटली नाही म्हणूनच उच्च वर्णाच्या पुरुषाने शूद्रजातीय स्त्रीस वरणे या गोष्टीचा निषेध त्याने केला.
मूळच्या अर्थाकडे दृष्टी देता ‘ वर्ण ’ शब्द मोठा व्यापक व साधा होता. परंतु समाजांत त्या शब्दाचा तो अर्थ जाऊन जातिभेदाचा उदय अधिकाधिक होत चालला होता, व सवर्ण अग्र असवर्ण विवाह कोठे झाला की पुरे, नवीन जात बनलीच, असा प्रकार होत राहून याज्ञवल्क्यस्मृती लिहिण्याच्या वेळी ‘ अनुलोम ’ व ‘ प्रतिलोम ’ हे दोन्ही शब्द प्रचारातून बहुधा निघून गेले होते; व शेवटी विवाह म्हटला म्हणजे केवळ सवर्णाशी, अर्थात ‘ वर्ण ’ या शब्दाने आपण जो काही विशेष जातिभेद मानीत असून त्या जातीतील एखाद्या विशेष व्यक्तीशी, एवढाच अर्थ लोकसमाजात रूढ झाला होता.
कालान्तराने शूद्रजातीय स्त्रीशी साक्षात विवाह होण्याचे पुढे नाहीसे झाले ही गोष्ट खरी आहे, तथापि मनुस्मृतीमध्ये बारा पुत्रांच्या गणनेत ‘ शौद्र ’ म्हणजे शूद्र स्त्रीपासून झालेल्या पुत्राची गणना केलेली आहे, यावरून निदान त्या काळी तरी शूद्रविवाह चालू होते असे मानिल्याशिवाय गत्यंतर नाही. अशा स्त्रीच्या पोटी झालेल्या संततीस कुटुंबाच्या मिळकतीची वाटणी मागण्याचा हक्क नाही, व बाप आपण होऊन जेवढे द्रव्य देईल तेवढेच त्याचे, असा निर्बंध स्मृतिकारांनी पुढील वचनात केला होता :
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्रापुत्रो न रिक्थभाक् ।
यदेवास्य पिता दद्यात्तदेवास्य धनं भवत् ॥
( मनु. अ. श्लो. १५५ )
अर्थात या वचनात पितृस्थानी तिन्ही उच्च वर्णांची नावे लिहिली आहेत त्यावरून या विवाहाचे अस्तित्व त्या वेळी होते हे स्पष्टच आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP